
व्यवसायवृद्धीची क्षमता लक्षात घेणे आवश्यक
गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५८,३३८ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १७,४७५ अंशांवर बंद झाले होते. गेल्या आठवड्यात आयटी क्षेत्रातील दिग्गज टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस; तसेच इन्फोसिस या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर झाले. जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, टीसीएस आणि इन्फोसिसने वार्षिक तत्वावर विक्री तसेच नफ्यात वाढ नोंदविली आहे. आगामी काळात आयटी क्षेत्रातील विप्रो, एचसीएल टेक, लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक आदी अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होतील.
दीर्घावधीसाठी गुंतवणूक करताना केवळ शेअरच्या किमतीचा विचार करण्याऐवजी आगामी काळातील व्यवसायवृद्धीची क्षमता आणि शेअरची किंमत यांची तुलना करून गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. गेल्या वर्षी १२ एप्रिल २०२१ रोजी टाटा इलेक्सी या आयटी क्षेत्रातील कंपनीच्या शेअरबद्दल (भाव रु. ३१०७ च्या आसपास असताना) माहिती दिली होती. केवळ किमतीचा विचार केल्यास, प्रति शेअर रु. ३००० हा भाव खूप महाग वाटू शकतो. मात्र, यावर्षी मार्च २०२२ मध्ये शेअरने रु. ९४२० चा उच्चांक गाठला. यामुळे गुंतवणूक करताना आगामी काळातील व्यवसायवृद्धीची क्षमता आणि शेअरची किंमत याची तुलना करून गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते.
व्यवसायात उत्तम परतावा मिळवत व्यवसायवृद्धी करणाऱ्या कंपन्यांची व्यवसायवृद्धीची गती भविष्यात मंदावल्यास शेअरच्या किमतीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे गुंतवणूक करताना हा धोका लक्षात घेऊन व्यवसायवृद्धीची क्षमता आणि शेअरची किंमत यांची तुलना करून उत्तम परतावा मिळू शकेल, अशा विविध मात्र ठराविक सक्षम कंपन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते.
लार्सन अँड टुब्रो इन्फोटेककडे लक्ष (शुक्रवारचा बंद भाव ः रु. ६०३८)
लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक ही कंपनी विविध उद्योगांमधील ग्राहकांसाठी ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, मेंटेनन्स आणि आउटसोर्सिंग, एंटरप्राइझ सोल्यूशन्स, इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट सर्व्हिसेस, टेस्टिंग, डिजिटल सोल्यूशन्स आणि प्लॅटफॉर्म-आधारित सोल्यूशन्स यासारख्या आयटी सेवांची विस्तृत श्रेणी प्रदान करते. या कंपनीचे सध्या ४५० पेक्षा जास्त ग्राहक आहेत, त्यापैकी सुमारे ७० ग्लोबल फॉर्च्युन ५०० कंपन्यांमध्ये समाविष्ट आहेत. कंपनीची सिस्को, आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल आदींसारख्या जागतिक कंपन्यांशी धोरणात्मक युती आहे. कंपनीने सूचित केल्यानुसार, यापूर्वी कंपनीने त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी; तसेच धोरणात्मक फायदा मिळविण्याच्यादृष्टीने सात वेगवेगळ्या कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे. कंपनीने व्यवसायवृद्धीची क्षमता व त्यासाठी मोजावी लागणारी किंमत यांचा ताळमेळ लक्षात घेऊनच अधिग्रहण करण्याचे धोरण ठेवले आहे. कर्जाचे प्रमाण अत्यल्प ठेऊन व्यवसायात गुंतविलेल्या भांडवलावर उत्तम परतावा मिळवत ही कंपनी व्यवसायवृद्धी करीत आहे. कंपनीचा ‘फ्री कॅश फ्लो’ म्हणजेच मुक्त रोकड प्रवाहतादेखील लक्षणीय वाढला आहे. या आठवड्यात (१९ एप्रिल) या कंपनीचे तिमाही निकाल जाहीर होतील, ज्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे. कंपनीचा शेअर हा किमतीच्या दृष्टीने सध्या महाग वाटत असला तरी दीर्घावधीमधील व्यवसायात वृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेता या शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यास दीर्घावधीमध्ये उत्तम फायदा मिळू शकेल.
यापूर्वी इन्फोसिस, टीसीएस, विप्रो या आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या शेअरचा केवळ किमतीच्या दृष्टीने विचार केल्यास, कित्येक वेळेस हे शेअर यापूर्वी खूप महाग वाटले असते. मात्र, बोनस किंवा स्प्लिट अर्थात विभाजनामुळे या कंपन्यांच्या शेअरची किंमत सध्या केवळ किमतीचा विचार केल्यास कमी दिसत आहेत. दीर्घावधीमध्ये कंपनीची होणारी व्यवसायवृद्धी, शेअर बायबॅक, बोनस किंवा स्प्लिट आदी घटकांचा शेअरच्या किमतीवर परिणाम होत असतो. आकडेवारीनुसार विश्लेषण केल्यास, लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक ही कंपनी आपल्या व्यवसायात गुंतविलेल्या भांडवलावर सुमारे ३५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत असताना, मिळालेल्या नफ्यातील सुमारे ६० टक्के नफा पुन्हा व्यवसायात गुंतवत आहे आणि सुमारे ३० ते ४० टक्के नफा हा लाभांशाच्या रुपाने वितरीत करीत असल्याचे लक्षात येते. टीसीएस देखील अशाच प्रकारे व्यवसायवृद्धी करीत आहे. शेअरची किंमत आणि दीर्घावधीमधील व्यवसायात वृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेता, लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक या कंपनीच्या शेअर्समध्ये जोखीम लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यास दीर्घावधीमध्ये उत्तम फायदा मिळू शकेल.
मागील लेखांमध्ये नमूद केल्यानुसार, गुंतवणूकदारांनी सध्या पीआय इंडस्ट्रीज, कॅम्स, डिव्हीज लॅब, टीटीके प्रेस्टिज आदी कंपन्यांच्या शेअरचा देखील जरूर विचार करावा.या लेखातील माहिती अभ्यासाच्या; तसेच शैक्षणिक दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Web Title: Bhushan Godbole Writes Share Market Potential For Business Growth
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..