esakal | चिपी चा दुप्पट विस्तार झाल्यास निर्यातदार, उद्योजक, पर्यटकांना होणार फायदा | Mumbai
sakal

बोलून बातमी शोधा

Chipi Airport

चिपी चा दुप्पट विस्तार झाल्यास निर्यातदार, उद्योजक, पर्यटकांना होणार फायदा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कालपासून कार्यान्वित झालेल्या सिंधुदुर्ग मधील चिपी विमानतळाचा भविष्यात दुप्पट विस्तार करणे शक्य असून त्यामुळे येथे मोठ्या विमानांची उड्डाणे, निर्यात करण्याचे साहित्य साठवून ठेवणे, जास्त संख्येत विमानवाहतूक करणे व मोठ्या संख्येने पर्यटक येणे या बाबी शक्य होतील.

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लि. ची उपकंपनी असलेल्या आयआरबी सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा. लि. तर्फे हा विमानतळ उभारून आता त्याचे व्यवस्थापन केले जात आहे. परुळे गावच्या चिपीवाडी (ता. वेंगुर्ला) येथे उभारलेल्या या विमानतळामुळे पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, दक्षिण भारत एकंदर सर्वच भारताशी सिंधुदुर्ग जिल्हा जोडला गेला आहे.

हा विमानतळ महत्वाच्या जागी असल्याने आणिबाणीच्या काळात विमान उतरवणे किंवा अशाच प्रसंगी नजिकच्या विमानतळांना पर्याय म्हणून सज्ज राहणे यासाठीही त्याचा वापर होऊ शकतो. त्यासाठी विमानतळावर भरपूर जागा तसेच सुरक्षा व्यवस्था देखील आहे.

या विमानतळामुळे मालवाहतूकही सोपी होईल तसेच स्थानिकांना रोजगारसंधी व इतर व्यवसायसंधीही मिळतील. या विमानतळावर मालसाठवणुकीसाठी प्रचंड जागा असल्याने आणि त्यात वाढ करण्याची क्षमता असल्याने ते पश्चिम विभागाचे माल साठवणूक-वाहतूक केंद्रही होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील उद्योग वाढून विकासही होईल.

विमानतळाची वैशिष्ट्ये

  1. प्रवासी हाताळणी क्षमता - दरवर्षी 20 लाख, गर्दीच्या वेळी ताशी चारशे प्रवासी ये जा करू शकतात, ही संख्या दुप्पटही केली जाऊ शकते.

  2. मालसाठवणूक विभाग - दहा हजार चौ. मी जागा, भविष्यात वाढवता येईल.

  3. वाहनतळ - 75 मोटारी व 10 बस उभ्या राहू शकतील. ही जागाही भविष्यात वाढविता येईल.

व्यापारी विकासासाठीही भरपूर जागा उपलब्ध असून त्याने अधिक आर्थिक विकास व स्थानिकांना रोजगार मिळणे शक्य आहे. सिंधुदुर्ग-विजयदुर्ग, तारकर्लीचे अॅडव्हेंचर वॉटरस्पोर्ट्स तसेच धार्मिक व पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या विमानतळामुळे वाढेल.

हेही वाचा: Drugs Case - गोरेगावमधून नायजेरियन नागरिकाला अटक; आतापर्यंत २० जण ताब्यात

भविष्यात मोठी विमानेही शक्य

  1. भविष्यात देशी व परदेशी चार्टर्ड विमानांसाठीही येथे जागा उपलब्ध होऊ शकते.

  2. सध्याची धावपट्टी अडीच किलोमीटरची असून ती साडेतीन किलोमीटरपर्यंत वाढविता येईल.

  3. सध्या हँगरमध्ये 3 विमाने उभी राहू शकतात, ही संख्या 15 पर्यंत वाढविता येईल.

  4. इंडियन ऑईल मुळे भरपूर इंधनसाठाही उपलब्ध आहे.

loading image
go to top