प्राप्तिकर विवरणपत्र वेळेत न भरल्यास?

डॉ. दिलीप सातभाई
Monday, 18 January 2021

आर्थिक आयुष्याचा आलेख सरकारी कागदपत्रांद्वारे सिद्ध करण्यासाठी; तसेच करदात्याच्या संपत्ती व मालमत्तेच्या वैध स्त्रोताबाबत तो कायदेशीर व उपयुक्त पुरावा देखील असतो.

आर्थिक वर्ष २०१९-२० साठीचे प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) दाखल करण्याची तारीख कोरोनाच्या महासाथीमुळे अंतिमतः १० जानेवारी २०२१ निश्चित करण्यात आली होती. ज्या करदात्यांनी विविध कारणास्तव प्राप्तिकर विवरणपत्र भरले नसेल, अशा करदात्यांना आता विवरणपत्र भरता येणार नाही व सर्व काही संपले आहे, असे नाही. ज्यांनी विवरणपत्र भरले नसेल, त्यांनी ते आता विलंब शुल्कासह ३१ मार्च २०२१ पर्यंत भरणे आवश्यक आहे. करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास विलंब शुल्क दहा हजार रुपये आहे, तर करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास विलंब शुल्क एक हजार रुपये आहे. ३१ मार्च २०२१ नंतर मात्र हे विवरणपत्र विलंब शुल्क देऊनही भरता येणार नाही. विवरणपत्र दाखलच केले नसल्यास प्राप्तिकर विभाग फौजदारी स्वरूपाची कारवाई करू शकतो. 

प्राप्तिकर विवरणपत्र वेळेत दाखल करणे ही केवळ वैधानिक जबाबदारी नसून, आपल्या आर्थिक आयुष्याचा आलेख सरकारी कागदपत्रांद्वारे सिद्ध करण्यासाठी; तसेच करदात्याच्या संपत्ती व मालमत्तेच्या वैध स्त्रोताबाबत तो कायदेशीर व उपयुक्त पुरावा देखील असतो. याखेरीस केंद्र सरकारलासुद्धा करदात्याने भरलेल्या कराचा विनियोग विवरणपत्र भरले नसल्यास करता येत नाही व ती रक्कम पडून राहून देशाचा विकास होऊ शकत नाही. 

हेही वाचा : ‘जीएसटी’अंतर्गत ‘क्यूआरएमपी’ योजना

प्राप्तिकर विवरणपत्र मुदतीत दाखल न केल्याने पुढील फायदे मिळू शकत नाहीत- 

१) ‘रिफंड’च्या व्याजात घट ः 
विवरणपत्र वेळेत दाखल केल्यास येणाऱ्या ‘रिफंड’वर एक एप्रिल २०१९ पासून करनिर्धारण होण्याच्या तारखेपर्यंत व्याज देण्यास प्राप्तिकर विभाग बांधील आहे. परंतु, विवरणपत्र उशिरा भरल्यास, ज्या तारखेला विवरणपत्र भरलेले असेल, त्या तारखेपासून करनिर्धारण होण्याच्या तारखेपर्यंतचेच व्याज मिळते व म्हणून आर्थिक नुकसान संभवते. 

२) धंद्यातील तोटा पुढे ओढता येत नाही ः 
प्राप्तिकर विवरणपत्र अंतिम देय तारखेच्या आत दाखल केले नसल्यास, त्या वर्षाचा धंद्यात होणारा आर्थिक तोटा घसारा रक्कम सोडून पुढील वर्षात होणाऱ्या नफ्यातून वजा करण्यासाठी पुढे ओढता येत नाही. हा धंदा करणाऱ्या करदात्यांचा मोठा आर्थिक तोटा आहे. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

३) स्वयंनिर्धारण करावरील व्याजाचा भुर्दंड ः 
करदात्याने आर्थिक वर्षातील उत्पन्नावर विवरणपत्र दाखल करावयाच्या वा १० जानेवारी २०२१ यात जी तारीख लवकर येईल, त्या तारखेच्या आत स्वयंनिर्धारण कर भरणे कायद्याच्या कलम १४० ए अंतर्गत अपेक्षित आहे. संबंधित करदात्यास अग्रीम कर भरण्याच्या संदर्भातील अटी लागू नसल्यास देय असणाऱ्या कराच्या रकमेवर आर्थिक वर्ष संपल्यापासून १० जानेवारीपर्यंतचे व्याज द्यावे लागत नाही. मात्र, विहित मुदतीत विवरणपत्र न भरल्यास प्राप्तिकर कायद्याच्या कलम २३४ ए अंतर्गत करदेयतेवर करभरणा करण्याच्या तारखेपर्यंत १२ टक्के दराने व्याजाचा भुर्दंड पडतो. 

(लेखक चार्टर्ड अकाउंटंट- सीए आहेत.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr dilip satbhai write article about Income tax return