esakal | ताप्तुरते संकट, की सुवर्णसंधी?
sakal

बोलून बातमी शोधा

share-marekt

‘फंडामेंट्‌ल व्हॅल्युएशन’नुसार म्हणजेच‘प्राईझ अर्निंग रेशो’;तसेच ‘प्राईज टू बुक व्हॅल्यू रेशो’नुसार बाजार महाग आहे.यामुळे‘ट्रेडिंग’असो,की‘लाँग टर्म’ची गुंतवणूक,भांडवल मर्यादितच ठेवणे हितावह ठरू शकेल.

ताप्तुरते संकट, की सुवर्णसंधी?

sakal_logo
By
भूषण गोडबोले

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्‍स’ ३७,३८८ अंशांवर, तर ‘निफ्टी’ ११,०५० अंशांवर बंद झाला. नव्या आठवड्यासाठी ‘सेन्सेक्‍स’ची ३६,४९६, तर ‘निफ्टी’ची १०,७९० अंश ही महत्त्वाची आधार पातळी आहे. ‘फंडामेंट्‌ल व्हॅल्युएशन’नुसार म्हणजेच ‘प्राईझ अर्निंग रेशो’; तसेच ‘प्राईज टू बुक व्हॅल्यू रेशो’नुसार बाजार महाग आहे. यामुळे ‘ट्रेडिंग’ असो, की ‘लाँग टर्म’ची गुंतवणूक, भांडवल मर्यादितच ठेवणे हितावह ठरू शकेल. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शॉर्ट टर्म ट्रेडिंगचा विचार करता, मागील लेखांमध्ये नमूद केल्यानुसार आयटी क्षेत्रातील कोफोर्ज लि. म्हणजेच पूर्वीची एनआयआयटी टेक; तसेच इंडियामार्ट इंटरमेश या कंपनीचे शेअर तेजीचा कल दर्शवत आहेत. इंडियामार्ट इंटरमेश या कंपनीच्या शेअरचा भाव ४३७८ या ‘स्टॉपलॉस’ पातळीच्या वर आहे, तोपर्यंत एक ते तीन महिन्यांत आणखी तेजी दर्शवू शकतो. मागील लेखांमध्ये नमूद केल्यानंतर कोफोर्ज लि.च्या शेअरने उत्तम तेजी दर्शविली आहे. यामुळे नफा काढून घेणे किंवा काही प्रमाणात नफा घेऊन राहिलेल्या शेअरसाठी ‘स्टॉपलॉस‘ची पातळी वर घेणे किंवा बदलणे आवश्‍यक आहे. तसेच, बाजाराने आणि ‘कोफोर्ज’सारख्या तेजी दर्शविणाऱ्या शेअरने आगामी आठवड्यात तेजीचा कल दर्शविल्यास नव्याने किंवा पुन्हा खरेदी करावयाची असल्यास २०५६ या पातळीचा ‘स्टॉपलॉस’ ठेवून मर्यादित भांडवलावरच व्यवहार करणे हितावह ठरू शकेल. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शॉर्ट, की लाँग टर्म ठरवूनच व्यवहार
प्रसिद्ध अमेरिकी ट्रेडर मायकल कार म्हणतात, ‘आगामी काळात बाजार काय करणार आहे, यापेक्षा बाजाराप्रमाणे आपण काय करणार आहोत, याचे नियोजन करणे अत्यंत आवश्‍यक असते.’ आगामी आठवड्यात बाजार कोणत्या पातळीवर जाणार, हे फक्त देवच सांगू शकतो. आपण केवळ ‘व्हॅल्युएशन’ व मागील वाटचालीवरून दिशा कशी आहे, हे पाहू शकतो. अर्थात ही दिशा कधीही बदलू शकते. यामुळे ‘ट्रेडिंग’ करताना ‘स्टॉपलॉस’ ठेवणे अत्यंत आवश्‍यक आहे. लाँग टर्मची गुंतवणूक करताना बाजारात होणारी पडझड ही खरेदीसाठी संधी असू शकते. मात्र, शॉर्ट टर्म; तसेच मीडियम टर्म ट्रेडिंगचा विचार करता, बाजारात पडझड होत असताना तेजीचा कल दिसत नाही तोपर्यंत खरेदी टाळणे हितावह ठरते. व्यवहार करताना आपण शॉर्ट टर्मसाठी ट्रेडिंग करीत आहोत, की लाँग टर्मसाठी गुंतवणूक, हे ठरवूनच व्यवहार करणे योग्य ठरते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ट्रॅव्हल आणि टुरिझमकडे लक्ष
लाँग टर्मची गुंतवणूक करताना कंपनीचे ‘बिझनेस मॉडेल’ आणि त्याचे ‘व्हॅल्युएशन’ पाहणे आवश्‍यक असते. ‘कोरोना’च्या साथीमुळे ट्रॅव्हल आणि टुरिझम कमी होणे अपेक्षित होते. या क्षेत्राचा विचार करता, कोरोना हे काही काळासाठी आलेले तात्पुरते संकट आहे. काही काळानंतर हे संकट दूर होणार आहे. यामुळे या क्षेत्रातील फंडामेंटली सक्षम कंपन्यांमध्ये लाँग टर्मसाठी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे ही सुवर्णसंधी ठरू शकते. लाँग टर्मच्या गुंतवणुकीचा विचार करता, ‘आयआरसीटीसी’ म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन या रेल्वे बुकिंग; तसेच खाद्यसेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये ५ ते १० वर्षांचा दृष्टीकोन ठेवून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल. सध्या ‘कोरोना’च्या साथीमुळे आगीन गाडीने मामाच्या गावाला जाता येणार नाही. मात्र, रेल्वे बुकिंग; तसेच खाद्यसेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घ कालावधीसाठी टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करता येऊ शकेल. 

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत. या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी दिली आहे. शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन, वाचकांनी आपापल्या जबाबदारीवर व्यवहार करणे अपेक्षित आहे.)

loading image
go to top