विकास काय ढगातून येणार?; राहुल बजाजांची टीका

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जुलै 2019

प्रवासी गाड्यांना मागणीच नाही
ताज्या आकडेवारीनुसार बजाज कंपनीच्या भूमिकेशी सहमती दिसत आहे. प्रवासी गाड्यांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या जुनमध्ये २४ टक्‍क्‍यांनी, तर जड वाहतूक गाड्यांच्या विक्रीत १२ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.

मुंबई - आपल्या स्पष्ट आणि सडेतोड बोलण्याबद्दल परिचित असलेले बजाज ऑटोचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. देशात सध्या गुंतवणूक नाही, मागणी तर नाहीच, मग अशा स्थितीत विकास काय ढगातून पडणार काय, असा बोचरा सवाल त्यांनी मोदी सरकारला अप्रत्यक्षरीत्या विचारला.

बजाज ऑटोच्या सर्वसाधारण सभेत बोलताना ८१ वर्षांचे राहुल बजाज यांनी देशातील मंदी आणि वाहन उद्योग क्षेत्रातील अडचणींबाबत सविस्तर ऊहापोह केला. देशातील वाहन उद्योग आठ महिन्यांपासून विक्री घटल्याने मंदीच्या चक्रात अडकला आहे. 

देशात मागणी नाही. खासगी गुंतवणूक नाही. मग विकास कोठून येणार? तो ढगातून अजिबात पडणार नाही. वाहन उद्योग अतिशय बिकट अवस्थेतून जात आहे. कार, व्यावसायिक वाहने आणि दुचाकी हे अतिशय बिकट अवस्थेतून जात आहेत. सरकार या गोष्टी बोलतील किंवा बोलणार नाही.

परंतु आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि विकास बॅंकेने विकासाबाबत स्पष्टपणे रेषा आखलेली आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून विकास मंदावत असल्याचे ते सांगतात. परंतु जगातील अन्य सरकारांप्रमाणे केंद्र सरकार आपल्याला अर्थव्यवस्थेचा हसरा मुखवटा दाखवत असले तरी वास्तव हे वास्तवच आहे, अशा परखड शब्दात बजाज यांनी सरकारचे कान टोचले.  

भारतातील सध्याच्या मंदीत वाहन उद्योगाला सर्वाधिक फटका बसला आहे. २०००-०१ पासून आतापर्यंत यंदाच्या जूनच्या तिमाहीत गाड्यांच्या विक्रीत सर्वाधिक घसरण झाली आहे. ग्राहकच पुढे येत नसल्याने देशातील बड्या वाहन कंपन्यांना सर्वाधिक चटके सहन करावे लागत आहेत. त्यात देशातील निम्म्या भागत मॉन्सूनने पाठ फिरविल्याने परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. 

राहुल बजाज यांच्या सोमवारच्या म्हणण्याला कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी गेल्याच आठवड्यात दुजोरा दिलेला आहे. विकास केव्हा येईल, हे कोणालाच माहीत नाही. आम्हीही सांगू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली हतबलता व्यक्त केली. राहुल आणि राजीव बजाज यांच्या टिप्पणीला रिझर्व्ह बॅंकेच्या अंदाजामुळे बळकटी मिळाली आहे. रिझर्व्ह बॅंकेने चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपीचा अंदाज ७.२ टक्‍क्‍यांवरून सात टक्‍क्‍यांवर आला आहे. विक्री घटल्याने वाहन कंपन्यांनी उत्पादन घटविताना काही प्रकल्प तात्पुरते बंद केल्याने देशात सर्वत्र कामगारकपात सुरू झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Development Issue Rahul Bajaj Comment on Modi Government