esakal | ‘डायरेक्‍ट इक्विटी’ की ‘म्युच्युअल फंड ?’
sakal

बोलून बातमी शोधा

Mutual-Fund

जगभरात सध्या कोरोना व्हायसरने दहशत माजविलेली आहे. असंख्य लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून, शटडाऊनमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थाही संकटात आलेल्या आहेत. शेअर बाजारावर हल्ला करणारा कोरोना हा काही पहिला व्हायरस नव्हे. दोन दशकांत ‘सेन्सेक्स’वर बऱ्याच विषाणूंनी तीव्र हल्ला केला व त्यानंतरच्या सहा महिन्यांत निर्देशांक पुन्हा ठणठणीत बरा झाला.

‘डायरेक्‍ट इक्विटी’ की ‘म्युच्युअल फंड ?’

sakal_logo
By
अतुल सुळे, निवृत्त बॅंक अधिकारी

जगभरात सध्या कोरोना व्हायसरने दहशत माजविलेली आहे. असंख्य लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून, शटडाऊनमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थाही संकटात आलेल्या आहेत. शेअर बाजारावर हल्ला करणारा कोरोना हा काही पहिला व्हायरस नव्हे. दोन दशकांत ‘सेन्सेक्स’वर बऱ्याच विषाणूंनी तीव्र हल्ला केला व त्यानंतरच्या सहा महिन्यांत निर्देशांक पुन्हा ठणठणीत बरा झाला. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आतापर्यंत निर्देशांकावर झालेल्या हल्ल्यांपैकी ‘कोरोना’चा हल्ला सर्वात तीव्र स्वरूपाचा (३० टक्के) असून, त्यातून बाहेर येण्यास दीर्घकाळ वाट पाहावी लागणार. निर्देशांकातील अनेक ‘ब्लू चिप’ कंपन्यांच्या शेअरच्या किमती कमी झाल्या आहेत. तसेच काही इंडेक्‍स फंड्‌स, सेक्‍टोरल, थिमॅटिक, स्मॉल कॅप, मिडकॅप फंडांच्या एनएव्हीसुद्धा ४०-५० टक्‍क्‍यांनी पडल्या आहेत. अशा वेळी गुंतवणूकदारांच्या मनात दोन प्रश्‍न उभे राहणे साहजिक आहे. 
१. शेअर बाजारात गुंतवणूक करावी का? आणि 
२. करायचीच झाल्यास ती डायरेक्‍ट शेअरमध्ये करावी की म्युच्युअल फंडामार्फत करावी. 
पैकी पहिल्या प्रश्‍नाचे उत्तरे सोपे आहे. महागाईवर मात करण्यासाठी शेअर बाजारात दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे गरजेचे असते. गेल्या चार दशकांत ‘कोरोना’सारखे अनेक हल्ले पचवून ‘सेन्सेक्‍स’ ४० पट झाला. दुसऱ्या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी मात्र आपल्याला ‘डायरेक्‍ट इक्विटी’ आणि ‘म्युच्युअल फंडां’चा तुलनात्मक विचार करावा लागेल. 

सेन्सेक्स, निफ्टीमध्ये 10 टक्क्यांची घसरण, पुन्हा लागले लोअर सर्किट

काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे -
अभ्यास -
 शेअर बाजारात प्रत्यक्ष गुंतवणूक करण्यासाठी मार्केट व कंपन्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. तर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराला फारशा अभ्यासाची गरज नसते. ते काम फंड मॅनेजर करीत असतो. 

शेअरच्या व्यवहारांवर नियंत्रण - शेअरमध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक करताना कोठला शेअर, कोणत्या भावाला घ्यायचा व कधी विकायचा यावर गुंतवणूकदाराचे नियंत्रण असते, जे म्युच्युअल फंडात नसते. 

फंड मॅनेजर - जेव्हा तुम्ही स्वतः शेअर निवडून स्वतःचा पोर्टफोलिओ बनविता, तेव्हा तुम्ही स्वतःच फंड मॅनेजर बनत असता. मात्र म्युच्युअल फंडाच्या योजनेत गुंतवणूक करताना अनुभवी, प्रोफेशनल फंड मॅनेजरच्या ज्ञानाचा व कौशल्याचा लाभ मिळतो. 

चढ-उतार - शेअरचे भाव खूपच वरती-खालती होऊ शकतात. परंतु म्युच्युअल फंड ३० ते १०० शेअर्स अथवा कर्जरोख्यात विभागून ठेवत असल्याने त्यांच्या एनएव्हीमध्ये शेअरच्या तुलनेत चढ-उतार कमी होतात. 

गुंतवणुकीतील सातत्य - शेअर बाजारात ठरवूनसुद्धा सातत्याने गुंतवणूक केली जात नाही. परंतु म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’द्वारे नियमितरीत्या गुंतवणूक करता येते. 

मानसिक तणाव - शेअरच्या किमतीत सतत होणारे चढ-उतार मानसिक ताण निर्माण करतात. तर फंडाची ‘एनएव्ही’ दिवसाच्या शेवटी एकदाच जाहीर होत असल्याने तणाव निर्माण करीत नाही. शिवाय खरेदी-विक्रीचे निर्णय फंड मॅनेजर घेत असल्याने गुंतवणूकदारावर मानसिक ताण येत नाही. 

वरील मुद्‌द्‌यांवर आत्मपरीक्षण करून प्रत्येक गुंतवणूकदाराने ठरवावे. त्याच्यासाठी ‘डायरेक्‍ट इक्विटी’ सही आहे की ‘म्युच्युअल फंड’.