esakal | शाळा वॉरेन बफे गुरुजींची...
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा वॉरेन बफे गुरुजींची...

चला गुंतवणूकदारांनो आज पाहूया शाळा वॉरेन बफे गुरुजींची बफे यांनी  अमेरिकेतील विमान कंपन्यांमध्ये केलेली  गुंतवणूक तोटा स्वीकारून विकून टाकल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.  

शाळा वॉरेन बफे गुरुजींची...

sakal_logo
By
भूषण गोडबोले

जगातील सर्वात श्रीमंत आणि गुतंवणूक गुरु वॉरेन बफे यांच्या कंपनीची दरवर्षी होणारी वार्षिक बैठक म्हणजे  गुंतवणूकदारांसाठी एक "पाठशाळा'च असते. स्वतः बफे यांच्याकडून यशस्वी  गुंतवणुकीचे अनेक धडे या बैठकीत मिळतात. गेल्या आठवड्यात 2020 मधील वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हाथवे या कंपनीची वार्षिक बैठक झाली. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही बैठक यावेळेस व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चला गुंतवणूकदारांनो आज  पाहूया शाळा वॉरेन बफे गुरुजींची बफे यांनी अमेरिकेतील विमान कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक तोटा स्वीकारून विकून टाकल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. मात्र याबद्दल बफे म्हणाले,  ज्या व्यवसायात दीर्घकाळ स्पर्धेत टिकून राहण्यासाठी लागणारे वैशिष्ट्य असते तसेच आगामी काळात कंपनीच्या मिळकतीमधील वृद्धीचे मूल्यमापन करता येऊ शकते अशा कंपन्यांमधे दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरते. आगामी कालावधीमध्ये  विमान कंपन्यांच्या व्यवसायात अस्पष्टता दिसल्याने बफे यांनी विमान कंपन्यांच्या शेअरमधील गुंतवणूक तोटा स्वीकारून  विकून टाकली आहे. यावरून असे लक्षात येते आगामी कालावधीत ज्या कंपनीच्या शेअरमध्ये गुतंवणूक करणार आहोत, त्या कंपनीचा  व्यवसाय किती आणि कशा प्रकारे उत्पार्जनात वाढ करणार आहे आणि त्यानुसार शेअर किती स्वस्त किंवा महाग मिळतो आहे. तसेच कंपनीचे "बिझनेस मॉडेल' काय आहे या सर्वांची सांगड घालूनच गुंतवणूक करणे योग्य ठरते. केलेल्या गुंतवणुकीमध्ये अस्पष्टता  जाणवल्यास योग्य वेळेस तोटा स्वीकारून देखील बाहेर पडण्याचे धैर्य ठेवणे आवश्यक असते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

 अमेरिकेच्या इतिहासात युद्ध  तसेच वर्ष 1930,वर्ष 1937,  वर्ष 2000, वर्ष 2008 मधील मंदी आणि वर्ष 2011 मधील "वर्ल्ड ट्रेंड सेंटर'वरील हल्ला अशा अनेक घटना होऊन गेल्या मात्र रोखे बाजारापेक्षा अमेरिकी शेअर बाजाराने दीर्घकाळामधे सर्वात जास्त परतावा दिला. कारण, अमेरिकेतील व्यवसायांनी दीर्घकाळात प्रगतीच केली आणि आगामी काळात देखील बफे यांना याबद्दल खात्री वाटते. यामुळे सामान्य गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजारच्या निर्देशांकात दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक सर्वात सोपी तसेच लाभदायक ठरू शकते असे बफे यांनी मत वक्त केले.  म्हणजेच जर देशातील कंपन्या आगामी कालावधीत उत्तम प्रगती करणार असतील तर शेअर बाजारात सामान्य गुंतवणूकदारांनी गुतंवणूक करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे "इंडेक्स फंड'. उदा.भारतातील कंपन्या दीर्घकालावधीमध्ये प्रगती करणार असतील, तर निफ्टी जो भारतातील आघाडीच्या 50 कंपन्यांचे प्रतिनिधीत्व करणारा निर्देशांक आहे या कंपन्यांमध्येच गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. तसेच  कमी खर्च असणाऱ्या म्युच्युअल फंडात टप्याटप्याने गुंतवणूक करणे दीर्घावधीसाठी लाभदायक ठरू शकते. मात्र गुतंवणूक करताना जोखीम लक्षात घेऊनच गुंतवणूक करणे योग्य ठरेल.  बफे आगामी काळातील व्यवसायातील अनिश्चितता लक्षात घेऊन तसेच योग्य "व्हॅल्यूएशन'ला योग्य "बिझनेस' खरेदीच्या संधीचा लाभ घेण्यासाठी "कॅश' जवळ बाळगून आहेत. एकंदरीत बफे यांच्या यशस्वी गुंतवणूक करण्याच्या तंत्राचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की, थेट शेअर बाजारात गुतंवणूक करताना अनिश्चितता लक्षात घेऊन कठीण काळासाठी ठराविक रक्कम जवळ बाळगणे आवश्यक आहे. शिवाय "व्हॅल्यूएशन'नुसार संधी असताना जोखीम लक्षात घेऊन कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी. ज्या कंपन्यांकडे  स्पर्धेत टिकून व्यवसायात वाढ करण्याची क्षमता आहे अशा कंपन्यांच्या शेअरमध्ये गुतंवणूक करणे फायदेशीर ठरू शकते.

लेखक सेबी रजिस्टर्ड गुतंवतणूक सल्लागार  आहेत.