फेसबुकसारख्या भागीदारीमुळं रिलायन्सला होणार 'हा' मोठा फायदा

mukesh ambani
mukesh ambani

मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज मार्च २०२१ पर्यत कर्जमुक्त होण्यासाठीचे नियोजन करते आहे. यासाठी कंपनी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची उभारणी करते आहे. रिलायन्स ५३,१२५ कोटी रुपयांचा राईट्स इश्यू बाजारात आणते आहे. त्याशिवाय फेसबुकची रिलायन्स जिओमधील ४३,५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक, ब्रिटिश पेट्रोलियमची इंधनाच्या रिटेल व्यवसायातील संयुक्त उपक्रमासंदर्भात रिलायन्समधील ७,००० कोटी रुपयांची गुंतवणूक, या सर्व गुंतवणूक आणि योजनांच्या माध्यमातून कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त होण्यासाठी पावले टाकते आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीजवर १,६१,०३५ कोटी रुपयांचे निव्वळ कर्ज होते. मागील आर्थिक वर्षात त्यात ८,००० कोटी रुपयांची भर पडली आहे. या कॅलेंडर वर्षात कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त होण्याच्या स्थितीत असेल, असे मत रिलायन्स इंडस्ट्रीजचे संयुक्त मुख्य वित्तीय अधिकारी व्ही श्रीकांत यांनी व्यक्त केले आहे. रिलायन्सच्या मागील सर्वसाधारण सभेत रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी मार्च २०२१ पर्यत कंपनीला कर्जमुक्त करण्याच्या प्रयत्नांना सुरूवात करत असल्याचे सांगितले होते. मार्च २०२० मध्ये कंपनीचे एकूण थकलेले कर्ज ३.३६ लाख कोटी रुपये इतके होते. तर कंपनीकडे १.७५ लाख कोटी रुपयांची रोकड आणि रोकडसदृश उपलब्धता आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजवर २.६२ लाख कोटी रुपये, रिलायन्स जिओवर २३,००० कोटी रुपये आणि रिलायन्स रिटेलवर ४,६०० कोटी रुपयांचे एकूण कर्ज आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

भांडवल उभारणीसाठी रिलायन्स तीन दशकांतील आपला पहिला राईट्स इश्यू बाजारात आणते आहे. २२ मेपासून याची प्रक्रिया सुरू होणार आहे. रिलायन्सचे समभागधारक त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक १५ शेअरमागे एका शेअरची खरेदी या राईट्स इश्यूद्वारे करू शकणार आहेत. राईट्स इश्यूसाठी रिलायन्सच्या एका शेअरची किंमती १,२५७ रुपये प्रति शेअर इतकी असणार आहे. सध्या राष्ट्रीय शेअर बाजारात रिलायन्सचा शेअर १,४६४ रुपये प्रति शेअर या पातळीवर आहे. 

रिलायन्सचा सौदी अरामकोबरोबरसुद्धा गुंतवणूकसंदर्भातील मोठा करार होतो आहे. सध्या यावर दोन्ही कंपन्यांमध्ये चर्चा होते आहे. आपण हा प्रस्ताव नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे पाठवण्याचे नियोजन करत असल्याचे रिलायन्स म्हटले आहे. या करारानुसार सौदी अरामको, रिलायन्स इंडस्ट्रीजचा २० टक्के हिस्सा विकत घेणार आहे. 

याशिवाय जिओमधील धोरणात्मक आणि वित्तीय गुंतवणूकीसाठी रिलायन्सकडे इतर प्रस्तावसुद्धा आले आहेत. फेसबुकबरोबरच्या आपल्या भागीदारीची घोषणा नुकताच रिलायन्सने केली आहे. फेसबुक रिलायन्स जिओमध्ये जवळपास ४३,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com