
T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल
येत्या २७ जानेवारी २०२३ पासून पुढे तुम्ही आज शेअर खरेदी केले, तर उद्या ते तुमच्या डी-मॅट खात्यात जमा होतील; तसेच आज शेअर विकले, तर उद्या त्यांचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील..काय आहे ही पद्धत
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच २७ जानेवारी २०२३ पासून भारतीय शेअर बाजारातील सर्व शेअरच्या व्यवहारांचे सेटलमेंट ‘टी+१’ तत्त्वावर होणार आहे. ही निश्चितच सर्व भारतीयांना अभिमानाची गोष्ट आहे, कारण चीन वगळता जगातील कोणत्याच देशात अजून ‘टी+ १’ ही सेटलमेंटची पद्धत अंमलात आलेली नाही. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान यांसारख्या प्रगत देशांतसुद्धा अजूनही शेअर बाजारातील व्यवहारांची पूर्तता ‘टी+२’ पद्धतीने करण्यात येते. (T Plus One Settlement in Indian Share Market)
भारतीय भांडवली बाजाराची नियामक संस्था ‘सेबी’ने मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजाराला ‘टी+१’ ही पद्धत टप्प्याटप्प्यात लागू करण्यास सांगितले होते. त्या सूचनेनुसार २५ फेब्रुवारी २०२२ पासून मार्केट कॅपिटलायझेशनच्या अनुक्रमानुसार सर्वांत लहान १०० कंपन्यांना सर्वप्रथम ही पद्धत लागू करण्यात आली. २५ मार्च २०२२ रोजी अजून ५०० छोट्या कंपन्यांना ‘टी+१’ पद्धत लागू झाली.
त्यापुढील दर महिन्याला अजून ५०० कंपन्यांना या पद्धतीखाली आणण्यात आले. राष्ट्रीय शेअर बाजारात सुमारे १८००, तर मुंबई शेअर बाजारात ५००० पेक्षा अधिक कंपन्यांचे व्यवहार होत असल्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण व्हायला २७ जानेवारी २०२३ चा दिवस उजाडणार! या दिवसापासून वायदा बाजारात व्यवहार होणाऱ्या १९१ मोठ्या कंपन्या ‘टी+१’ सेटलमेंटखाली येणार आहेत.
आता ही ‘टी+२’, ‘टी+१’ संकल्पना काय आहे, ते समजून घेऊ. टी म्हणजे ट्रॅन्झॅक्शनचा दिवस, ज्या दिवशी तुम्ही शेअर बाजारात खरेदी अथवा विक्रीचा व्यवहार करता. +२/+१ म्हणजे या व्यवहाराच्या पूर्ततेला लागणारे दिवस. जेव्हा आपण शेअर बाजारातून शेअर खरेदी करतो, तेव्हा खरेदीदाराच्या डी-मॅट खात्यात शेअर जमा होतात व शेअर विकणाऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होतात, तेव्हाच तो व्यवहार पूर्ण झाला, असे म्हणतात. याला तांत्रिक भाषेत ‘सेटलमेंट’ म्हणतात. पूर्वी शेअर सर्टिफिकेट जेव्हा कागदी स्वरूपात होती, तेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होण्यास दोन ते तीन आठवडे लागत असत. सर्टिफिकेट हरवल्यास अथवा ‘ट्रान्स्फर डीड’वरील सही न जुळल्यास अजूनच वेळ लागत असे.
आठवड्याभरात केलेल्या व्यवहारांचे सेटलमेंट एकाच दिवशी होत असे, त्याला ‘वीकली अकाउंट सेटलमेंट’ म्हणण्यात येत असे. नंतर १९९६ पासून डी-मॅट आले व टी+५ पद्धत अस्तित्वात आली. एप्रिल २००२ पासून ‘टी+३’ व एप्रिल २००३ पासून ‘टी+२’ ही पद्धत आणण्यात आली, म्हणजेच ‘सेटलमेंट’चा एक दिवस कमी करायला आपल्याला वीस वर्षे वाट पाहावी लागली! असो, ‘देर आये दुरुस्त आये’! ‘वीकली सेटलमेंट’च्या जागी ‘रोलिंग सेटलमेंट’ (रोजच्या रोज) झाल्याने, नेट बँकिंग व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ‘सेटलमेंट’चा वेळ कमी करणे शक्य झाले. सुमारे ‘टी+२०’ पासून ते ‘टी+१’ पर्यंतचा हा प्रवास खरोखरच अद्भुत आहे.
येत्या २७ जानेवारी २०२३ पासून पुढे तुम्ही आज शेअर खरेदी केले, तर उद्या ते तुमच्या डी-मॅट खात्यात जमा होतील; तसेच आज शेअर विकले, तर उद्या त्यांचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील! या सुधारणेमुळे गुंतवणूकदारांच्या पैशाचे ‘रोटेशन’ वेगाने होईल व शेअर बाजारातील उलाढाल वाढेल, अशी अपेक्षा आहे.
(लेखक गुंतवणूक क्षेत्रातील अनुभवी अभ्यासक-विश्लेषक आहेत.)