Demat account : ‘डीमॅट’नी ओलांडला १० कोटींचा टप्पा

शेअर बाजार : पाच महिन्यात खात्यांच्या संख्येत दुपटीने वाढ
finance investment account Demat ac 10 crore share market nsdl cdsl sebi
finance investment account Demat ac 10 crore share market nsdl cdsl sebisakal

नवी दिल्ली : जागतिक आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारांमध्ये अस्थिर वातावरण असतानाही देशातील एकूण डीमॅट खात्यांच्या संख्येने ऑगस्ट महिन्यात तब्बल १० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना साथीच्या सुरवातीला मार्च २०२० मधील चार कोटींवरून ती दुपटीने वाढून १० कोटी पाच लाखांवर गेली आहे. ‘एनएसडीएल’ अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डीपॉझिटरी लिमिटेड आणि ‘सीडीएसएल’ सेंट्रल डीपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडने जाहीर केलेल्या अहवालावरून ही बाब स्पष्ट झाली आहे.

अवघ्या पाच महिन्यात डीमॅट खात्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. तर एका ऑगस्ट महिन्यात २२ लाख खाती उघडण्यात आली आहेत. गेल्या तीन वर्षांत डीमॅट खात्यांची संख्या तिपटीपेक्षा अधिक वाढली आहे. भारतीय शेअर बाजारांवर सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी दाखवलेला विश्वास अत्यंत उत्साहवर्धक असल्याचे मत शेअर बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ऑगस्ट महिनाअखेर ‘सीडीएसएल’कडील डीमॅट खात्यांची संख्या सात कोटी १६ लाखांहून अधिक होती. ‘सीडीएसएल’ने जानेवारी २०२० मध्ये दोन कोटी डीमॅटचा टप्पा ओलांडला होता. दोन वर्षांत ही संख्या तिप्पट झाली आहे. सध्या सीडीएसएल ही देशातील सर्वांधिक सक्रीय खाती असणारी संस्था आहे. या खात्यांमधील व्यवहारांचे मूल्य तब्बल ३८.५ लाख कोटी रुपये आहे.

‘एनएसडीएल’कडील ऑगस्ट महिन्याखेर असलेल्या खात्यांची संख्या दोन कोटी ८९ लाख इतकी असून त्याद्वारे व्यवस्थापन केल्या जाणाऱ्या मालमत्तेचे मूल्य ३२० लाख कोटी रुपये आहे. कोरोना साथीमुळे २०२० च्या सुरवातीपासून ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान भारतीय शेअर जगातील सर्वोत्तम कामगिरी करणारे होते. मात्र त्यानंतर, अमेरिकेतील महागाई चाळीस वर्षांच्या उच्चांकी पोहोचल्याने ती नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरवाढीचे आक्रमक धोरण स्वीकारले. त्यामुळे परदेशी गुंतवणुकदारांनी जून ते नऊ महिन्यांत विक्रमी ३३ अब्ज डॉलर काढून घेतले. मात्र स्थानिक गुंतवणूकदारांनी केलेल्या थेट आणि म्युच्युअल फंडातील एसआयपी गुंतवणुकीमुळे शेअर बाजार टिकून आहेत. सेन्सेक्स आता ऑक्टोबरमध्ये गाठलेल्या सर्वकालीन उच्चांकापासून पाच टक्के कमी आहे.

‘‘जागतिक अस्थिरतेतही भारतातील बाजारांची लवचिकता आश्चर्यकारक आहे. एसआयपी गुंतवणुकीमुळे ऑक्टोबर २०२१ ते जून २०२२ पर्यंत परकी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीच्या माऱ्यातही बाजार टिकून राहिले आहेत,’’ असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्हीके विजयकुमार यांनी म्हटले आहे.

डिपॉझिटरीवरील डीमॅट खाते संख्या

सीडीएसएल : ऑगस्टअखेर संख्या : ७ कोटी १६ लाख

व्यवहार मूल्य : ३८.५ लाख कोटी रुपये

एनएसडीएल : ऑगस्टअखेर संख्या : २ कोटी ८९ लाख

व्यवहार मूल्य : ३२० लाख कोटी रुपये

‘डीमॅट खात्यांच्या संख्येने १० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यावरून देशातील छोट्या गुंतवणूकदारांचादेखील शेअर बाजाराकडे कल वाढत असल्याचे स्पष्ट होते. गेल्या दोन वर्षांत डीमॅट खात्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीतून देशाच्या विकासात मोठे योगदान देत आहेत.’

- नेहल व्होरा, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, सीडीएसएल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com