esakal | शेअर बाजारात दोन लग्ने करू शकता? 
sakal

बोलून बातमी शोधा

short term long term trending

शेअर बाजारात दोन लग्ने करता येऊ शकतात.'  दोन लग्ने म्हटल्यावर काही  जण खूष होऊ शकतात.  मात्र, शेअर बाजारात दोन लग्ने म्हणजे एक आहे लॉंगटर्मची गुंतवणूक, तर दुसरे आहे ट्रेडिंग! 

शेअर बाजारात दोन लग्ने करू शकता? 

sakal_logo
By
भूषण गोडबोले

भारतात शेअर बाजारात ट्रेडिंग आणि लॉंगटर्मसाठी गुंतवणूक करून अफाट पैसा मिळविलेले राकेश झुनझुनवाला म्हणतात, "शेअर बाजारात दोन लग्ने करता येऊ शकतात.' दोन लग्ने म्हटल्यावर काही जण खूष होऊ शकतात. मात्र, शेअर बाजारात दोन लग्ने म्हणजे एक आहे लॉंगटर्मची गुंतवणूक, तर दुसरे आहे ट्रेडिंग! लॉंगटर्मची गुंतवणूक ही प्रामुख्याने फंडामेंटल्सवर आधारित असते, तर ट्रेडिंग हे प्रामुख्याने शेअरच्या भावामधील मागणी-पुरवठ्याच्या आधारावर अवलंबून असते. ज्यांना शेअर बाजारात ट्रेडिंग; तसेच लॉंगटर्मसाठीदेखील गुंतवणूक करायची आहे, त्यांनी दोन वेगवेगळ्या ब्रोकरकडे खाती उघडणे किंवा मेंटेन करणे हितावह ठरेल. 

कंपनीच्या हितात शोधा स्वतःचे हित! 
एका खात्यावर केवळ ट्रेडिंग आणि एका खात्यावर केवळ लॉंगटर्मची गुंतवणूक केल्याने गोंधळ न होता हिशोब ठेवणे सोपे जाते. त्याचप्रमाणे संपत्तीनिर्माण किंवा भांडवलवृद्धीसाठी लॉंगटर्मच्या गुंतवणुकीस जास्त प्राधान्य देणे म्हणजेच लॉंगटर्मच्या गुंतवणुकीसाठी जास्त भांडवल राखीव ठेवणे आणि ट्रेडिंगसाठी एकूण भांडवलातील मर्यादितच रक्कम वापरणे योग्य ठरते. लॉंगटर्मसाठी गुंतवणूक करताना सातत्याने नफा मिळविण्यासाठी कंपनीचे बिझनेस मॉडेल काय आहे, कोणती वैशिष्ट्ये कंपनीला स्पर्धेच्या युगात पुढे ठेवणार आहे, भांडवलावर सातत्याने किती रिटर्न्स मिळवत आहे, भांडवलाच्या तुलनेत कर्ज कमी आहे ना, या गोष्टी पाहाव्या लागतात. कंपनी ज्या क्षेत्रात काम करीत आहे, तिथे कंपनीने एकाधिकार किंवा "मोनोपॉली' स्थापन केली आहे का? अशा अनेक बाबींचा अभ्यास करून लॉंगटर्मसाठी गुंतवणूक करणे आवश्‍यक असते. 

ट्रेडिंगसाठी पाहा भावाचा आलेख 
आता शॉर्टटर्म आणि मीडियम टर्म ट्रेडिंगचा विचार करता शेअरच्या भावाचा आलेख पाहणे योग्य ठरते. तेजीचा व्यवहार करायचा असल्यास शेअरच्या भावाचा आलेख चांगल्या व्हॉल्युमने तेजीचा कल दर्शविणारा असणे आवश्‍यक असते. राकेश झुनझुनवाला म्हणतात, "ट्रेडिंगमध्ये 100 व्यवहार केल्यास 40 व्यवहार बरोबर येऊ शकतात. मात्र, ज्या ठिकाणी आपण बरोबर येतो तिथे जास्त नफा मिळविता आला पाहिजे.' यासाठी चुकलेल्या ट्रेड्‌समधून योग्य ठिकाणी "स्टॉपलॉस' ठेवून तोटा स्वीकारून बाहेर पडणे आवश्‍यक असते. ट्रेडिंग करताना अंदाज चुकल्यास "ऍव्हरेजिंग' टाळणे योग्य ठरते. 

हेही वाचा : बाजारभाववाढीचा फुगवटा?

लॉंगटर्ममध्ये नको ट्रेडिंग 
लॉंगटर्मची गुंतवणूक करताना व्हॅल्युएशननुसार टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करून "ऍव्हरेजिंग' करणे फायदेशीर ठरते. काही जण एखादा शेअर "ट्रेडिंग'साठी घेतात आणि अंदाज चुकल्यावर खाली गेल्यास "स्टॉपलॉस' न ठेवता त्या शेअरमध्ये लॉंगटर्मसाठी निर्णय घेतात, यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच लॉंगटर्मच्या शेअरमध्ये सतत ट्रेडिंगचा विचार केल्यास सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यासारख्या उत्तम फलंदाजांना जास्त ओव्हर खेळायला देण्याऐवजी केवळ एखादी ओव्हर खेळायला देण्यासारखे आहे. काही वेळेस मात्र संधी ओळखून टेक्‍नो-फंडामेंटल म्हणजेच उत्तम फंडामेंटल्स असणाऱ्या शेअरने तेजीचा कल किंवा "ब्रेकआउट' दिल्यास अशा ठिकाणी "ट्रेडिंग'ची संधी घेता येते. मात्र, "स्टॉपलॉस'चा वापर करणे आवश्‍यक असते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मूल्यांकन पाहून भांडवलाचा विचार 
ट्रेडिंग असो किंवा लॉंगटर्मची गुंतवणूक, बाजाराचे मूल्यांकन पाहून भांडवलाचा विचार करणे हितावह ठरते. सद्यःस्थितीमध्ये भारतीय शेअर बाजाराचा पीई रेशो 28 पेक्षा जास्त आहे, म्हणजेच खूप महाग आहे. यामुळे ट्रेडिंग किंवा लॉंगटर्मचे गुंतवणूकभांडवल अत्यंत मर्यादित ठेवणे योग्य, कारण दिशा कधीही बदलू शकते. 

कोणत्या शेअरकडे लक्ष द्याल? 
मॅरिको, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्‍ट्‌स हे शेअर लॉंगटर्मसाठी योग्यता दर्शवत आहेत. एल अँड टी इन्फोटेक, हा शेअर टेक्‍नो-फंडामेंटल म्हणजेच लॉंगटर्मसाठी; तसेच ट्रेडिंगसाठी देखील योग्य वाटत आहे. ट्रेडिंगचा विचार करता पुढील कालावधीसाठी "निफ्टी'ची 10,164 ही महत्त्वाची आधार पातळी आहे. मागील आठवड्यात सप्ताहअखेरीस अमेरिकी शेअर बाजाराचा निर्देशांक "डाऊ जोन्स'ने 369 अंशांची तेजी दर्शविली आहे. यामुळे आगामी आठवड्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातून तेजीचे संकेत मिळू शकतात. मागील आठवड्यात बायोकॉन, एल अँड टी इन्फोटेक, पीआय इंडस्ट्रीज आदी कंपन्यांच्या शेअरनी उत्तम वाढ दर्शविली आहे. आलेखानुसार एल अँड टी इन्फोटेक या कंपनीचा शेअर जोपर्यंत 1890 रुपयांच्या वर आहे; तसेच पीआय इंडस्ट्रीज या कंपनीचा शेअर 1499 रुपयांच्या वर आहे, तोपर्यंत तेजीचा कल दर्शवत आहेत. आगामी आठवड्यात निर्देशांकाने; तसेच तेजीचा कल दर्शविणाऱ्या शेअरनी देखील तेजी दर्शविल्यास "स्टॉपलॉस' ठेवून ट्रेडिंग करावे. मात्र, बाजार महाग व्हॅल्युएशनला असल्याने मर्यादितच भांडवल गुंतविणे हितावह ठरेल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(लेखक सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)