
‘निफ्टी फिफ्टी प्लस’ म्हणजेच ‘निफ्टी फिफ्टी’मधील कंपन्यांच्या व्यतिरिक्त पीआय इंडस्ट्रीज, एसबीआय कार्डस, बाळकृष्ण इंडस्ट्रीज, ॲस्ट्रल लि., सुमितोमो केमिकल इंडिया, शीला फोम आदी कंपन्यांच्या शेअरमध्ये देखील दीर्घावधीच्यादृष्टीने गुंतवणुकीचा विचार करावा.
‘निफ्टी फिफ्टी प्लस’
गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५२,७२७ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १५,६९९ अंशांवर बंद झाले. जागतिक पातळीवर शेअर बाजारांनी ‘बाउन्स बॅक’ करीत सकारात्मक संकेत दिल्याने गेल्या शुक्रवारी ‘सेन्सेक्स’ने देखील ४६२ अंशांची, तर ‘निफ्टी’ने १४२ अंशांची तेजी दर्शविली. गेल्या शुक्रवारी आठवड्याच्या शेवटी अमेरिकी शेअर बाजाराचा निर्देशांक ‘डाऊ जोन्स’ने ८२३ अंशांची तेजी दर्शविल्याने या आठवड्याची सुरवात तेजीने होऊ शकते. मध्यम अवधीच्या आलेखानुसार, निर्देशांक सध्या ‘बाउन्स बॅक’ म्हणजेच पडझडीनंरची उसळी घेताना दिसत आहे. पुढील कालावधीसाठी ‘सेन्सेक्स’ची ५०,९२१, तर ‘निफ्टी’ची १५,१८३ ही महत्त्वाची आधार पातळी आहे. बाजार पडझडीनंतरची उसळी दर्शवत असताना गुंतवणूकदारांनी पोर्टफोलिओमध्ये टीसीएस, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा आदी ‘निफ्टी फिफ्टी’मधील दिग्गज कंपन्यांचा; तसेच ‘निफ्टी फिफ्टी प्लस’ म्हणजेच ‘निफ्टी फिफ्टी’मधील कंपन्यांच्या व्यतिरिक्त पीआय इंडस्ट्रीज, एसबीआय कार्डस, बाळकृष्ण इंडस्ट्रीज, ॲस्ट्रल लि., सुमितोमो केमिकल इंडिया, शीला फोम आदी कंपन्यांच्या शेअरमध्ये देखील दीर्घावधीच्यादृष्टीने गुंतवणुकीचा जरूर विचार करावा.
ॲस्ट्रल लि. (शुक्रवारचा बंद भाव रु. १६६८)
ॲस्ट्रल लि. ही कंपनी सीपीव्हीसी पाइपिंग निर्मिती आणि वितरण विभागामध्ये एक आघाडीची कंपनी आहे. कंपनी ॲडेझिव्ह व्यवसायातही विस्तार करीत आहे. पाइपिंग विभाग महसुलाच्या सुमारे ७७ टक्के असून, हा कंपनीचा मुख्य व्यवसाय आहे. ॲडेझिव्ह विभाग (वस्तू चिकटविण्याचे द्रव्य) महसुलाच्या सुमारे २३ टक्के आहे. आगामी काळात कंपनी सॅनिटरी वेअर उत्पादने सादर करण्याचा विचार करीत आहे. कर्जाचे प्रमाण कमी ठेऊन व्यवसायात गुंतविलेल्या भांडवलावर सातत्याने २० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत या कंपनीने विक्री तसेच नफ्यामध्ये गेल्या १० वर्षांत वार्षिक १५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दर्शवत व्यवसायवृद्धी केली आहे. या कंपनीच्या शेअर गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकेल.
शीला फोम लि. (शुक्रवारचा बंद भाव रु. २६७९)
शीला फोम लि. ही भारतातील मॅट्रेस आणि फोम उत्पादने उद्योगातील एक आघाडीची कंपनी आहे. कंपनी विविध फोमआधारित घरगुती आराम उत्पादने (गादी, फर्निचर कुशन) तयार करते. कंपनीचा ‘स्लीपवेल’ हा ब्रँड देशांतर्गत मॅट्रेस उद्योगातील आघाडीच्या ब्रँडपैकी एक आहे. ‘स्लीपएक्स’ हा कंपनीचा ऑनलाइन ब्रँड आहे, जो ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. कंपनीची संपूर्ण भारतात तसेच परदेशात उपस्थिती आहे. भारतीय रेल्वेला वंदे भारत गाड्यांसाठी फोम पुरविण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. कंपनीला अमेरिकेत निर्यातीच्या वाढीव संधी उपलब्ध होऊ शकतात. आगामी काळात उत्पादन क्षमतेमधील वाढ, नवी उत्पादने; तसेच कंपनीच्या बाजारहिश्श्यात होऊ शकणारी वाढ यामुळे दरवर्षी १२ ते १३ टक्क्यांपेक्षा जास्त गतीने व्यवसायवृद्धी होणे अपेक्षित आहे. कर्जाचे प्रमाण कमी ठेऊन या कंपनीने व्यवसायात गुंतविलेल्या भांडवलावर सातत्याने १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत व्यवसायवृद्धी केली आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये मर्यादित प्रमाणात गुंतवणूक केल्यास भविष्यात लाभ होऊ शकतो. या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Web Title: Bhushan Godbole Writes Nifty 50 Share Market Sheela Foam Ltd Astral Ltd Share Price
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..