चीनच्या अर्थव्यवस्थेला घरघर; औद्योगिक उत्पादनाचा नीचांक

वृत्तसंस्था
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनला अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापार युद्धाचा आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीचा फटका बसत आहे.

बीजिंग ः चीनच्या अर्थव्यवस्थेला घरघर लागली असून, देशातील औद्योगिक उत्पादनाने सतरा वर्षांतील नीचांकी पातळी गाठली आहे. याचवेळी गुंतवणूक आणि किरकोळ विक्रीतही मोठी घसरण झाली आहे.  

सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, औद्योगिक उत्पादनातील वाढ जुलैमध्ये 4.8 टक्के आहे. मागील वर्षी याच काळात ती 6.3 टक्के होती. हा वाढीचा दर 2002 पासूनचा नीचांकी आहे. ब्लूम्बर्ग या वृत्तसंस्थेने जुलैमध्ये औद्योगित उत्पादनाचा हा दर 6 टक्के राहील, असा अंदाज वर्तविला होता. या अंदाजापेक्षा हा दर कमी राहिला आहे. 
 
ग्राहकांकडून मागणी कमी होत असल्याने चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे. देशातील किरकोळ विक्रीतील वाढ 7.6 टक्क्यांवर आली आहे. जून महिन्यात ती 9.8 टक्के होती. व्यापार युद्धामुळे चीन सरकार अर्थव्यवस्थेची दिशा निर्यात आणि सरकार गुंतवणूक  यापासून वळवून देशांतर्गत मागणीकडे वळविली आहे. याचवेळी ग्राहकांकडून मागणी कमी होऊ लागल्याने अर्थव्यवस्थेला घरघर लागल्याचे चित्र आहे. 

अमेरिकाविरोधी भूमिकेवर परिणाम 
चीनच्या अर्थव्यवस्थेत घसरण सुरू असल्याने अमेरिकेविरोधात सुरू असलेल्या व्यापार युद्धात चीनला अधिक कणखर भूमिका घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे अमेरिकेने चीनच्या उत्पादनांवर जादा शुल्क आकारल्यानंतर चीन आपली अर्थव्यवस्था हळूहळू खुली करीत आहे. 

चीनचे एकूण देशांतर्गत उत्पन्न 
दुसरी तिमाही : 6.2 टक्के 
(तीन दशकांतील नीचांकी दर) 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China industrial output hits 17 year low