शेअर बाजारात 'संधी'चा काळ

मंदार जामसंडेकर
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

शेअर खरेदीसाठी निवडताना गुंतवणूकदारांनी स्वतःदेखील काही गोष्टी प्रकर्षाने बघून घेणे आवश्‍यक आहे.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी गेल्या दोन महिन्यांमध्ये 12 हजार 103 या उच्चांकी पातळीवरून 10 हजार 848 या नीचांकी पातळीपर्यंत पोचला आहे. या कालावधीत 1100 अंशांची घसरण झाली. मात्र, गेल्या तीन वर्षांमध्ये अशा पद्धतीचे "करेक्‍शन' अर्थात घसरण तीनदा होऊन गेली आहे. 

सप्टेंबर ते डिसेंबर 2016 मध्ये 1075 अंश, डिसेंबर 2017 ते मार्च 2018 मध्ये 1214 अंश आणि सप्टेंबर ते ऑक्‍टोबर 2018 मध्ये 1756 अंशांची घसरण झाली आहे. सर्वात आशादायी बाब म्हणजे या सगळ्या पडझडीनंतर निफ्टीने एक नवीन उच्चांकदेखील गाठला आहे. सध्या निफ्टी एका चांगल्या आधार पातळीजवळ पोचला आहे. निफ्टीचा साप्ताहिक तक्‍त्यावर जर जानेवारी 2016 पासून आतापर्यंतच्या कालावधीमध्ये नीचतम म्हणजेच कमी किमतीच्या पातळ्या (लो लेव्हल्स) जोडून एक ट्रेंड लाइन काढली, तर लक्षात येईल, की निफ्टीने केलेला नीचांक हा त्या पातळीवरील "सपोर्ट' अर्थात आधार बनला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये निफ्टीमध्ये अनेक आधार पातळ्या बघायला मिळाल्या. सध्या निफ्टी 10 हजार 850 पासून 10 हजार 600 या आधार पातळी दरम्यान आहे. त्यावरून असे लक्षात येईल, की सध्याची जी पडझड आहे, ती या पातळीदरम्यान थांबणे अपेक्षित आहे. 

अर्थात, जर निफ्टीच्या सध्याचा पातळीला आधार (सपोर्ट) असेल, तर निफ्टीची पुढील चाल कशी असेल, हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. सध्या तिमाही आर्थिक निकालांचा मोसम आहे, त्यामुळे सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही पद्धतीचे निकाल बघायला मिळणार आहेत. त्यामुळे जोपर्यंत तिमाही निकाल येत राहतील, तोपर्यंत निफ्टी सध्याच्या 10 हजार 850 ते 10 हजार 600 पातळीदरम्यान एक भक्कम पाया बनविण्याचा प्रयत्न करेल. 

ज्याप्रमाणे "प्राइज करेक्‍शन' असते म्हणजेच शेअरच्या किमती किंवा निर्देशांक खाली येतो, त्याचप्रमाणे "टाइम करेक्‍शन' असते, ज्यामध्ये काही दिवस शेअरच्या किमती किंवा निर्देशांक एकाच ठिकाणी स्थिर असतो. तशाच एका कालावधीमधून निफ्टी जाणार आहे. या काळात निफ्टी इंट्राडेमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात अस्थिरता बघायला मिळण्याची शक्‍यता आहे. निफ्टीने पुन्हा 12 हजार अंशांची पातळी ओलंडण्याकरिता कंपन्यांच्या कामगिरीत सुधारणा होणे गरजेचे आहे. जोपर्यंत बाजारातील कंपन्यांचा नफा वाढत नाही, तोपर्यंत निफ्टी 10 हजार 600 ते 11 हजार 600, तर कमाल 12 हजार अंशांच्या पातळीत व्यवहार करत राहील. 

परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांवरील कर (एफपीआय टॅक्‍स), "लिक्विडिटी'चे संकट अशा घटनांमुळे शेअर बाजारात निराशेचे वातावरण आहे. निराशेचा हा काळ जाण्यासाठी "टाइम करेक्‍शन'चा काळ महत्त्वाचा आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी आपल्याकडे असलेल्या विविध कंपन्यांच्या शेअरचा आढावा घेणे गरजेचे आहे. शिवाय, तज्ज्ञ सल्लागाराच्या मदतीने चांगल्या कंपनीचे शेअर खरेदी करायला हवेत. 

शेअर खरेदी करताना...! 

शेअर खरेदीसाठी निवडताना गुंतवणूकदारांनी स्वतःदेखील काही गोष्टी प्रकर्षाने बघून घेणे आवश्‍यक आहे. ज्या कंपनीचे शेअर घेणार आहोत, त्या कंपनीने सरलेल्या दोन ते तीन तिमाहींमध्ये सकारात्मक कामगिरी केलेली असावी. शिवाय, "टेक्‍निकल' विश्‍लेषणानुसार शेअरने चार्टवर सकारात्मक आधार पातळी घेतली पाहिजे. ज्या कंपनीमध्ये कम्प्लायन्स, अकाउंट्‌स आणि ऑडिट किंवा प्रवर्तकांशी निगडित समस्या आहेत, अशा कंपनीमध्ये गुंतवणूक करू नये. 

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस शेअर बाजार कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीत कामगिरीचे अंदाज बांधायला सुरवात करेल. कंपन्यांची पहिल्या तिमाहीतील कामगिरीपेक्षा दुसऱ्या तिमाहीतील कामगिरी सरस ठरणार आहे. 

गुंतवणूकदारांनो... लक्षात ठेवा! 

शेअर बाजारात जेव्हा तेजीचा काळ असतो, त्या वेळी तुमच्यापर्यंत सगळ्या चांगल्या बातम्या येतात. जेव्हा मंदी असते, तेव्हा सगळीकडून फक्त नकारात्मक ऐकायला मिळते. हे शेअर बाजारात नेहमी घडते. मात्र, आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक आहे. शेअर बाजारात सध्याच्या परिस्थितीत कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Buying more shares in a falling market a good way to cover losses