शेअर मार्केट : बाजार अचानक पडला तर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

शेअर मार्केट : बाजार अचानक पडला तर...

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५८,३०५ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १७,३६९ अंशांवर बंद झाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नव्या आर्थिक वर्षाच्या सुरवातीला अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम केला असला तरी अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम असलयाचे प्रतिपादन गेल्या गुरुवारी अर्थ मंत्रालयाकडून करण्यात आले. गेल्याच आठवड्यात एका कार्यक्रमात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भारतातील बँकांचे थकीत कर्जांचे प्रमाण (एनपीए) आटोक्यात असल्याचा निर्वाळा दिला. तसेच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतुकीत भाडेवाढ करून देखील ऑगस्ट महिन्यात लक्षणीय वाढ झाली आहे. एकीकडे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अशा प्रकारे सकारात्मक बातम्या येत असताना, वाहन निर्मात्यांकडून उत्पादन कपात आणि पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्याने फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (फाडा) आगामी काळात वाहनविक्रीवर नकारात्मक परिणाम होण्याचे भाष्य केले आहे.

गेल्या आठवड्याच्या शेवटी अमेरिकी शेअर बाजाराचा निर्देशांक ‘डाऊ जोन्स’ने २७१ अंशांची पडझड दर्शविली असल्याने या आठवड्याच्या आरंभी नकारात्मक संकेत मिळत आहेत.

बाजार घसरला तर?

वर्षभरात शेअर बाजाराने मोठ्या प्रमाणात वाढ नोंदविली आहे. अशा वेळेस बाजार अचानक पडला तर दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांनी; तसेच मध्यम अवधीचे ‘ट्रेडिंग’ करणाऱ्यांनी काय करावे, असा प्रश्न समोर येतो.

बाजारात कधी सकारात्मक, तर कधी नकारात्मक बातम्या येऊन धडकत असतात. गुंतवणूक गुरु बेंजामिन ग्रॅहम म्हणतात त्याप्रमाणे ‘शॉर्ट टर्म’मध्ये ‘मिस्टर मार्केट’ हे अत्यंत चंचल असते; मात्र ‘लाँग टर्म’मध्ये मार्केट हे कंपन्यांच्या होणाऱ्या प्रगतीचा वेध घेत असते. यामुळे महाग झालेला बाजार कोणत्याही कारणाने अचानक पडला, तर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य असलेल्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी करण्याची ती एक उत्तम संधी असते. यामुळे आगामी काळात बाजारात अचानक मोठ्या प्रमाणात पडझड झाली, तर दीर्घावधीसाठी पूर्वी नमूद केलेल्या सहज समजू शकणाऱ्या व्यवसायात कार्यरत असणाऱ्या फंडामेंटली सक्षम अशा मॅरिको, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, बर्जर पेंटस, ब्रिटानिया, एसबीआय कार्डस आदी कंपन्यांच्या शेअरमध्ये खरेदीचा विचार करावा.

शॉर्ट टर्म; तसेच मिडीयम टर्म साठी ‘ट्रेडिंग’ करणाऱ्यांनी मात्र ‘ट्रेंड इज माय बेस्ट फ्रेंड’ म्हणत बाजाराने अचानक पडझड सुरु केली, तर ‘ट्रेडिंग’साठी घेतलेल्या शेअरमधून ‘स्टॉपलॉस’ झाल्यास बाहेर पडणे योग्य ठरेल. मात्र, जोपर्यंत आलेखानुसार शेअर तेजीचा कल दर्शवून ‘स्टॉपलॉस’ पातळीच्या वर आहे, तोपर्यंत संयम ठेऊन थांबणे आवश्यक आहे.

‘ट्रेडिंग’साठी आगामी काळात तेजीचे संकेत मिळाल्यास, कोणत्या शेअरमध्ये तेजीचा व्यवहार करणे योग्य ठरू शकेल, ते पाहूया.

ॲप्कोटेक्स इंडस्ट्रीजमध्ये तेजीचा कल

ॲप्कोटेक्स इंडस्ट्रीज ही भारतातील सिंथेटिक लॅटेक्स आणि सिंथेटिक रबर यांच्या अग्रगण्य उत्पादकांपैकी एक आहे. कंपनीकडे आज बाजारात उपलब्ध असलेल्या स्टायरिन-बुटाडीन रसायनशास्त्रावर आधारित उत्पादनांची एक विस्तृत श्रेणी आहे. २० मे २०२१ पासून रु. ३८५ ते २८६ या मर्यादित पातळ्यांमधेच चढ-उतार केल्यावर गेल्या शुक्रवारी रु. ३८७ ला बंद भाव देऊन या शेअरने अल्पावधीच्या आलेखानुसार तेजीचे संकेत दिले आहेत. यामुळे जोपर्यंत भाव रु. २८५ या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत आगामी काळात यात आणखी भाववाढ होऊ शकते.

जीएनए ॲक्सल्सकडे ठेवा लक्ष!

जीएनए ॲक्सल्स ही भारतातील ऑन-हायवे आणि ऑफ-हायवे वाहनांच्या विभागात वापरल्या जाणाऱ्या एक्सल शाफ्टच्या अग्रगण्य उत्पादकांपैकी एक आहे. या कंपनीच्या शेअरने ऑगस्ट २०२१ पासून रु. ७७७ ते ६२२ या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार केल्यावर गेल्या शुक्रवारी लक्षणीय उलाढालीसह रु. ७९० ला बंद भाव देऊन आलेखानुसार तेजीचा कल दर्शविला आहे. यामुळे जोपर्यंत या कंपनीच्या शेअरचा भाव रु. ६२१ या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत चढ-उतार करीत आगामी काळात याचा भाव आणखी वधारू शकतो.

‘व्होल्टास’मध्ये तेजीचे संकेत

व्होल्टास लिमिटेड ही वातानुकूलन, रेफ्रिजरेशनच्या व्यवसायात गुंतलेली आहे. मध्यम अवधीच्या आलेखानुसार, या कंपनीच्या शेअरने १२ फेब्रुवारी २०२१ पासून रु. ११३२ ते ९१८ या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार केल्यावर गेल्या आठवड्यात रु. १२१३ ला बंद भाव देऊन मध्यम अवधीसाठी तेजीचे संकेत दिले आहेत. यामुळे मध्यम अवधीच्या आलेखानुसार जोपर्यंत भाव रु. ९१७ या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये चढ-उतार करीत तो आणखी तेजी दर्शवू शकतो.

या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. यामुळे प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Web Title: Bhushan Godbole Writes About Share Market Pjp78

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..