esakal | सामान्यांच्या गळ्यात कर्जे, बँकांपासून सावध रहा; कर्मचारी संघटनेचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

bank loan

सामान्यांच्या गळ्यात कर्जे, बँकांपासून सावध रहा; कर्मचारी संघटनेचे आवाहन

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : कोरोनाच्या (corona) परिस्थितीमुळे सध्या उत्पादन क्षेत्रात गुंतवणुक (investment) नसल्याने बँक कर्जांना (bank loan) मागणी नाही. त्यामुळे सध्या बँका मोठ्या प्रमाणावर कर्ज महोत्सव आयोजित करून सर्वसामान्यांना (common people) मोहात पाडत आहे. त्यापासून नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन बँक कर्मचारी संघटनेने (bank employee union) केले आहे.

हेही वाचा: कार्यकर्ते महिलांवर अत्याचार करणार नाहीत; नवाब मलिक हमी देतील का ?- शीतल देसाई

बँक कर्मचारी संघटनेचे नेते देवीदास तुळजापूरकर यांनी हा दावा केला आहे. बँकांनी त्यांच्याकडील सुमारे सात लाखकोटी रुपयांचा अतिरिक्त निधी रिव्हर्स रेपोमध्ये 3.35 टक्के व्याजदराने ठेवल्याचे रिझर्व्ह बँकेच्या सहा सप्टेंबरच्या पत्रकात म्हटल्याचेही त्यांनी दाखवून दिले आहे. त्याचमुळे सणासुदीचे निमित्त दाखवून बँक कर्ज महोत्सव राबवीत आहेत तसेच क्रेडिट कार्डाचा व्यवसायही वाढवीत आहेत. पण खरे पाहता कोरोनाकाळात नोकरदारांचे पगार गोठले आहेत, काहींची नोकरीही गेली आहे. त्यामुळे कर्जाच्या मोहाच्या सापळ्यात अडकलेल्या सामान्यांपुढे नंतर ही कर्जे न फेडता येण्याचा धोका आहे, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

यापूर्वीची थकित कर्जे कोरोनाच्या निमित्ताने पुनर्रचित केली आहेत. पण आता पुन्हा अशी कर्जे वाढली तर छोट्या कर्जांच्या थकण्याची लाट पुन्हा येऊ शकते. त्यामुळे गरज नसताना कर्जे निर्माण करण्याच्या बँकांच्या या सापळ्यात सामान्यांनी अडकू नये, बँकांच्या या भुलवण्याला लोकांनी फसू नये, असेही आवाहन बँक कर्मचारी संघटना करीत आहेत. आज खरे पाहता शेतीला स्वस्त व्याजदराने कर्जपुरवठा करण्याची गरज आहे. पण त्याची प्रभावी यंत्रणा उपलब्ध नाही तसेच धोरण देखील नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

सध्याच खासगी बँकांनी छोटी कर्जे आणि क्रेडिट कार्डांचा व्यवसाय वाढवून ठेवल्याने कर्जे थकून या बँका अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण केले तरीही सामान्य खातेदारच अडचणीत येणार आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांनी जागरुक रहावे, असेही तुळजापूरकर यांनी सांगितले आहे.

loading image
go to top