Exclusive : कोरोनाच्या संकटात आयुर्विमा कवच किती महत्त्वाचे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 CEO and MD of HDFC Life, Vibha Padalkar

एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विभा पडळकर यांच्याशी ‘सकाळ मनी’चे संपादक मुकुंद लेले यांनी साधलेला संवाद. 

Exclusive : कोरोनाच्या संकटात आयुर्विमा कवच किती महत्त्वाचे?

‘कोविडच्या महासाथीच्या निमित्ताने, कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी आयुर्विमा हे एक मजबूत व उपयुक्त साधन म्हणून पुढे आले आहे. आयुर्विम्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी आता ग्राहक अधिक सक्रीय झाले असून, अशा प्रकारच्या विमा पॉलिसी विकत घेण्यामध्ये वाढ होत आहे. आयुष्यात विमा संरक्षणाचा प्रारंभ लवकर व्हावा, यावर विशेषत्वाने जोर देणे महत्त्वाचे आहे...’ एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विभा पडळकर यांच्याशी ‘सकाळ मनी’चे संपादक मुकुंद लेले यांनी साधलेला संवाद. 
 

प्रश्न :  कोरोना विषाणूच्या साथीने साऱ्या मानवी जीवनाला कलाटणी मिळाली आहे. आरोग्याबरोबरच आर्थिक संरक्षणाला महत्त्व प्राप्त झाले. महासाथीचा सर्वांवरच प्रभाव पडला आहे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील आर्थिक जोखीम कमी करण्यासाठी आयुर्विम्याचे महत्त्व कसे वाढले आहे? 

पडळकर  : कोविडच्या साथीच्या निमित्ताने, कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आयुर्विमा हे अधिक उपयुक्त व मजबूत साधन म्हणून पुढे आले आहे. आयुर्विम्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी वैयक्तिक ग्राहक अधिक सक्रीय झाले असून, अशा प्रकारच्या टर्म पॉलिसी विकत घेण्याचा कल वाढत आहे. आयुष्यात विमा संरक्षणाचा प्रारंभ लवकर व्हावा, यावर अधिक जोर देणे महत्त्वाचे आहे. तरूण वयात व्यक्तिगत विमा संरक्षण घेण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागत नाही. जनरल इन्शुरन्स कंपन्यांप्रमाणे लाइफ इन्शुरन्स कंपन्या आपल्या विमाहप्त्यांमध्ये बदल करू शकत नाहीत आणि म्हणूनच तरूणपणीच आयुर्विमा घेणे अधिक फायद्याचे ठरते. आयुर्विम्यासाठी विशेषतः टर्म प्लॅन्ससाठी ही एक प्रचंड व्यवसायवाढीची संधी आहे. भारतातील विमा क्षेत्राचा विचार करता, टर्म प्रोटेक्शनचे प्रमाण हे अजूनही एक आकडीच आहे आणि त्यामुळे यात बदलाची मोठी संधी आहे. सशक्त आणि मजबूत भारतासाठी जास्तीत जास्त किंबहुना सर्व भारतीयांकडे टर्म इन्शुरन्स असणे महत्त्वाचे आहे. 

भावा मला माफ कर, पण तेवढा मास्क घाल बघू

प्रश्न :  ‘टर्म इन्शुरन्स’ सर्वांसाठी का महत्त्वाचे असतो? 
पडळकर : स्वत:साठी व कुटुंबासाठी आर्थिक स्थैर्य सुनिश्‍चित करण्यासाठी भविष्याचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामध्ये भविष्यातील संभाव्य खर्च, जीवनातील अनिश्‍चिततांपासून संरक्षण, आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही सुरक्षित हातांमध्ये आहात ना, हे सुनिश्‍चित करणे महत्त्वाचे आहे. एखादी व्यक्ती जर निरोगी राहिली तर स्वत:ला आणि कुटुंबाला सांभाळू शकते. विशेषतः जर ती घरातील एकटी कमावती व्यक्ती असेल तर आपल्याला काही झाले तर कुटुंबाचे काय होईल, ही सतत काळजी त्याला किंवा तिला असते. त्या व्यक्तीला सतत वाटत असते, की आपण भविष्यात नसलो तरी आपले कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहायला हवे. टर्म इन्शुरन्स नेमके हेच काम करतो. म्हणजे दुर्दैवाने कोणाचा मृत्यु झाला तर विमा संरक्षण घेतलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला विम्याची रक्कम मिळते आणि पुढील आयुष्यातील आर्थिक अडचणी कमी होतात. टर्म इन्शुरन्स प्लॅन हा ठराविक रकमेसाठी आणि ठराविक काळासाठी तुम्हाला संरक्षित करतो. त्या काळात जर विमाधारकाचा मृत्यु झाला तर आयुर्विमा कंपनी ही नॉमिनी असलेल्या व्यक्तीला संरक्षित रक्कम हस्तांतरीत करते. एखादा चांगला टर्म इन्शुरन्स प्लॅन तुम्हाला मृत्यू, आजार आणि अपंगत्व म्हणजेच डेथ, डिसीज आणि डिसॅबिलिटी या आयुष्यातील तीनही महत्त्वाच्या ‘डी’पासून अधिक चांगले संरक्षण मिळवून देतो. टर्म इन्शुरन्स प्लॅन हे एकदम कमी विमा हप्त्यांमध्ये घेतले जाऊ शकतात. यातून वारसांना मिळणारी रक्कम त्यांच्या गरजांनुसार एकरकमी किंवा विभागून मिळू शकते. याशिवाय आपण भरत असलेल्या विमाहप्त्याला प्राप्तिकरामधून देखील वजावट मिळते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रश्न : कोविड महासाथीच्या काळात पहिल्या सहामाहीत तुमच्या कंपनीची कामगिरी कशी राहिली? 
पडळकर :  महासाथीमुळे आरोग्यावर झालेला परिणाम व मानवी जीवनात झालेली हानी याबाबत आम्ही संवेदनशील आहोत. आम्ही आमचे कर्मचारी, ग्राहक व भागीदार यांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित केले आहे. आर्थिक वर्षांची सुरवात आव्हानात्मकच होती. काही बंधने काढल्यावर आता अर्थव्यवस्था थोडी खुली झाली असून, व्यवसायाला चालना मिळत आहे. याचा परिणाम घरगुती उत्पन्न व खर्च करण्याच्या क्षमतेत देखील थोड्या-फार प्रमाणात दिसून येत आहे. वैयक्तिक विमाधारकांकडून एकूण गोळा केलेला हप्त्याचा (डब्ल्यूआरपी) विचार करता, बाजारपेठेतील आमचा हिस्सा आर्थिक वर्ष 2020 मधील पहिल्या सहामाहीत 15.2 टक्कयांवरून आर्थिक वर्ष 2021 मधील पहिल्या सहामाहीत 17.5 टक्क्यांवर पोचला असून, तो 2.35 टक्क्यांनी वाढला आहे. खासगी उद्योगाशी तुलना करता आमची कामगिरी उत्तम राहिली आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत 16 टक्के वृध्दी दर्शविलेल्या आयुर्विमा उद्योगाने यावर्षी वृध्दीत 11 टक्के घट नोंदवली आहे. समूह आणि एकंदर खासगी क्षेत्रातील नव्या बिझनेस सेंगमेंटमध्ये आमचा हिस्सा अनुक्रमे 27.4 टक्के आणि 23.3 टक्के आहे. 4.4 लाख विमा पॉलिसी विकत घेतल्या गेल्या असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत 6 टक्के वाढ नोंदविली आहे. 

प्रश्न : पहिल्या सहामाहीत अ‍ॅन्युईटी बिझनेसमध्ये (पेन्शन प्लॅन्स) वाढ बघायला मिळाली. आगामी काळात तुम्हाला यामध्ये काय संधी दिसत आहे? 

पडळकर : आमच्याकडे व्यवस्थापनाअंतर्गत असलेली मालमत्ता तिपटीने वाढून एक लाख कोटींपर्यंत पोचेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. यामध्ये पेन्शन किंवा अ‍ॅन्युईटी व्यवसायाचा देखील समावेश आहे. चांगल्या आरोग्यसेवेच्या उपलब्धतेमुळे लोकांचे आयुर्मान देखील वाढत चालले असून, यादरम्यान केलेली बचत देखील संपत आहे आणि त्यांना पेन्शनची गरज भासत आहे. आमच्या नावीन्यपूर्ण योजनांमध्ये वैविध्य असून, ग्राहक त्यांच्या गरजेप्रमाणे योजनांची व त्यातील विविध पर्यांयांची निवड करू शकतात. यामध्ये जॉईंट लाईफ अ‍ॅन्युईटी, रिटर्न ऑफ पर्चेस प्राईस किंवा इनक्रिझिंग अ‍ॅन्युईटी आदींचा समावेश असू शकतो. अशा पेन्शन प्लॅन्सना प्रतिसाद वाढताना दिसत आहे व यापुढेही तो वाढताना दिसेल, असे वाटते. मात्र, याबाबत निर्णय घेताना आपण किती कमावतो, याचा विचार करावा, नाहीतर यात जोखीम वाढू शकते. 

प्रश्न : बदलत्या परिस्थितीत डिजिटल तंत्रज्ञानाला महत्त्व वाढलेले दिसते. या आघाडीवर तुम्ही कोणती पावले उचलली? याबाबतीत तुमचे निरीक्षण काय आहे? 

पडळकर : सध्याच्या वातावरणाचा विचार करता, डिजिटल माध्यमातून संपर्क करणे हे आमच्या ग्राहकांना सोयिस्कर वाटत असल्याने आम्ही जूनमध्ये व्हिडिओवर आधारित विक्री सक्षमता साधन (व्हीव्हीआयएसई) सुरू केले. व्यवसायाच्या नव्या टप्प्यावर हे साधन समोरासमोर संवाद साधण्याचा अनुभव देते आणि याला छोट्या शहरांमधून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. मिळालेल्या प्रतिसादामुळे डिजिटल आणि मानवी संवादाचे संकरित मॉडेल विस्तारले आहे. हे साधन व्हर्च्युअल संवादाद्वारे अगदी दुर्गम भागातील ग्राहकांना देखील सेवा देण्यास व त्यांच्या प्रश्‍नांचे निराकरण करण्यास आमच्या कर्मचाऱ्यांना सक्षम करते. ऑनलाईन पेमेंटकडे ग्राहकांचा कल वाढत असून, 95 टक्के विमा पॉलिसींचे नूतनीकरण डिजिटली होत असून, या माध्यमातून एकंदर नूतनीकृत होणाऱ्या विमा हप्त्यांमध्ये याचे प्रमाण 88 टक्के आहे. 

प्रश्न : सध्याच्या कोविड महासाथीच्या काळात आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नेतृत्वाची काय भूमिका असायला हवी? 

पडळकर : या अनिश्‍चिततेच्या काळात आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नेतृत्वाची दुहेरी भूमिका असायला हवी. एक म्हणजे योग्य निर्णय घेणे आणि दुसरे म्हणजे इतरांसाठी सकारात्मक उदाहरण प्रस्थापित करायला हवे. अशा काळात नेतृत्वाला नियंत्रण अधिक कडक करणे आणि अधिकार मर्यादित ठेवावे, असे वाटू शकते. मात्र, वास्तविकदृष्ट्या विचार करता आश्‍वासन आणि मार्गदर्शनाची गरज आहे. संघटनात्मक लवचिकता ही व्यापक दृष्टीकोन ठेवत जलद निर्णय घेण्यावर अवलंबून असते. उदा. एचडीएफसी लाइफमध्ये कार्यकारी समिती सदस्याच्या नेतृत्वाखाली आम्ही झोनल टीम निर्माण केल्या आहेत, ज्या विविध भागातील परिस्थितीनुसार जलद निर्णय घेऊ शकतात. परिस्थितीशी जुळवून घेत लक्ष्यकेंद्रीत दृष्टीकोन असणे गरजेचे आहे. महासाथीच्या सुरवातीला व अधिकृत लॉकडाऊन होण्याआधी आम्ही आमची कार्यालये व शाखा बंद ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि डिजिटल माध्यमातून ग्राहकसेवा सुरू केली. मार्चमधील कर्मचाऱ्यांचे पगार देखील आम्ही आधीच देऊन कर्मचाऱ्यांसाठी विनामूल्य समुपदेशन हेल्पलाईन स्थापित केली. आमचे सल्लागार, ग्राहक, कर्मचारी व भागीदार हे सर्वजण आमच्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले आणि नव्या बदललेल्या जगाशी स्वत:ला जुळवून घेतले, ही आमच्यासाठी समाधानकारक बाब ठरली. या सामूहिक प्रयत्नांमुळे कोविडच्या पार्श्‍वभूमीवर सुधारित धोरणांसह एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी अधिक मजबूत बनली आहे. मार्चपासून प्रत्येक महिन्यात ग्राहकांकडून नव्या विमा पॉलिसी विकत घेतल्या गेल्यामुळे हा आलेख चढता राहिला असून, त्याचबरोबर खर्चावरही चांगले नियंत्रण मिळविले आहे. हे करत असताना तंत्रज्ञानामध्ये आवश्यक असलेली गुंतवणूक आम्ही केली आहे. 

प्रश्न : तुमच्यादृष्टीने आर्थिक नियोजनाचा आणि गुंतवणुकीचा मंत्र काय? 
पडळकर : प्रत्येक व्यक्तीने दरमहा काही प्रमाणात तरी बचत केली पाहिजे. वयानुसार, उत्पन्नानुसार योग्य विमा संरक्षण घेऊन त्यानुसार गुंतवणूक धोरण आखणे गरजेचे आहे. 

कोटस 
 
१) ‘‘भारतातील विमा क्षेत्राचा विचार करता, टर्म प्रोटेक्शनचे प्रमाण हे अजूनही एक आकडीच आहे आणि त्यामुळे यात बदलाची मोठी संधी आहे. सशक्त आणि मजबूत भारतासाठी जास्तीत जास्त किंबहुना सर्व भारतीयांकडे टर्म इन्शुरन्स असणे महत्त्वाचे आहे.’’ 

२) ‘‘चांगल्या आरोग्यसेवेच्या उपलब्धतेमुळे लोकांचे आयुर्मान देखील वाढत चालले असून, यादरम्यान केलेली बचत देखील संपत आहे आणि त्यांना पेन्शनची गरज भासत आहे. पेन्शन प्लॅन्सना प्रतिसाद वाढताना दिसत आहे व यापुढेही तो वाढताना दिसेल.’’

Web Title: Ceo And Md Hdfc Life Vibha Padalkar Exclusive Interview About Life Insurance

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Insurance