रोखे बाजारातील मरगळ अल्पजीवी

Share-Market
Share-Market

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक, त्याच्या सर्वकालीन उच्चांकापासून काही आठवड्यांतच जवळपास नऊ हजार अंशांनी घसरला आहे. कोरोना विषाणूची भीती, भारतीय बॅंकांमध्ये झालेले गैरप्रकार आणि केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी शेअरबाजाराला आलेली सूज ही या घसरणीची मुख्य कारणे आहेत. यातील कोरोनाचे कारण जागतिक स्तरावरचे आहे, मात्र यातील भीतीचा परिणाम किती आणि सत्यस्थिती काय हे तपासावे लागेल. पहिली गोष्ट म्हणजे सध्या जागतिक अर्थव्यवस्थेची गती कुंठित झाली आहे. चीन आणि भारत वगळता ‘जीडीपी’चा साडेचार टक्के विकासदर अन्य कोणाही देशाकडे नाही. त्यातही चीन जे बोलतो व करतो, त्यात मोठी तफावत असते, त्यामुळे चीनमधून झालेल्या कोरोना विषाणूचा प्रसार नेमका कशामुळे झाला, याबाबत जगामध्ये भीतीचे वातावरण आहे.

चीनने जैविक अस्त्रांची चाचणी करताना या रोगजंतूंचा फैलाव हाताबाहेर गेला असेल तर यापुढे आपल्याला अशा जैविक युद्धाला तोंड द्यावे लागेल का, ही भीती सर्व शेअर बाजारांना सतावते आहे. अमेरिका व चीनच्या अर्थव्यवस्थेत संरक्षण उद्योगांचा वाटा २१ ते ३२ टक्के एवढा असल्याने, या अशा शंका गांभीर्याने घेतल्या जात आहेत. केवळ संरक्षण उद्योगच नव्हे, तर भारतासाठी आणि जगासाठी मोबाईल उद्योग, बॅटरी, रसायने, औषधे, गृहोपयोगी वस्तू व त्यांचे सुटे भाग यांचे चीनमध्ये उत्पादन होते. जगातील ९० टक्के उपरोक्त साहित्य हे चीनमध्ये तयार होते. अजूनही एक ते दोन महिने तेथील उद्योगधंदे बंद राहणार असल्याने जगात या वस्तूंची मागणी वाढणार आहे व त्यामुळे त्यांचा तुटवडा निर्माण होईल.

तेलाचे भावही घसरणार 
चीनमधील उत्पादन थंडावल्याने कच्च्या तेलाची मागणीही मंदावली आहे. आपल्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होईल, या भीतीने तेलावरच अवलंबून असलेले देश आजची मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन वाढवीत आहेत, त्यामुळे भाव आणखी घसरत आहेत. अशा स्थितीत नेहमी अन्य देश कमी दरातच भविष्यातही तेल विकत घेण्याचे करार करतात. मात्र सध्याची मंदी पाहता पुढेही तेलाची मागणी कायम राहील अशी शंका सर्वांनाच असल्याने कोणीही देश सध्या भविष्यातील तेल खरेदीचे करार करताना दिसत नाही. अशा स्थितीत उत्पादन वाढले पण मागणी नसल्याने दर घसरत आहेत. पिंपामागे ४५ डॉलरवरून २८ पर्यंत आलेले हे दर भविष्यात २० पर्यंतही घसरण्याची शक्‍यता आहे. 

सोनेही घसरले 
खरे पाहता शेअर बाजार, कच्चे तेल व सोने यांचे दर परस्परविरोधी असतात, म्हणजे एकाचे दर वाढले वा घसरले की त्याचा दुसऱ्यावर उलटाच परिणाम होतो. सोने आता आता वाढू लागले आहे, मात्र त्यापूर्वी शेअर बाजार आणि तेल यांच्याबरोबर सोनेही घसरत होते. सव्वाशे वर्षांच्या इतिहासात बहुधा प्रथमच या तीनही बाबींचे दर एकाच वेळी खाली येत होते. सोने हा धातू सर्वकालिक व सार्वत्रिक मूल्यवान असल्याने आता अस्थिर परिस्थितीत त्यात वाढ होत आहे.  भारतातील मुख्य समस्या कोरोना नसल्याने गुंतवणूकदारांनी आतापर्यंत म्युचुअल फंडांमध्ये निधी गुंतवला असेल तर त्यांनी घाईघाईने त्यातून अजिबात बाहेर पडू नये. जे गुंतवणूकदार थेट शेअर बाजारात व्यवहार करतात त्यांनीही निदान पंधरा दिवस नवी खरेदी करू नये. एकंदर अर्थव्यवस्थेची वाटचाल पाहता, बॅंकांमधील मुदतठेवींचे व्याजदर आगामी काळात फार वाढणार नाहीत, त्यामुळे ४० वर्षांच्या पुढील गुंतवणूकदारांनी आपल्याकडील निधी पेन्शन योजनेत (एनपीएस किंवा म्युचुअल फंडांच्या पेन्शन योजना) गुंतवला तर त्यांना दीर्घकालीन फायदा होईल. पन्नास-पंचावन्नपेक्षा जास्त वयाच्या गुंतवणूकदारांनी तर डिबेंचर किंवा सरकारी रोख्यांमध्ये पैसे न गुंतवता पेन्शन योजनांमध्येच गुंतवावेत.

औद्योगिक परिणाम 
चीनमध्ये उत्पादित होणारा कच्चा माल मिळत नसल्याचा परिणाम पुढील तीन ते सहा महिने जाणवेलच. मात्र एक गोष्ट खरी की कोरोनाची भीती संपली की भांडवलशाही व्यवस्था राबवणारा चीन पुन्हा दुप्पट वेगाने उत्पादनाकडे लक्ष देईल. त्यामुळे या मंदीचे परिणाम अल्पकालीन जरूर होतील, मात्र ते परिणाम दीर्घकालीन राहणार नाहीत हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com