Budget 2020:सरंक्षण क्षेत्राला आर्थिक 'जोश'च नाही

सैकत दत्ता, संरक्षण विश्‍लेषक
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

तरतुदी
 संरक्षण क्षेत्राच्या तरतुदीत किरकोळ ५ टक्के वाढ 
 तरतूद ४.३ लाख कोटी रुपयांवरून ४.७ लाख कोटी रुपये 
 आधुनिकीकरणासाठी १.१० लाख कोटी रुपये 
 आधुनिकीकरणासाठी केवळ १० हजार कोटींची वाढ 
 निवृत्तिवेतनासाठी १.३३ लाख कोटी रुपये 

परिणाम
 तरतुदीतील सर्वांत मोठा भाग वेतन आणि निवृत्तिवेतनावर खर्च 
 महागाईच्या दरात झालेल्या वाढीचा तरतुदींमध्ये विचार नाही 
 आधुनिकीकरणासाठी हाती कोणताही निधी राहणार नाही 
 शस्त्रास्त्र खरेदी प्रक्रियेला निधीअभावी खीळ बसणार 

पुढील पाच वर्षांची दिशा
 संरक्षण क्षेत्रावरील खर्च ‘जीडीपी’च्या किमान ३ टक्के हवा 
 आगामी धोके तपासून संरक्षण दलांचे आधुनिकीकरण करावे 
 राष्ट्रीय सुरक्षा धोरण आखावे 
 विशेष पथकांच्या क्षमता वाढवाव्यात 

अर्थसंकल्प 2020 : सलग दुसऱ्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाषणात संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदींचा उल्लेख केला नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत तरतुदींमध्ये केवळ ५ टक्के वाढ करण्यात आली असून, महागाईच्या दराचा विचार करता, ही वाढ तुटपुंजी आहे. या अर्थसंकल्पात तिन्ही संरक्षण दले आणि भारतीय किनारा रक्षक दलाला आधुनिकीकरणासाठी अतिशय कमी निधी कमी मिळाला आहे. तरतुदींपैकी मोठा हिस्सा वेतन आणि निवृत्तिवेतनासाठी खर्च होईल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संरक्षण दलांसाठी ही वाईट बातमी आहे. हवाई दलाला ४५ लढाऊ विमानांच्या तुकडीसाठी मंजुरी देण्यात आली होती ती संख्या आता २८वर आणावी लागेल. आधी मंजूर केलेल्या ४५ तुकड्यांसाठी ३०६ लढाऊ विमाने आवश्‍यक आहेत. एप्रिल २०१६ मध्ये झालेल्या करारानुसार केवळ ३६ राफेल विमाने मिळणार आहेत.

पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैशे महंमदच्या दहशतवादी तळावर हल्ला करण्यासाठी ४० वर्षे जुन्या असलेल्या मिराज २००० विमानांचा वापर करावा लागला होता. या विमानातून क्रिस्टल क्षेपणास्त्राचा मारा यशस्वीपणे न करता आल्याने मुख्य लक्ष्य चुकले. 

भारतीय नौदलासमोरही अशीच समस्या आहे. नौदलाकडे केवळ ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही एकच विमानवाहू नौका असून, स्वदेशी बनावटीची विमानवाहू नौका अद्याप वापरात नाही. केवळ १० पाणबुड्या असून, त्या सोव्हिएत काळातील आणि जर्मन एचडीडब्लू पाणबुड्या आहेत. सहा फ्रेंच स्कॉर्पिन पाणबुड्यांपैकी केवळ एकच सध्या चालू आहे. नौदलाला चिनी नौदलाला रोखण्यासाठी किमान आणखी २० पाणबुड्यांची आवश्‍यकता आहे. याउलट चीन विमानवाहू नौका तयार करीत असून, त्यांच्या पाणबुड्या जगात सर्वांत कमी आवाज करणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे त्यांचा शोध घेणे अशक्‍य बनते. 

भारतीय लष्कर १९८८ मध्ये बनविलेल्या इन्सास बंदुकींचा वापर करीत असून, त्या इतरत्र अतिशय कमी वापरात दिसतात. त्याचबरोबर रशियाकडून घेतलेल्या टी-७० आणि टी-९० रणगाड्यांचा वापर करण्यात येत असून, इतर देशांकडून त्यांचा वापर अगदी नगण्य आहे. मुख्य शस्त्र म्हणून अद्याप बोफोर्स तोफांचा वापर सुरू असून, त्या १९८० मध्ये खरेदी करण्यात आल्या आहेत. आधुनिकीकरणासाठी निधी नसल्यास भारतीय लष्कराची लढण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. याचवेळी चीन अतिशय वेगाने संरक्षण दलाचे आधुनिकीकरण करीत आहे. 

अनेक वर्षे कमी तरतूद केल्याने भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या यशस्वीपणे युद्ध करण्याच्या क्षमतेवर मोठा आणि जलद परिणाम होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना भारतीय संरक्षण दले केवळ सात ते आठ दिवसांत पाकिस्तानला युद्धात हरवू शकेल, असे सांगितले होते. अशा कमी तरतुदीत भारत युद्धात पाकिस्तानपासून स्वतःचे संरक्षण करू शकला तरी सुदैव म्हणावे लागेल. चीन आता देशाबाहेर लष्करी तळ स्थापन करीत असून, भारतीय लष्कराच्या तुलनेत वर्चस्व प्रस्थापित करीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Budget 2020 defance sector infromation marathi