कोरोना व्हायरसचा फटका 'ह्युंदाई' कंपनीला; कसा पाहा!

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

चीनमध्ये कोरोना विषाणूच्या फैलावामुळे चीनमधील अनेक कंपन्यांचे आणि उत्पादन प्रकल्पांचे कामकाज सध्या बंद ठेवण्यात आले आहे.

शांघाय : चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा दणका ह्युंदाई कंपनीला आहे. ह्युंदाई कंपनीचा जगातील सर्वांत मोठ्या वाहन उत्पादन प्रकल्पांपैकी एक असलेल्या दक्षिण कोरियातील अल्सान कॉम्प्लेक्सं प्रकल्पातील कामकाज बंद झाले आहे. कंपनीला हा आजवरचा सगळ्यांत मोठा फटका असल्याचं मानलं जातंय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्पेअर पार्टसचं प्रोडक्शन थांबलं
चीनमध्ये कोरोना विषाणूच्या फैलावामुळे चीनमधील अनेक कंपन्यांचे आणि उत्पादन प्रकल्पांचे कामकाज सध्या बंद ठेवण्यात आले आहे. चीनच्या औद्योगिक प्रकल्पांमधून अनेक सुट्या भागांची निर्मिती केली जाते. सुट्या भागांची निर्मितीच थांबल्यामुळे ह्युंदाईच्या उत्पादन प्रकल्पालासुद्धा मोटारींचे सुटे भाग मिळणे दुरापास्त झाले आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या कामकाजावर झाला आहे. दक्षिण कोरियातील अल्सान कॉम्प्लेक्सझ प्रकल्पातून दरवर्षी 14 लाख वाहनांचे उत्पादन होते. अल्सान कॉम्प्लेक्स  प्रकल्प हा किनारपट्टीतील भागात असून, सुट्या भागांच्या आयातीसाठी आणि तयार वाहनांच्या निर्यातीसाठी महत्त्वाचा आहे.

आणखी वाचा - इन्कम टॅक्सची आकडेमोड करा ई-कॅलक्युलेटरने

पाचव्या क्रमांकाची मोठी कंपनी
जागतिक अर्थव्यवस्थेत सुट्या भागांचा पुरवठा ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. जगभरात सुट्या भागांचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने चीनमधील उत्पादक प्रकल्पांची महत्त्वाची भूमिका आहे. आता कोरोना विषाणूच्या फैलावाला आळा घालण्यासाठी चीनच्या सरकारने अनेक कंपन्यांचे कामकाज बंद ठेवले आहे. त्याचा परिणाम जागतिक औद्योगिक विश्वा वर आणि अर्थव्यवस्थेवर होत आहे. ह्युंदाई ही जगातील पाचव्या क्रमांकाची वाहन उत्पादक कंपनी आहे. कामकाज बंद पडल्याने ह्युंदाईच्या अल्सान प्रकल्पातील कर्मचारी नाराज आहेत. कारण कामकाज बंद असल्यामुळे त्यांच्या वेतनात कपात करण्यात येत आहे. कोरोना विषाणूने निर्माण केलेल्या चीनमधील परिस्थितीचा जगभरात काय परिणाम होऊ शकतो याचे हा प्रकल्प हे पहिले उदाहरण असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

आणखी वाचा - आता बिल्डरांना सवलत, ऑटोमोबाईल क्षेत्रालाही बुस्टर

50 कोटी डॉलरचा फटका 
ह्युंदाईचा प्रकल्प पाच दिवस बंद राहिल्यामुळे कंपनीला किमान 50 कोटी डॉलरचा फटका बसणार आहे. ह्युंदाईपाठोपाठ किया मोटर्सलाही अशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते आहे. याव्यतिरिक्त जगातील अनेक आघाडीच्या कंपन्यांच्या प्रकल्पांनाही अशाच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. विशेषत: दक्षिण कोरियातील कंपन्या सुट्या भागांसाठी मोठ्या प्रमाणात चीनवर अवलंबून आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact on hyundai car production south korea