
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरु होणार आहे.
नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यावेळी ते दोन टप्प्यात होणार असून 8 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. यात एक फेब्रुवारीला संसदेत आर्थिक वर्ष 2021-22 चा अर्थसंकल्प सादर केला जाईल.
लोकसभा सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार अर्थसंकल्पाचा पहिला टप्पा 29 जानेवारीला सुरु होईल आणि 15 फेब्रुवारीपर्यंत चालेल. तर दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद 29 जानेवारीला सकाळी 11 वाजता लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. तर अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता सादर केला जाईल.
हे वाचा - सप्टेंबर 2021 पर्यंत बँकांचा NPA वाढण्याची शक्यता; RBIने प्रसिद्ध केला रिपोर्ट
संसदीय कामकाज मंत्रिमंडलाच्या समितीने 29 जानेवारीला अर्थसंकल्पाच्या अधिवेशानसाठी शिफारस केली होती. या अधिवेशनामध्ये कोरोना व्हायरसशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचं पालन करण्यात येईल अशीही माहिती देण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसमुळे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आलं होतं. सरकारने सांगितलं होतं की, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे यावेळचे हिवाळी अधिवेशन होणार नाही. सरकारच्या या निर्णयावरून विरोधकांनी घेरलं होतं. काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांनी म्हटलं होतं की, संसदेचं अधिवेशन घ्यायला हवं होतं, शेतकऱ्यांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होण्यासाठी ते गरजेचं आहे. त्यानंतर मोदी सरकारचे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांना पत्र लिहून सांगितलं होतं की, सर्व पक्षांसोबत केलेल्या चर्चेनंतरच अधिवेशन न घेण्याचा निर्णय घेतला गेला होता.