अर्थव्यवस्थेला अद्यापही कोरोनाचा धोका; वाढ मंदगतीनेच होणार; रिझर्व्ह बँक गव्हर्नर दास यांचे मत

कृष्ण जोशी
Wednesday, 16 September 2020

कोरोनाच्या वाढत्या फैलावाचा धोका अर्थव्यवस्थेपुढे अजूनही असल्याने अर्थव्यवस्थेची वाढ मंदगतीनेच होण्याची शक्यता आहे, असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या फैलावाचा धोका अर्थव्यवस्थेपुढे अजूनही असल्याने अर्थव्यवस्थेची वाढ मंदगतीनेच होण्याची शक्यता आहे, असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केले आहे. ‘फिक्की’च्या राष्ट्रीय  कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. अर्थव्यवस्थेची वाढ अजून सर्व क्षेत्रात झाली नाही. कोव्हिडचा अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) घसरलेल्या आकड्यांमधून दिसतो, असेही त्यांनी दाखवून दिले. 

BMCतील समित्यांच्या निडणुकीत भाजपची भूमिका निर्णायक! विरोधकांची बार्गेनिंग पावर वाढणार

अर्थव्यवस्थेची वाढ काही ठराविक क्षेत्रांमध्येच झाली आहे हे दिसून आले आहे. अजूनही अर्थव्यवस्था पूर्णपणे खुली करण्यात कोरोनाच्या वाढत्या फैलावाचा अडथळा आहे. तरीही अर्थव्यवस्थेच्या हितासाठी कोणतीही पावले उचलण्यास रिझर्व्ह बँक सज्ज आहे, असाही दिलासा त्यांनी दिला.  रिझर्व्ह बँकेने अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर पैसा ओतल्यामुळे सरकारला कमी दरात कर्जे घेता आली. त्याचप्रमाणे कोरोना व त्यानंतरचा लॉकडाऊन यामुळे अडचणीत आलेल्या उद्योजकांना निधी मिळावा यासाठीही वेगवेगळे उपाय योजण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेचे अर्थव्यवस्थेवर बारकाईने लक्ष असून यापुढेही गरज भासेल तेव्हा योग्य ते उपाय योजले जातील, असेही ते म्हणाले. 

ठेवीदारांचे हित तसेच एकंदर अर्थव्यवस्थेचे स्थैर्य या बाबी ध्यानात घेऊन कर्ज पुनर्रचना योजना आखण्यात आली आहे, असे सांगून दास   म्हणाले  की, कोरोनाच्या फैलावामुळे जगात निर्माण झालेल्या संधींचा फायदा घेऊन भारतीय उद्योगांनी आपला विस्तार करावा. आर्थिक भरभराटीत शिक्षणक्षेत्राचा मोठा वाटा असतो, सरकारने आणलेले नवे शिक्षण धोरण ऐतिहासिक असून नव्या युगाच्या सुधारणांसाठी आवश्यक असेच हे धोरण आहे.

धोकादायक घराचा वापर बंद करा; खारघर-तळोजामधील 150 इमारतींना पालिकेची नोटीस

पर्यटन व्यवसायातून विकास
 पर्यटन क्षेत्र हे देखील अर्थव्यवस्थेच्या विकासाचे इंजिन होऊ शकेल, त्यामुळे या क्षेत्रातील वाढत्या मागणीचा लाभ उठवायला हवा, असे  रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona still threatens the economy