Share Market : आंतरराष्ट्रीय बाजारातील संकेतांकडे लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market
शेअर मार्केट : आंतरराष्ट्रीय बाजारातील संकेतांकडे लक्ष

शेअर मार्केट : आंतरराष्ट्रीय बाजारातील संकेतांकडे लक्ष

sakal_logo
By
भूषण गोडबोले

गेल्या आठवड्यात शुक्रवारी ७६७ अंशांची तेजी दर्शवत ‘सेन्सेक्स’ ६०,६८६ अंशांवर, तर २२९ अंशांची तेजी दर्शवत ‘निफ्टी’ १८,१०२ अंशांवर बंद झाला. १९ ते २९ ऑक्टोबरपर्यंत एकंदरीत पडझडीचे सत्र दर्शविल्यानंतर गेले दोन आठवडे ‘सेन्सेक्स’ तसेच ‘निफ्टी’ मर्यादित पातळ्यांमधेच चढ-उतार दर्शवत आहेत. आलेखानुसार या आठवड्यासाठी ‘निफ्टी’ची १७,६१३ ही महत्त्वाची आधार पातळी आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेत महागाईच्या दराने गेल्या ३० वर्षांतील उच्चांक नोंदविल्यानंतर अमेरिकी शेअर बाजाराचा निर्देशांक ‘डाऊ जोन्स’मध्ये पडझड झाली. सप्ताहअखेर मात्र सावरत १७९ अंशाची तेजी करून ३६,१०० ला बंद भाव दिला आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील संकेतांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे.

‘मुथूट फायनान्स’कडे लक्ष

मुथूट फायनान्स ही सोन्याच्या तारणावर कर्ज देणारी आघाडीची नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी आहे. सप्टेंबर २०२१ पर्यंत कंपनीकडे ६०,९१८ कोटी (एयूएम) कर्ज व्यवस्थापनाखाली आहे, ज्यापैकी ९० टक्के सुवर्ण कर्जातून येते. कर्ज देणाऱ्या ४६१९ शाखांसह कंपनीने देशभर विस्तार करीत सोन्याच्या तारणावर कर्ज देणाऱ्या क्षेत्रात आघाडीचे स्थान निर्माण केले आहे. गृहनिर्माण, मायक्रो फायनान्स, वाहन वित्त यांसारख्या कर्ज देणाऱ्या विभागांमध्येही कंपनीची तिच्या साहाय्यक कंपन्यांद्वारे उपस्थिती आहे. व्यवसायवृद्धीसह गेल्या ४ ते ५ वर्षांत कंपनीच्या नफ्यात दरवर्षी २५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. आलेखानुसार ऑगस्ट महिन्यापासून रु. १६३८ ते १४०२ या मर्यादित पातळ्यांमधेच चढ-उतार केल्यावर गेल्या आठवड्यात रु. १६९१ ला बंद भाव देत या कंपनीच्या शेअरने मध्यम अवधीच्या आलेखानुसार तेजीचे संकेत दिले आहेत. तरी गुंतवणूकदारांनी मर्यादित जोखीम स्वीकारून दीर्घावधीच्या दृष्टीने या कंपनीच्या शेअरकडे लक्ष ठेवणे फायदेशीर ठरू शकेल.

‘चोलामंडलम’मध्ये तेजीचा कल

चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स ही देशातील प्रमुख नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांपैकी एक आहे, जी वाहन वित्त, गृहकर्ज आणि मालमत्तेवर कर्ज प्रदान करण्यात गुंतलेली आहे. एप्रिल २०२१ पासून मर्यादित पातळ्यांमधेच चढ-उतार केल्यावर गेल्या आठवड्यात रु. ६६२ ला बंद भाव देत या कंपनीच्या शेअरने मध्यम अवधीच्या आलेखानुसार तेजीचे संकेत दिले आहेत. जोपर्यंत या कंपनीच्या शेअरचा भाव रु. ४६९ या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत आलेखानुसार हा शेअर तेजीचा कल दर्शवत आहे. जोपर्यंत भाव रु. ४६९ या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये चढ-उतार करीत या कंपनीच्या शेअरमध्ये आणखी भाववाढ होऊ शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअरकडे देखील लक्ष ठेवणे फायदेशीर ठरू शकेल.

या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

loading image
go to top