व्यापारातील समस्या सोडवा - सुरेश प्रभू

पीटीआय
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

भारतासोबतच्या व्यापारात निर्माण झालेल्या समस्यांवर मार्ग काढावा, असा प्रस्ताव अमेरिकेसमोर मांडण्यात आल्याची माहिती वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी दिली.

नवी दिल्ली - भारतासोबतच्या व्यापारात निर्माण झालेल्या समस्यांवर मार्ग काढावा, असा प्रस्ताव अमेरिकेसमोर मांडण्यात आल्याची माहिती वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी दिली.

अमेरिका आपल्या कृषी, डेअरी उत्पादने तसेच वैद्यकीय उपकरणांना भारतीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी आग्रही आहे. याबरोबर भारताकडून आयात होणाऱ्या उत्पादनांवरील शुल्कात कपात करण्याची अमेरिकेची मागणी आहे. शिवाय व्यापारी तूट भरून काढण्यासाठीही अमेरिका प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना प्रभू म्हणाले, ‘‘अमेरिकेच्या या मागण्या कृषी व आयटी क्षेत्राशी निगडित असून, त्यानुषंगाने संबंधित मंत्रालयांशी आम्ही चर्चा केली आहे. यावर एक प्रस्ताव तयार करून तो अमेरिकेला पाठविला असून, द्विपक्षी व्यापारात उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण करावे, अशी अपेक्षा त्याद्वारे व्यक्त केली आहे.’’

या प्रस्तावाबाबत अधिक माहिती देण्याचे प्रभू यांनी टाळले. व्यापारासंदर्भात दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरू असून, भारताचा ‘जीएसपी’अंतर्गत प्राधान्यक्रमाचा दर्जा काढून घेण्याचा निर्णय अमेरिकेने नुकताच जाहीर केला आहे.

गेल्या वर्षभरात अमेरिकेकडून झालेली आयात सुमारे ४८ टक्‍क्‍यांनी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. यात संरक्षण दलांशी संबंधित सामग्रीचा समावेश केलेला नाही. आगामी काळात भारताची एक हजार विमाने खरेदी करण्याची योजना असून, यात अमेरिका मोठा पुरवठादार असू शकतो.
- सुरेश प्रभू, वाणिज्य व उद्योगमंत्री

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Business Issue Solve America Suresh Prabhu