चंदा कोचर यांचा पाय आणखी खोलात; पतीची चौकशी 

वृत्तसंस्था
शनिवार, 31 मार्च 2018

आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांची गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई: आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांची गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओकॉनला कर्ज देताना गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्याने सीबीआयने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बॅंकेच्या इतर काही अधिकाऱ्यांची देखील चौकशी केली जाणार असल्याचे बोलले जात आहे 

समूहाला कर्ज मंजूर करताना आयसीआयसीआय बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घेतल्याचा आरोप एका वृत्तसंस्थेने केल्याने बॅंकिंग क्षेत्रात खळबळ उडाली होती. मात्र बँकेने कोचर यांना पाठिंबा देत दिलासा दिला. 'व्हिडिओकॉन ऑफ लेंडर्स'ला सुमारे तीन हजार कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. त्यामध्ये चंदा कोचर यांचा देखील सहभाग होता. मात्र चंदा कोचर यांची फक्त जबाबदारी नसून संपूर्ण बॅंकेची जबाबदारी असल्याची बॅंकेने भूमिका घेतली. आता मात्र चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांची सीबीआयमार्फत चौकशी होणार असल्याने चंदा कोचर यांच्या समोरील अडचणी देखील वाढण्याची शक्यता आहे. 

काय आहे प्रकरण: 
व्हिडीओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाळ धूत यांनी 2008 मध्ये चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्यासोबत एक कंपनी सुरु केली होती. शिवाय बँकेकडून 'व्हिडिओकॉन ऑफ लेंडर्स'ला सुमारे तीन हजार कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले. त्यानंतर फक्त 9 लाख रुपयात ती कंपनी दीपक कोचर यांना विकण्यात आली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CBI preliminary enquiry against Deepak Kochhar