T+1 Settlement म्हणजे काय? 25 फेब्रुवारीपासून होणाऱ्या बदलाविषयी जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

T+1 Settlement म्हणजे काय? 25 फेब्रुवारीपासून होणाऱ्या बदलाविषयी जाणून घ्या

- तेजाली शहासने

भारतीय शेअर बाजारात 25 फेब्रुवारी 2022 पासून एक महत्त्वाचा बदल घडणार आहे. सेबीची परवानगी मिळाल्यामुळे BSE आणि NSE हे शेअर बाजार व्यवहार पूर्ती अर्थात सेटलमेन्टसाठी टी+1 (T+1) चा वापर टप्प्याटप्प्याने सुरू करणार आहेत. यामुळे शेअर्स विकल्यावर त्याचे पैसे एका दिवसात मिळतील या पार्श्वभूमीवर शेअर्सचे व्यवहार, व्यवहार पूर्ती आणि इतर महत्त्वाची माहिती समजून घेऊ. (What Is T + 1 Settlement From 25 November in share Market)

शेअर व्यवहार कसा घडतो -

कुठल्याही समभाग व्यवहारात खरेदी-विक्री (ट्रेडिंग), हिशेब (क्लियरिंग) आणि पूर्तता (सेटलमेंट) हे तीन टप्पे येतात. यातला शेवटचा टप्पा, म्हणजे सेटलमेंटच्या टप्प्यासाठी लागणारा कालावधी या नव्या बदलामुळे एका दिवसाने कमी होईल.

सेटलमेंट -

सेटलमेंट म्हणजे व्यवहार पूर्ण होणे. सध्या शेअर बाजारात टी+2 (T+2) हे चक्र आहे. आपण शेअर विकत घेतल्यावर आपल्या खात्यातून पैसे लगेच वजा होतात, मात्र खात्यावर शेअर येण्यास दोन कामकाजी दिवस लागतात. याउलट शेअर विकल्यास शेअर लगेच वजा होतात मात्र खात्यावर पैसे येण्यास दोन कामकाजी दिवस लागतात. याच चक्राला टी+2 (T+2) सेटलमेंट सायकल म्हणतात. यात T म्हणजे ट्रान्झॅक्शन केलेला दिवस आणि +2 म्हणजे लागणारे दोन कामकाजी दिवस. यातच आता बदल होणार आहे.

बदल

आता हे व्यवहार पूर्ततेचं चक्र टी+2 (T+2) ऐवजी टी+1 (T+1 ) होणार आहे. आधी जे दोन दिवस लागत, त्याऐवजी व्यवहार एका दिवसात पूर्ण होईल. म्हणजे व्यवहार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुमच्या खात्यात शेअर्स अथवा पैसे जमा होतील.

अंमलबजावणी

व्यवहार पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ कमी होणं ही गुंतवणूकदारांसाठी आनंदाची गोष्ट असली तरीही याची सरसकट अंमलबजावणी होणार नाही. BSE आणि NSE हे दोन्ही शेअर बाजार ही व्यवस्था टप्प्याटप्प्याने लागू करणार आहेत. 25 फेब्रुवारी 2022 रोजी सर्व लिस्टेड कंपन्यांची उतरत्या क्रमाने क्रमवारी लावून तळातील 100 कंपन्यांना टी+1 (T+1) लागू होईल. पुढे मार्च 2022 पासून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी पुढच्या 500 कंपन्यांना टी+1 (T+1) लागू करण्यात येईल.

फायदे

यामुळे व्यवहारांचा वेग आणि बाजारातील उलाढाल वाढेल हे नक्कीच. किरकोळ गुंतवणूकदारांना नगदीची चणचण नेहमी भासते. व्यवहाराचा कालावधी कमी झाल्याने त्यांच्या हातात गुंतवणुकीसाठी अतिरिक्त रक्कम येईल. वेळ कमी झाल्यामुळे किमतीतील चढ उतरातील जोखीम कमी होईल. व्यवहारासाठी लागणारे मार्जिन देखील यामुळे कमी होईल व कमी पैशात अधिक गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होतील.

loading image
go to top