फॉर्म 15जी व 15एच कोणी भरावेत?

डॉ. दिलीप सातभाई (चार्टर्ड अकाउंटंट)
Monday, 20 April 2020

फॉर्म 15 जी किंवा फॉर्म 15 एच भरून उद्‌गम करकपात (टीडीएस) टाळता येते. यंदाच्या वर्षी "कोरोना'च्या संकटामुळे हे फॉर्म दाखल करण्याची तारीख 30 जून 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

विविध बॅंका, कंपन्यांत ठेवी ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना दरवर्षी व्याजाचे उत्पन्न मिळत असते. या व्याजासह सर्व स्त्रोतातून मिळणारे अंदाजे वार्षिक उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असेल तर फॉर्म 15 जी किंवा फॉर्म 15 एच भरून उद्‌गम करकपात (टीडीएस) टाळता येते. हे फॉर्म आर्थिक वर्षाच्या सुरवातीला देणे अपेक्षित असते. तथापि, यंदाच्या वर्षी "कोरोना'च्या संकटामुळे हे फॉर्म दाखल करण्याची तारीख 30 जून 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फॉर्म कोणाला भरता येतात?
चालू आर्थिक वर्ष 2020-21 साठी रु. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असेल तर अशा सर्वसाधारण व्यक्ती वा हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ) गुंतवणूकदार फॉर्म 15जी भरू शकतात, तसेच ज्येष्ठ व अती ज्येष्ठ व्यक्तीचे करपात्र उत्पन्न जुन्या प्रणालीअंतर्गत तीन लाख किंवा पाच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर 15एच फॉर्म भरू शकतात. कलम 194 ए अंतर्गत सर्वसाधारण नागरिकाचे उत्पन्न किमान रु. 40 हजारांपेक्षा, तर ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत रु. 50 हजारांपेक्षा अधिक झाल्यास 10 टक्के दराने "टीडीएस' करावा लागतो. "टीडीएस'साठी आवश्‍यक असणारी व्याजाची किमान मर्यादा रु. 10 हजार रुपयांवरून 40 हजार रुपयांपर्यंत वाढविली आहे. याचा फायदा सर्वसाधारण नागरिकांना होऊन त्यांचे व्याजाचे उत्पन्न आता 40 हजार रुपयांपर्यंत फॉर्म 15जी न देता सुद्धा करकपातीस पात्र होणार नाही. याचा अर्थ ते उत्पन्न करमुक्त आहे, असा घेता कामा नये. थोडक्‍यात, पूर्वी सारखीच सर्वसाधारण नागरिकांच्या बाबतीत दोन अटींची पूर्तता होणे आवश्‍यक आहे. पहिली अट म्हणजे वार्षिक अंदाजे उत्पन्न पात्र वजावटीनंतर करपात्र नको, तर दुसरी अट व्याजाच्या स्त्रोतातून येणारे ढोबळ उत्पन्न किमान प्राप्तिकर मर्यादेपेक्षा जास्त असता कामा नये.

ऑनलाईन दाखल करण्याची सोय
करदात्यांच्या सोयीसाठी काही बॅंकांनी व वित्तीय संस्थांनी 15जी आणि 15एच फॉर्म ऑनलाईन दाखल करण्याची व्यवस्था केली आहे. असे फॉर्म पात्र करदात्यांनी भरले तर त्यांच्या उत्पन्नातून "टीडीएस' होत नाही. हे फॉर्म दाखल केल्याने करदात्याला प्राप्तिकराचा परतावा मागण्यासाठी विवरणपत्र दाखल करून खटपट करावी लागत नाही.

आधी काय लक्षात घ्याल?
करदात्यांच्या बाबतीत त्याचे अंदाजे उत्पन्न कोणत्या करप्रणालीअंतर्गत करपात्र नाही, हे फॉर्म 15जी किंवा 15एच दाखल करण्याअगोदर ठरवावे लागेल. कारण ज्येष्ठ व अती ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध असलेली जुन्या प्रणालीतील करपात्र उत्पन्नाची वाढीव मर्यादा (म्हणजे तीन व पाच लाख रुपये) नव्या प्रणालीत उपलब्ध राहणार नाही. ज्येष्ठ, अती ज्येष्ठ करदात्यांना सर्वसाधारण नागरिकांची किमान उत्पन्नाची म्हणजे अडीच लाख रुपयांची करपात्र उत्पन्न मर्यादा आता त्यांना उपलब्ध होणार आहे. हा मोठा बदल विचारात घ्यावा लागेल.

फॉर्म कोणास भरता येत नाहीत?
अनिवासी रहिवाशास करपात्र उत्पन्न नसताना देखील 15जी किंवा 15एच फॉर्म भरता येत नाही. हिंदू अविभक्त कुटुंब पद्धतीत (एचयूएफ) कर्ता ज्येष्ठ नागरिक असला तरी फॉर्म 15एच भरता येत नाही. "पॅन' न नोंदवता असे फॉर्म भरल्यास 20 टक्‍क्‍यांनी करकपात होते.

फॉर्म भरायला विसरले तर काय होते?
हे फॉर्म भरायला विसरले तर बॅंका किंवा वित्तीय संस्था "टीडीएस' करतील व तेवढी रक्कम करदात्यास कमी मिळेल. जर उत्पन्न करपात्र नसेल, तर रिफंड मागण्यासाठी विवरणपत्र भरून ते पैसे मिळविण्याची खटपट करावी लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dilip satbhai article about Form 15G and 15H