अर्थसंकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या घसरणीची शक्‍यता कमी

राजेंद्र सूर्यवंशी 
सोमवार, 24 जून 2019

- अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापारयुद्धाची तीव्रता कमी होताना दिसत नसून, यात वाढ होण्याचीच शक्‍यता.

अनिश्‍चिततेचे वातावरण वाढत असल्याने शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आपल्या बाजाराचे मूल्याधारित महाग मूल्यांकन, इराण-अमेरिका यांच्यातील वाढता राजकीय तणाव व जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची वर्तवली जाणारी शक्‍यता ही या चढ-उतारामागील कारणे दिसत आहेत. अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापारयुद्धाची तीव्रता कमी होताना दिसत नसून, यात वाढ होण्याचीच शक्‍यता आहे.

व्यापारयुद्धाचा वाद मिटावा म्हणून येत्या 28 व 29 तारखेला "जी-20' संमेलनाच्या वेळी चीन-अमेरिका या दोन्ही देशांचे अध्यक्ष भेटणार आहेत; परंतु एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करणे त्यांना जमेल का आणि हा वाद मिटेल का, याबाबत शंका आहे. इराण-अमेरिका यांच्यातील वाद वाढल्यास कच्च्या तेलाच्या भावात भडका उडण्याची शक्‍यता आहे. ही भीती टाळण्यासारखी नसल्याने आपला बाजार पुढील काही दिवस दबकत राहील. त्यात पावसाने दडी मारल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था बिघडण्याची शक्‍यता समोर येत आहे. आतापर्यंत सरासरीपेक्षा 40 टक्के कमी पाऊस झाला आहे. पुढे यात कशी सुधारणा होते, याकडे बाजाराचे लक्ष राहील.

बाजाराच्या वाढीला प्रतिबंध करणारे घटक अधिक आहेत. येत्या पाच जुलैला केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होणार आहे आणि ही एकच घटना बाजारात थोडी वाढ घडवणारी ठरू शकेल. या अर्थसंकल्पात बाजाराच्या वाढीसाठी काही घोषणा होण्याच्या अपेक्षेने बाजार या आठवड्यात फार घसरण्याची शक्‍यता नाही. अर्थसंकल्पाच्या तोंडावर "निफ्टी' 12,100 अंशांपर्यंत वाढण्याची शक्‍यता दिसत आहे; परंतु त्यापुढील काही महिने बाजार 12,100 अंशांच्या पुढे वाढण्याची शक्‍यता फार कमी आहे. 
"निफ्टी'ची चाल कशी असेल? 

मागील शुक्रवारी "निफ्टी' 11,724 अंशांवर बंद झाला असून; या आठवड्यासाठी 11,680 व 11,840 अंश या पातळ्या महत्त्वाच्या आहेत. जर "निफ्टी' 11,680 अंशांच्या खाली घसरून टिकला, तर पुढे 11,550 अंशांपर्यंत घसरण्याची शक्‍यता राहील.

11,840 अंशांच्या वर "निफ्टी' एक तास टिकला, तर पुढे 11,950 अंशांपर्यंत वाढू शकेल. या आठवड्यात 11,680 अंशांच्या पातळीवर आधार घेऊन वरच्या दिशेने वाढण्याची शक्‍यता अधिक आहे; पण जर 11,550 अंशांपर्यंत घसरला तर खरेदीसाठी उत्तम संधी असेल. "बॅंक निफ्टी'साठी 29,800 अंशांवर मोठा आधार असून, 31,400 अंशांवर विरोध दिसत आहे. या आठवड्यात बाजारात थोडे कमी चढ-उतार असण्याची शक्‍यता आहे. 

(डिस्क्‍लेमर : लेखक शेअर बाजाराचे संशोधक-विश्‍लेषक आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासानुसार वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. त्यांच्याशी "सकाळ' सहमत असेलच असे नाही. शेअर बाजारातील जोखमी लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finance Article Written by Rajendra Suryawanshi