चांगली गुंतवणूक कशी असते?

ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स म्हणतात, व्यावसायिक गुंतवणुकीची क्रिया असह्यपणे कंटाळवाणी असते
Bhushan Godbole writes which invetment is good to invest share market
Bhushan Godbole writes which invetment is good to invest share market sakal
Summary

ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स म्हणतात, व्यावसायिक गुंतवणुकीची क्रिया असह्यपणे कंटाळवाणी असते, तर जॉर्ज सोरोस म्हणतात, ‘गुंतवणूक मनोरंजक असल्यास आणि तुम्ही मजा करीत असाल, तर तुम्ही कदाचित पैसे कमावणार नाही. चांगली गुंतवणूक कंटाळवाणी असते.’

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५५,७६९ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १६,५८४ अंशांवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील संकेतांचा विचार करता, अमेरिकी शेअर बाजाराच्या निर्देशांकात ‘डाऊ जोन्स’ने गेल्या शुक्रवारी ३४८ अंशांची घसरण नोंदविली आहे. या आठवड्यात रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक होणार आहे, ज्याकडे बाजाराचे लक्ष असेल. आलेखानुसार आगामी कालावधीसाठी ‘सेन्सेक्स’ची ५२,२६० अंश ही महत्त्वाची आधार पातळी आहे. बाजारात अस्थिरतेचे वातावरण असताना केवळ शेअरच्या भावामधील चढ-उतारांकडे बघून गोंधळून जाण्यापेक्षा प्रत्येक शेअरमागे जी कंपनी कार्यरत आहे, त्या कंपनीच्या व्यवसायातील प्रगतीचा आढावा घेणे अत्यंत आवश्यक असते. सर्वप्रथम कंपनीची दीर्घावधीतील व्यवसायवृद्धीची संधी लक्षात घेऊन कंपनीचे मूल्याकंन करणे आवश्यक असते.

मूल्यांकन केल्यानंतर शेअर बाजारात मूल्यांकनाच्या तुलनेत कंपनीच्या शेअरचा बाजारभाव मुबलक ‘मार्जिन ऑफ सेफ्टी’सह स्वस्त भावात मिळत असल्यास गुंतवणुकीची संधी मिळते. अल्पावधीमध्ये बाजार भावनाप्रधान असल्याने उत्तम व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये देखील घसरण होते. अशा वेळेस संयम ठेवून फंडामेंटल्सनुसार विविध सक्षम कंपन्यांच्या शेअरमध्ये दीर्घावधीसाठी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. अल्पावधीतील हालचालींमुळे शेअर बाजारात व्यवहार करणे अनेक गुंतवणूकदारांना रोमांचक वाटते. मात्र, गुंतवणूक केल्यावर बाजारात चार ते सहा महिने घसरण झाल्यास हाच रोमांच निघून जाऊन निराशा व भीती वाटू लागते. शेअरचे भाव अल्पावधीमध्ये जरी प्रचंड प्रमाणात चंचलता दर्शवत असले, तरी दीर्घावधीमध्ये ते कंपनीच्या प्रगतीचा वेध घेताना दिसतात. यामुळे दीर्घावधीसाठी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. मात्र, टप्प्याटप्प्याने अशा प्रकारे संधी ओळखून गुंतवणूक करण्याची क्रिया अत्यंत कंटाळवाणी असते. ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स म्हणतात, व्यावसायिक गुंतवणुकीची क्रिया असह्यपणे कंटाळवाणी असते, तर जॉर्ज सोरोस म्हणतात, ‘गुंतवणूक मनोरंजक असल्यास आणि तुम्ही मजा करीत असाल, तर तुम्ही कदाचित पैसे कमावणार नाही. चांगली गुंतवणूक कंटाळवाणी असते.’

कोणत्या शेअरचा विचार?

सध्या दीर्घावधीसाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये एचडीएफसी बँक (शुक्रवारचा बंद भाव रु. १३८०), सुमितोमो केमिकल इंडिया (शुक्रवारचा बंद भाव रु. ४६१), टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (शुक्रवारचा बंद भाव रु. ३४४०), डिव्हीज लॅब (शुक्रवारचा बंद भाव रु. ३४७८), फिएम इंडस्ट्रीज ( शुक्रवारचा बंद भाव रु. १००१) आदी कंपन्यांच्या शेअरचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा. मात्र, चांगली गुंतवणूक कंटाळवाणी असते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

सुमितोमो केमिकल इंडिया

सुमितोमो केमिकल इंडिया ही जपानमधील सुमितोमो केमिकल्सची उपकंपनी आहे. सुमितोमो केमिकल इंडिया ही प्रामुख्याने अॅग्रो सोल्युशन्स डिव्हिजन, पर्यावरण, आरोग्य विभाग आणि प्राणी पोषण विभागाअंतर्गत विशेष आणि जेनेरिक उत्पादनांच्या निर्मिती आणि विक्रीमध्ये गुंतलेली कंपनी आहे. कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके, फ्युमिगंट्स आणि उंदीरनाशके, वनस्पतींच्या वाढीचे पोषण उत्पादने, जैव-रॅशनल्स आणि वनस्पतीवाढ नियामक अशा सर्व उत्पादन विभागांमध्ये कंपनीची उपस्थिती आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये देशांतर्गत बाजारपेठेत कंपनीने सहा नवी उत्पादने सादर केली. तणनाशक आणि बुरशीनाशक श्रेणीमध्ये प्रत्येकी एक उत्पादनासह कंपनीने कीटकनाशकांच्या श्रेणीमध्ये चार नवी उत्पादने सादर केली. आगामी १२ ते १८ महिन्यांत देशांतर्गत बाजारात ६ ते ८ नवी उत्पादने आणण्याचा कंपनीच्या व्यवस्थापनाचा मानस आहे. सर्वसमावेशक वितरण नेटवर्क, ब्रँडेड पोर्टफोलिओ, निर्यातीचा वाढता वाटा, नावीन्यपूर्ण उत्पादने; त्याचप्रमाणे कंपनीची रिसर्च अँड डेव्हलपमेंट क्षमता कंपनीला स्पर्धात्मक वैशिष्ट्ये प्रदान करतात. जाहीर झालेल्या निकालांनुसार, कंपनीने निर्यात व्यवसायातील वाढीचा वेग कायम ठेवला आहे. कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे. गुंतविलेल्या भांडवलावर २० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत ही कंपनी व्यवसायात प्रगती करीत आहे. आगामी काळातील व्यवसायवृद्धीची क्षमता लक्षात घेता, दीर्घावधीच्यादृष्टीने या कंपनीच्या शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल.

फिएम इंडस्ट्रीज

फिएम इंडस्ट्रीजची स्थापना १९८९ मध्ये जे. के. जैन यांनी केली. कंपनी २००६ मध्ये बीएसई आणि एनएसई यांवर सूचिबद्ध झाली. ही प्रामुख्याने दुचाकींसाठी प्रकाशयोजना, मागील दृश्याचे आरसे आणि प्लास्टिक-मोल्डेड भागांचा पुरवठा करणारी कंपनी आहे. कंपनीचा प्रमुख व्यवसाय ऑटोमोबाईल उद्योगातील टू-व्हीलर विभागातून येतो. भारतातील एकूण टू-व्हीलर हेडलॅम्प मार्केटमध्ये या कंपनीचा सुमारे २७ टक्के बाजारहिस्सा आहे. कंपनीकडे ‘ओइम’ ग्राहक उत्पादकांच्या जवळ असलेल्या नऊ उत्पादनसुविधा आहेत; ज्यामुळे ग्राहक निगडित लॉजिस्टिक अर्थात दळणवळणाच्या खर्चात बचत होण्यास मदत होते. कर्जाचे प्रमाण अत्यल्प ठेवून गुंतविलेल्या भांडवलावर १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत कंपनी व्यवसायात प्रगती करीत आहे. जाहीर झालेल्या निकालानुसार, फिएम इंडस्ट्रीज ही कंपनी वेगाने विकसित होऊ शकणाऱ्या ऑटोमोटिव्ह लायटिंग उद्योगात प्रगती करताना दिसत आहे. कंपनीकडे भारत, इटली; तसेच जपानमध्ये असलेल्या तीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट; त्याचप्रमाणे डिझाइन केंद्रांची ताकद आहे. सध्या वाहनविक्री उद्योग अनेक आव्हानांचा सामना करीत आहे. मात्र, दीर्घावधीमध्ये वाहनविक्री क्षेत्रातील सुधारणा लक्षात घेता, या क्षेत्राशी निगडित फिएम इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअरकडे लक्ष ठेवणे हितावह ठरू शकेल. या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com