चाळीस दिवसांत रिटेल क्षेत्राचं मोडलं कंबरडं; २० टक्के व्यवसाय बंद होण्याचा धोका 

Shopping-Mall
Shopping-Mall

देशातील रिटेल क्षेत्राने २५ मार्च ते ३० एप्रिल या लॉकडाऊनच्या कालावधीत जवळपास ५.५ लाख कोटी रुपये गमावले आहेत. लॉकडाऊनचा दणका बसत भारतातील जवळपास २० टक्के रिटेल व्यावसायिक हे पुढील महिन्यात त्यांचा व्यवसाय बंद करण्याची शक्यता आहे, अशी माहिती ट्रेडर्सची संघटना असलेल्या कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) दिली आहे. व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी आणि त्यांचे व्यवसाय सुरू राहण्यासाठी आम्हाला वित्तीय मदत करावी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सीएआयटीने केली आहे. सरकारने या क्षेत्रासाठी खास पॅकेज जाहीर करावे असे सीएआयटीचे म्हणणे आहे.

सीएआयटीच्या छत्राखाली भारतातील ७ कोटी व्यापाऱ्यांच्या जवळपास ४०,००० संघटना येतात. कोविड-१९ मुळे भारतीय रिटेल व्यवसायाचे कधीही न भरून येणारे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. देशावरसुद्धा याचा खूप मोठा विपरित परिणाम होणार आहे, असे सीएआयटीने म्हटले आहे. 'देशातील ७ कोटी व्यापाऱ्यांपैकी जवळपास १.५ कोटी व्यापाऱ्यांना पुढील काही महिन्यात त्यांचा व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावा लागणार आहे. तर या १.५ कोटी व्यापाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या आणखी ७५ लाख व्यापाऱ्यांनादेखील त्यानंतर त्याचा दणका बसणार आहे', असे सीएआयटीने म्हटले आहे.

'भारताच्या जीडीपीमध्ये ४० टक्क्यांपेक्षा जास्त वाटा असणाऱ्या आणि देशातील जवळपास एक तृतियांश मनुष्यबळ असणाऱ्या या क्षेत्राला सद्यपरिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारांनी प्राधान्यक्रम दिलेला नाही, ही निराशाजनक बाब आहे. याउलट सरकारने सर्व व्यवसायांना आणि उद्योगांना कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात सांगितले आहे, बॅंका त्यांचे व्याज वसूल करत आहेत आणि घरमालक भाडेकरूंकडून घरभाडे वसूल करत आहेत', असे सीएआयटीने म्हटले आहे. 

दरम्यान सीएआयटीने देशातील विविध राज्यांनी लॉकडाऊनच्य कालावधीत वाईन शॉप उघडण्यास आणि दारू विक्रीस परवानगी देण्याच्या निर्णयाचा विरोध केला आहे. या निर्णयामुळे मागील ४० दिवसांच्या कालावधीत जे आपण कमावले आहे ते गमावून बसू आणि कोविड-१९चा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढेल असे म्हटले आहे. दिल्लीसकट देशातील सर्वच व्यापाऱ्यांनी उत्तम सहकार्य करत चांगल्या भावनेने दुकाने आणि आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत, दारू विक्रीस परवानगी देण्याच्या निर्णयामुळे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखेच आहे, असे मत पुढे सीएआटीने व्यक्त केले आहे.

काय घडलं देशात?

  • लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे ५.५ लाख कोटींचे नुकसान
  • देशातील १.५ कोटी व्यापाऱ्यांचे भवितव्य धोक्यात
  • रिटेल क्षेत्राचे कधीही भरून न येणारे नुकसान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com