‘लॉकडाउन’नंतर देशात निर्यात, करसंकलन, वाहनविक्री आणि उत्पादनवाढीचे आकडे सकारात्मक

Producttion
Producttion

नवी दिल्ली - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले सहा महिने संकटात सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला आता सूर गवसताना दिसत आहे. सुरवातीच्या ‘लॉकडाउन’नंतर देशात टप्प्याटप्प्याने ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाली आणि गर्तेत अडकलेल्या अर्थचक्राचे चाक पुन्हा फिरू लागले आहे. निर्यात, करसंकलन, वाहनविक्री आणि उत्पादनवाढीचे आकडे सकारात्मक चिन्हे दर्शवित आहेत. 

आगामी सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्‍वभूमीवर अर्थविश्‍वातील ताज्या घडामोडी दिलासा देणाऱ्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्थेत सुधारणा होऊन लवकरच ती रूळावर येण्याचा आशावाद जागविला गेला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनानंतर प्रथमच निर्यातीत वाढ 
सलग सहा महिन्यांच्या घसरणीनंतर देशाच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ५.२७ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. देशाची निर्यात सप्टेंबर महिन्यात वार्षिक आधारावर ५.२७ टक्‍क्‍यांनी वाढून २७.४ अब्ज डॉलर झाली आहे, तर आयात १९.६ टक्‍क्‍यांनी घसरून ३०.३१ अब्ज डॉलर झाली आहे. सोन्याच्या आयातीत ५२.८५ टक्‍क्‍यांनी घसरण झाली आहे. कोरोना महासाथीमुळे सोन्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी कमी असल्याने त्याच्या आयातीत सलग घसरण पाहायला मिळत आहे. 

यूपीआय व्यवहार उच्चांकावर 
नॅशनल पेमेंट्‌स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात ‘एनपीसीआय’चा प्रमुख पेमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या "युनिफाइड पेमेंट इंटरफेस''वरील (यूपीआय) व्यवहारांनी सप्टेंबरमध्ये उच्चांकी पातळी गाठल्याचे रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीतून दिसून येते. या प्लॅटफॉर्मवर ऑगस्टमध्ये झालेल्या १.६१ अब्ज व्यवहारांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये १.८० अब्ज व्यवहार झाले. त्याचे मूल्य ३.३ लाख कोटी रुपये होते. 

‘जीएसटी’चे संकलन उच्चांकावर 
देशाच्या अर्थव्यवस्थेच्या तब्येतीचे एक निदर्शक असलेल्या वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) संकलनात सप्टेंबरमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आर्थिक वर्षाच्या प्रारंभापासून झालेल्या सततच्या ‘लॉकडाउन’मुळे उत्पादन क्षेत्र ठप्प झाले होते आणि साहजिकच त्याचा विपरित परिणाम पहिल्या पाच महिन्यांतील "जीएसटी''च्या संकलनावर मोठ्या प्रमाणात झाला होता. पण सप्टेंबरमध्ये तब्बल ९५,४८० कोटी रुपयांचा "जीएसटी'' जमा झाला, जो ऑगस्टमध्ये ८६,४४९ कोटी रुपये होता. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये "जीएसटी''चे संकलन ९१,९१६ कोटी रुपये होते. सरकारच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या करसंकलनात वाढ झाल्याने सरकारलाही दिलासा मिळाला आहे. 

वाहनविक्रीचाही गिअर पडला 
कोरोनाच्या साथीचा आणि ‘लॉकडाउन’चा मोठा फटका बसलेल्या वाहन उत्पादक कंपन्यांनीही आता गिअर टाकल्याचे जाणवू लागले आहे. जवळजवळ पाच महिने रुतलेले वाहनविक्रीचे चाक बाहेर पडून धावू लागले आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबरमध्ये वाहन उत्पादक कंपन्यांनी १३ टक्के अधिक वाहने रस्त्यांवर आणली. ट्रॅक्‍टरच्या विक्रीतही वाढ झाली असून, या क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राने १७-१८ टक्के अधिक विक्री केली आहे. यंदा चांगल्या आणि समाधानकारक मॉन्सूनमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची चिन्हे यातून दिसत आहेत. चारचाकींच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या मारूती सुझुकीने आपल्या एकूण वाहनविक्रीत वार्षिक पातळीवर ३१ टक्‍क्‍यांनी उसळी मारली आहे. दुचाकींच्या क्षेत्रातील नामांकीत बजाज ऑटोनेही सप्टेंबर २०२० मध्ये वाहनांची विक्रमी निर्यात केली आहे. गतवर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत त्यांची दुचाकीवाहनविक्री यंदा २० टक्‍क्‍यांनी वाढली आहे. 

उत्पादनवाढीचा निर्देशांक उंचावला 
अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा घटक मानल्या जाणाऱ्या उत्पादनवाढीचा निर्देशांकानेही आशेचा किरण दाखविला आहे. पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्‍स (पीएमआय) हा निर्देशांक सप्टेंबरमध्ये ५६.८ वर पोचला आहे. गेल्या साडेआठ वर्षांतील हा उच्चांक आहे. ऑगस्टमध्ये तो ५२ वर होता. ऑर्डर वाढत चालल्याने उत्पादनवाढीला चालना मिळत असल्याचे चित्र आता दिसू लागले आहे. 

शेअर बाजारही तेजीत 
अर्थव्यवस्थेचे एक प्रतिबिंब मानल्या जाणाऱ्या शेअर बाजारानेही तेजीची कास धरली आहे. गेल्या चार महिन्यांतील सर्वांत चांगली साप्ताहिक वाढ आता नोंदली गेली आहे. विविध कंपन्यांच्या प्राथमिक समभाग विक्रीलादेखील (आयपीओ) गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. याद्वारे उद्योगजगतातील संभाव्य सुधारणांवर गुंतवणूकदारांचा विश्‍वास बसत असल्याचे संकेत मिळत आहेत. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com