जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भडका!

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

सौदी अरेबियाची भारताला हमी 
ड्रोनहल्ल्यानंतर उत्पादन थांबवले असले, तरी भारताचा तेलपुरवठा सुरळीत राहील, अशी हमी सौदी अरामकोने केंद्र सरकारला दिली आहे. या हल्ल्यानंतर पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तेल वितरकांकडील तेलसाठ्याचा आढावा घेतला. त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये इंधनटंचाई जाणवणार नाही, असा विश्‍वास त्यांनी ट्विटरवर व्यक्त केला. इंधनाची मागणी पूर्ण करण्यासाठी भारतात जवळपास ८३ टक्के कच्चे तेल आयात केले जाते. सौदी अरेबियाने गेल्या आर्थिक वर्षात भारताला ४०.३३ दशलक्ष टन पुरवठा केला.

ड्रोनहल्ल्यानंतर दर बॅरलमागे १९.५ टक्‍क्‍यांनी वाढले
नवी दिल्ली - सौदी अरेबियातील अरामको कंपनीच्या अबाकीक आणि खुराईस या दोन तेल प्रकल्पांवर झालेल्या ड्रोनहल्ल्यानंतर आखातात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात केली असून, त्याचे पडसाद जागतिक बाजारात उमटले. आशियातील बाजारात कच्च्या तेलाच्या (ब्रेंट क्रुड) दरांत सोमवारी प्रतिबॅरल १९.५ टक्‍क्‍यांची वाढ झाली असून, दर ७१.९५ डॉलरपर्यंत गेला. 

‘सौदी’तील हल्ल्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला असून, उत्पादनातील घट आणि पुरवठा कमी झाल्यास नजीकच्या काळात कच्च्या तेलाचे दर १०० डॉलरपर्यंत वाढण्याची भीती जाणकारांनी व्यक्त केली. गेल्या २८ वर्षांत पहिल्यांदाच तेलाच्या भावात एका दिवसात ही प्रचंड वाढ झाली आहे.

सौदी अरामकोच्या अबाकीक आणि खुराईस या दोन तेल प्रकल्पांवर शनिवारी ड्रोनने हल्ले झाले. त्यानंतर या दोन्ही प्रकल्पांमधील तेल उत्पादन थांबविण्यात आले आहे. सौदी अरेबियातील एकूण तेल उत्पादनात निम्म्याने घट झाली असून, जागतिक बाजारातील तेलपुरवठा पाच टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे.

तेलपुरवठा ५७ लाख बॅरलने कमी झाला आहे. याचा फटका तेलाच्या दरांना बसला. आखातातील १९९१ मधील युद्धानंतर तेलाच्या दरांत एका दिवसात मोठी वाढ प्रथमच नोंदविण्यात आली. सौदी अरामकोकडून तेल उत्पादन पूर्ववत करण्यास किमान महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. या सर्व घडामोडींकडे ओपेक लक्ष ठेवून असून, पुरवठा वाढीसाठी उपाययोजना पावले उचलली जाण्याची शक्‍यता आहे.

अमेरिका-इराण आमनेसामने
सौदीमधील ड्रोनहल्ले इराणने केल्याचा संशय अमेरिकेने व्यक्त केला आहे. यावर कठोर लष्करी कारवाईचा इशारा अमेरिकेने इराणला दिला आहे. हल्ल्यात येमेनचा सहभाग नसल्याचा दावा अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला आहे. यावर इराणच्या संरक्षणमंत्र्यांनी अमेरिकेचे तळ आणि युद्धनौका क्षेपणास्त्राच्या कक्षेत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

पेट्रोल पाच रुपयांनी महागणार?
कच्च्या तेलाच्या दरांतील प्रचंड वाढीने देशांतर्गत इंधनाचा भडका उडण्याची शक्‍यता आहे. तेल वितरक कंपन्यांकडून आगामी इंधन आढाव्यावेळी मोठी दरवाढ केली जाण्याची शक्‍यता आहे. रुपयाचे अवमूल्यन आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या दरांमुळे तेल आयातीचा खर्च वाढणार असल्याने हा भार कंपन्यांकडून ग्राहकांच्या माथी मारला जाईल. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत प्रतिलिटर पाच ते सहा रुपयांची वाढ होईल, असा अंदाज कोटक इन्स्टिट्यूशन इक्विटीज या संस्थेने व्यक्त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crud Oil Rate Increase in global market