
शेअर बाजारात दीर्घावधीमध्ये गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळण्याची शक्यता असली तरी अल्पावधीमधील चढ-उतार सहन करण्याचे गुंतवणूकदारास एक प्रकारे जणू शुल्कच भरावे लागते.
शेअर मार्केट : पोर्टफोलिओला देऊया सोन्याचा मुलामा
गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५७,८३२ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १७,२७६ अंशांवर बंद झाले होते. रशिया-युक्रेनमधील तणाव, कच्च्या तेलाचे गगनाला भिडलेले भाव, अमेरिकी; तसेच जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आदी अनेक बाबींमुळे सध्या बाजार खाली-वर हेलकावे खाताना दिसत आहे. आलेखानुसार, आगामी कालावधीसाठी ‘निफ्टी’ची १६,४१० ही महत्त्वाची आधार पातळी आहे. सध्या बाजारातील अस्थिरतेचा विचार करता, जोपर्यंत सक्षम तेजीचे संकेत मिळत नाहीत, तोपर्यंत अल्पावधीसाठी ‘ट्रेडिंग’ करण्याऐवजी बाजारातील अस्थिरतेचा फायदा घेऊन पडझडीमध्ये उत्तम व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल.
शेअर बाजारात दीर्घावधीमध्ये गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळण्याची शक्यता असली तरी अल्पावधीमधील चढ-उतार सहन करण्याचे गुंतवणूकदारास एक प्रकारे जणू शुल्कच भरावे लागते. प्रसिद्ध लेखक मॉर्गन हाउजेल यांच्या विचारांनुसार देखील अस्थिरता, उलथापालथ किंवा अनिश्चितता या सर्व गोष्टी दीर्घावधीमध्ये मिळू शकणाऱ्या फायद्यासाठी मोजलेले शुल्कच असते. सध्या दीर्घावधीमधील व्यवसायवृद्धीची क्षमता आणि शेअरचा बाजारभाव यांची तुलना करता, टीटीके प्रेस्टिज (शुक्रवारचा बंद भाव ः रु. ८५४), डिव्हीज लॅब (शुक्रवारचा बंद भाव ः रु. ४३५१), कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस अर्थात कॅम्स (शुक्रवारचा बंद भाव ः रु. २४४५) आदी कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू ठरू शकेल.
‘कॅम्स’मध्ये वृद्धीची शक्यता
दीर्घावधीमध्ये भारतात म्युच्युअल फंड, ॲसेट मॅनेजमेंट म्हणजेच मालमत्ता व्यवस्थापन उद्योगात खूप मोठ्या प्रमाणात वाढ होणे अपेक्षित आहे. कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस अर्थात ‘कॅम्स’ ही भारतातील प्रमुख म्युच्युअल फंड कंपन्यांसाठी ट्रान्स्फर एजंट म्हणून कामकाज करणारी अग्रेसर कंपनी आहे. कॅम्स या कंपनीने रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट म्हणून कामकाज करीत असताना, या कार्यक्षेत्रात जवळपास ७० टक्के बाजारहिस्सा काबीज केला आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड व्यवसायासाठी ‘कॅम्स’ ही सर्वांत मोठी रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट म्हणून कार्यरत आहे. या व्यवसायात इतर कंपन्यांना प्रवेश करण्यासाठी अडथळे जास्त आहेत. कंपनीने आजपर्यंत गुंतविलेल्या भांडवलावर उत्तम परतावा मिळविला आहे. दीर्घावधीमधील व्यवसायवृद्धीची क्षमता लक्षात घेता, या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घावधीसाठी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल.
गोल्डबीज (बंद भाव - रु. ४३)
सध्या शेअर बाजारात अस्थिर वातावरण असताना, सोन्याचा भाव मात्र वधारत १० ग्रॅमला पुन्हा ५० हजार रुपयांवर पोचलेला दिसत आहे. अशा वेळेस शेअर बाजारातील गुंतवणुकीबरोबरच, आपल्या गुंतवणुकीचा समतोल साधण्यासाठी शेअरसारख्या खरेदी-विक्री करता येणाऱ्या ‘गोल्ड बीज’ या एक्स्चेंज ट्रेडेड फंडात टप्प्याटप्प्याने खरेदी करणे आगामी काळासाठी फायदेशीर ठरू शकेल. अशा प्रकारे उत्तम व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपन्यांच्या शेअरमध्ये खरेदी करण्याबरोबर सोन्यामध्ये देखील खरेदीचे धोरण ठेऊन समतोल साधत पोर्टफोलिओला अर्थात गुंतवणुकीला सोन्याचा मुलामा देणे हितावह ठरू शकेल.
वरील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे .प्रत्यक्ष व्यवहार करताना वाचकांनी जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Web Title: Bhushan Godbole Writes Share Market Portfolio
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..