‘पीएनबी’मध्येच ‘एलओयू’ गैरव्यवहार

‘पीएनबी’मध्येच ‘एलओयू’ गैरव्यवहार

नवी दिल्ली - सर्व सार्वजनिक बॅंकांनी त्यांनी दिलेल्या ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’ची (एलओयू) तपासणी केली आहे. यामध्ये पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) दिलेल्या ‘एलओयू’वगळता अन्य बॅंकांनी दिलेल्या ‘एलओयू’मध्ये फसवणूक झालेली नाही, अशी माहिती स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) गुरुवारी दिली. 

अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्‍सी यांनी बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून ‘एलओयू’च्या माध्यमातून ‘पीएनबी’ची १२ हजार ९६८ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. यामुळे नुकतीच रिझर्व्ह बॅंकेने व्यापारासाठी अर्थसाह्य म्हणून ‘एलओयू’ आणि लेटर ऑफ कम्फर्ट (एलओसी) देण्यावर सर्व बॅंकांना बंदी घातली आहे. 

या पार्श्‍वभूमीवर सर्व सरकारी बॅंकांचे मुख्य तांत्रिक अधिकारी आणि मुख्य जोखीम अधिकाऱ्यांची कार्यशाळा ‘एसबीआय’ने आज घेतली. या वेळी बोलताना ‘एसबीआय’चे उपव्यवस्थापकीय संचालक एम. एस. शास्त्री म्हणाले, की सर्व बॅंकांनी त्यांनी दिलेल्या ‘एलओयू’ची तपासणी केली आहे. ‘पीएनबी’वगळता अन्य सर्व बॅंकांनी दिलेल्या ‘एलओयू’ योग्य पद्धतीने देण्यात आलेल्या आहेत. त्यांची नोंदही योग्य पद्धतीने करण्यात आली आहे.

आणखी एक गैरव्यवहार उघड
पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये (पीएनबी) लेटर ऑफ अंडरटेकिंगच्या (एलओयू) माध्यमातून झालेला नवा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. चंद्री पेपर्स अँड अलाईड प्रॉडक्‍ट्‌सने ‘पीएनबी’च्या मुंबईतील ब्रॅडी हाउस शाखेतून नऊ कोटी रुपयांच्या ‘एलओयू’ मिळवून फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. 

‘पीएनबी’चे निवृत्त अधिकारी गोकूळनाथ शेट्टी आणि सिंगल विंडो ऑपरेटर मनोज खरात यांच्यावर नव्या गैरव्यवहारामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी यांनी केलेल्या साडेतेरा हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातही शेट्टी आणि खरात आरोपी आहेत. सीबीआयने चंद्रा पेपर्स अँड अलाईड प्रॉडक्‍ट्‌सचे संचालक आदित्य रासीवासिया आणि ईश्‍वरदास अगरवाल यांच्यावरही गुन्हा दाखल केला  आहे. 

सीबीआयने या प्रकरणी अनेक ठिकाणी छापेही घातले आहेत. शेट्टी आणि खरात यांच्याशी हातमिळविणी करून रासीवासिया आणि अग्रवाल यांनी १४ लाख डॉलरच्या (९.०९ कोटी रुपये) एलओयू ‘पीएनबी’कडून घेतल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com