लॉकडाऊनमुळे कोळसा काळवंडला; कोल इंडियाला दणका 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

कोल इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या खपात किंवा शिपमेंटमध्ये एप्रिल महिन्यात २५.५ टक्के घट झाली आहे. कोविड-१९ला अटकाव करण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनचा दणका बसत कोल इंडियाचा खप घटला आहे. कोल इंडिया ही देशातील कोळसा उत्खनन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. लॉकडाऊनमुळे बहुतांश उद्योग-व्यवसाय ठप्प झाल्यामुळे देशातील ऊर्जा आणि वीजेच्या मागणीत मोठी घट झाली आहे.

- कोल इंडियाचे उत्खनन घटले
- लॉकडाऊनमुळे देशातील कोळसा मागणी घटली
- दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतरची सर्वात मोठी घसरण 

नवी दिल्ली : कोल इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या खपात किंवा शिपमेंटमध्ये एप्रिल महिन्यात २५.५ टक्के घट झाली आहे. कोविड-१९ला अटकाव करण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनचा दणका बसत कोल इंडियाचा खप घटला आहे. कोल इंडिया ही देशातील कोळसा उत्खनन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. लॉकडाऊनमुळे बहुतांश उद्योग-व्यवसाय ठप्प झाल्यामुळे देशातील ऊर्जा आणि वीजेच्या मागणीत मोठी घट झाली आहे. एप्रिल महिन्यात कोल इंडियाने ३.९१ कोटी टन कोळशाचा पुरवठा (शिपमेंट) केला आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात कोल इंडियाने ५.२४१ कोटी टन कोळशाचा पुरवठा केला होता. कोल इंडियाचे मुख्यालय कोलकाता येथे आहे.

अर्थविश्व क्षेत्रातील इतर घडामोडींसाठी येथे  क्लिक करा 

एप्रिल महिन्यात कोल इंडियाच्या उत्पादनात किंवा उत्खननात १०.९ टक्क्यांची घट होत ते ४.०३८ कोटी टन इतके होते. तर एप्रिल २०१९ मध्ये ४.५३० कोटी टन कोळशाचे उत्खनन झाले होते. वार्षिक पातळीवरील कोळशाच्या उत्खननात दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतरची सर्वात मोठी घसरण मागील वर्षभरात झाली आहे. कोळशाचा वापर करून वीज निर्मिती करणे आणि अनेक देशांमध्ये कोळसा उत्खननाला होणारा विरोध यामुळे कोळशाच्या मागणीत वर्षभरात मोठी घट झालेली बघायला मिळते आहे.

मोदी सरकारने लॉकडाऊनचा कालावधी दोन आठवड्यांनी वाढवून तो १७ मेपर्यत केला आहे. यावर्षी जानेवारी महिन्यातच कोल इंडियाने त्यांच्या वार्षिक पुरवठ्यात पहिली घसरण नोंदवली होती. मागील सहा वर्षांतील ही पहिली घसरण होती. वीज उत्पादन कंपन्यांकडून मागणीत घट झाल्यामुळे कोळशाच्या मागणीत घसरण झाली आहे. २०१९ मध्ये कोळशाच्या पुरवठ्यात ३.८ टक्के घट होत ५८.०८ कोटी टन कोळशाचा पुरवठा झाला होता. तर कोळशाचे उत्खनन २.२ टक्क्यांनी घटून ५८.२८ कोटी टनांवर आले आहे.

राईट्स इश्यू म्हणजे काय? रिलायन्सच्या शेअरधारकांना नेमका फायदा काय?

२०१९-२० या आर्थिक वर्षात कोल इंडियाने ६०.२१४ कोटी टन कोळशाचे उत्पादन केले आहे. मात्र २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी कंपनीचे ६६.० कोटी टन कोळसा उत्खननाचे उद्दिष्ट होते. मागणीत मोठी घट झाल्यामुळे कंपनीला आपले उद्दिष्ट गाठता आलेले नाही. अर्थात मार्च २०२० मध्ये कोल इंडियाने ८.४३६ कोटी टन कोळशाचे विक्रमी उत्खनन केले आहे. हे आतापर्यतचे उच्चांकी उत्खनन आहे. मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत कोळसा उत्खननात कंपनीने ६.५ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus lockdown coal india impact