Budget Session 2023 : भारताच्या बजेटकडे संपूर्ण जगाचे लक्ष, अर्थसंकल्प अधिवेशनाआधी PM मोदींची ललकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Budget Session 2023

Budget Session 2023 : भारताच्या बजेटकडे संपूर्ण जगाचे लक्ष, अर्थसंकल्प अधिवेशनाआधी PM मोदींची ललकार

Budget Session 2023 : आजपासून संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होईल, परंतु बीआरएस (BRS) आणि आम आदमी पार्टी (AAP) यांच्यासह अनेक विरोधी पक्ष भाषणावर बहिष्कार टाकू शकतात.

आज संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी माध्यमांशी संवाद साधला.

आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संदेश गेला आहे. ते म्हणाले की आज राष्ट्रपतींचे अभिभाषणही होईल, जो देशासाठी अभिमानाचा क्षण असेल.

‘भारत प्रथम, नागरिक प्रथम’ हा विचार घेऊन आम्ही संसदेचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढे नेणार आहोत. मला आशा आहे की विरोधी पक्षाचे नेते संसदेसमोर आपले मत मांडतील पंतप्रधान मोदी म्हणाले.

जागतिक आर्थिक परिस्थितीमध्ये, भारताचा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, यासाठी निर्मला सीतारामन या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील असा माझा ठाम विश्वास आहे. असेही पंतप्रधान म्हणाले.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

आम आदमी पार्टी (AAP) मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पारंपारिक भाषणावर बहिष्कार घालणार आहे.

ट्विटरवर, आप आमदार संजय सिंह यांनी मंगळवारी सांगितले की, पक्ष राष्ट्रपतींच्या भाषणावर बहिष्कार टाकत आहे कारण त्यांचे भाषण नरेंद्र मोदी-सरकारच्या खोट्या आश्वासनांवर आधारित आहे.

सकाळी 11 वाजता राष्ट्रपतींचे अभिभाषण :

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मंगळवारी सकाळी 11 वाजता सेंट्रल हॉलमध्ये लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पहिल्या अभिभाषणाने सुरू होईल.