'बीएसएनएल'चे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

मुंबई - भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनीतील देशभरातील दोन लाख कर्मचारी आणि अधिकारी विविध मागण्यांसाठी उद्यापासून (ता. 3) बेमुदत संपावर जाणार आहेत. दूरसंचार क्षेत्रातील तीव्र स्पर्धा आणि सरकारची धोरणे "बीएसएनएल'च्या वृद्धीसाठी मारक ठरली असून, कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय दूरसंचार धोरणामुळे खासगी कंपन्यांना मुक्त प्रवेश मिळाला. खासगी कंपन्यांनी विदेशातून येणारे कॉल देशातून आल्याचे दाखवून बीएसएनएल या सार्वजनिक कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान केले. मोबाईल सेवेबाबतही सरकारच्या धोरणांमुळे बीएसएनएलची कोंडी झाल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.

'बीएसएनएल'च्या 65 हजार मनोऱ्यांच्या व्यवसायाचे विभाजन करण्याचा सरकारने घाट घातला आहे. मनोऱ्यांचा व्यवसाय विभक्‍त केल्यास कंपनी आणखी डबघाईला येईल, अशी भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली असून, त्याविरोधात देशव्यापी बंदची हाक दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BSNL Employee on Strike