कॉक्‍स अँड किंग्सचे व्यवहार संशयाच्या घेऱ्यात 

वृत्तसंस्था
Saturday, 25 April 2020

कॉक्‍स अँड किंग्स या दिवाळखोर झालेल्या पर्यटन कंपनीचे फोरेन्सिक ऑडिट सुरू आहे.या ऑडिटमधून कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमधील अनियमितता समोर आली आहे.

मुंबई - कॉक्‍स अँड किंग्स या दिवाळखोर झालेल्या पर्यटन कंपनीचे फोरेन्सिक ऑडिट सुरू आहे. या ऑडिटमधून कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमधील अनियमितता समोर आली आहे. यात खोटे रेकॉर्ड आणि 160 बनावट किंवा बोगस ग्राहकांना केलेल्या 9 हजार कोटी रुपयांच्या विक्रीचाही समावेश आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये प्राईस वॉटरहाऊस कूपर्सने (पीडब्ल्यूसी) केलेल्या ऑडिटमध्ये कंपनीने येस बॅंकेबरोबर चार वर्षांच्या कालावधीत केलेल्या 21 हजार कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारांचाही समावेश आहे. हे पैसे अन्यत्र वळवण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय कॉग्स अँड किंग्सला मिळालेल्या 1,100 कोटी रुपयांच्या कर्जाबद्दलही संशय आहे. नियमबाह्य पद्धतीने हे कर्जप्रकरण झाल्याचे ऑडिटमधून समोर आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येस बॅंक आणि कॉग्स अँड किंग्स यांच्यातील बहुतांश व्यवहार हे योग्य परवानगी न घेता करण्यात आल्याचेही ऑडिटमध्ये म्हटले आहे. राणा कपूर येस बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना कॉग्स अँड किंग्स ही येस बॅंकेकडून सर्वाधिक कर्ज वितरण झालेल्या कंपन्यांपैकी एक कंपनी होती. येस बॅंकेने कॉग्स अँड किंग्सला 2, 267कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. 

राणा कपूर यांच्याविरोधात येस बॅंकेतील गैरव्यवहारासंदर्भात सुरू असलेल्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने कॉग्स अँड किंग्सचे प्रवर्तक अजय अजित पीटर केरकर यांनाही समन्स बजावले होते. राणा कपूर यांनी नियमबाह्य पद्धतीने कॉग्स अँड किंग्सला कर्ज दिल्याचा आरोप आहे. याशिवाय 2017 मध्ये कर्जबाजारी झालेल्या आलोक इंडस्ट्रीजशी कॉग्स अँड किंग्सचा कोणताही प्रत्यक्ष व्यावसायिक संबंध नसताना कॉग्स अँड किंग्सने आलोक इंडस्ट्रीजला 1,100 कोटी रुपये दिल्याचे आरोप आहे. हे कर्ज देताना आलोक इंडस्ट्रीजचे मुख्य वित्तीय अधिकारी सुनील खंडेलवाल हे कॉग्स अँड किंग्सचे मुख्य वित्तीय अधिकारी अनिल खंडेलवाल यांचे बंधू असल्याचे समोर आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cox and Kings business dealings