'कॅफे कॉफी डे' कर्जाच्या परतफेडीसाठी विकणार बंगळूरूतील आयटी पार्क

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

कॉफी डे एंटरप्राईझेस लि.च्या संचालक मंडळाने कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी 9 एकर आयटी पार्क विकण्याचा निर्णय घेतला आहे.

बंगळूरू: कॉफी डे एंटरप्राईझेस लि.च्या संचालक मंडळाने कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी 9 एकर आयटी पार्क विकण्याचा निर्णय घेतला आहे. बंगळूरूत कंपनीचे 9 एकर आयटी टेक्नॉलॉजी पार्क आहे. कॉफी डे एंटरप्राईझेस ही 'कॅफे कॉफी डे' या कॉफी शॉपची मुख्य प्रवर्तक कंपनी आहे. कॉफी डे एंटरप्राईझेस लि.चीच सहाय्यक कंपनी असलेल्या टॅंगलिन डेव्हलपमेंट्स लि. या कंपनीकडे या ग्लोबल व्हिलेज पार्कची मालकी आहे. 

इक्विटी क्षेत्रातील मातब्बर कंपनी ब्लॅकस्टोन समूह हा आयटी पार्क विकत घेण्याच्या स्पर्धेतील मुख्य दावेदार आहे. ब्लॅकस्टोनचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. ब्लॅकस्टोनची सध्या यासंदर्भात टॅंगलिन डेव्हलपमेंट्स लि.शी बोलणी सुरू आहेत. कॉफी डे एंटरप्राईझेस लि.वरील कर्ज कमी करण्यासाठी कंपनींच्या मालमत्तांची विक्री करून भांडवल उभारण्याचे कंपनीच्या संचालक मंडळाने ठरवले आहे. संचालक मंडळाची गुरूवारी यासंदर्भात बैठक झाली. त्यात तीन प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. कॉफी डे एंटरप्राईझेस लि.च्या मालमत्तांची विक्री करून कर्ज कमी करणे, कंपनीचे संस्थापक व्ही जी सिद्धार्थ यांच्या मृत्यूनंतर कंपनीचा व्यवसाय सुरूळीत सूरू ठेवणे आणि सिद्धार्थ यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रातील मुद्द्यांची खातरजमा करण्यासाठी फोरेन्सिक ऑडिट फर्मची नियुक्ती करणे या तीन मुद्दयांवर चर्चा करण्यात आली. सुरूवातीला ही  नियोजित बैठक कंपनीच्या तिमाही निकालांच्या संदर्भात घेणार होती. मात्र सिद्धार्थ यांच्या मृत्यूमुळे बदलेल्या परिस्थितीमुळे बैठकीचा अजेंडा बदलण्यात आला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coffee Day Enterprises to sell 9-acre IT park in Bengaluru to pay back debt