गरज आर्थिक नियोजनाची !

आजकाल गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक नियोजनाची जाणीव हळूहळू रुजायला लागली आहे
financial planning
financial planning sakal

आजकाल गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक नियोजनाची जाणीव हळूहळू रुजायला लागली आहे. निवृत्तीनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक स्वातंत्र्य असायला हवे, हे पटायला लागले आहे. आर्थिक स्वातंत्र्यासाठी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीशिवाय पर्याय नाही हेही समजायला लागल्यामुळे गुंतवणूकदारांचा कल या गुंतवणुकीकडे वाढायला लागला आहे.

पूर्वी जी गुंतवणूक बँकेच्या एफडी, आरडीमध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये, सोन्याच्या भिशीत, रिअल इस्टेट, पीपीएफमध्ये जायची, ती गुंतवणूक आता म्युच्युअल फंडात हळूहळू यायला लागली आहे. गुंतवणूकदार निवृत्तीनंतरच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, दीर्घ कालावधीसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक चालू करतात. पण खरोखरच दीर्घ कालावधीनंतर एक मोठी रक्कम हवी असेल, तर एवढेच करून उपयोगाचे नाही. त्याबरोबर आणखी काही गोष्टींचा आपल्या आर्थिक नियोजनात समावेश असावा, असे प्रकर्षाने जाणवते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने दरमहा रुपये २५,००० हजार रुपयांची म्युच्युअल फंडात गुंतवणूक पुढील २० वर्षांसाठी (कारण २० वर्षानंतर तो माणूस निवृत्त होणार आहे) चालू केली, तर २० वर्षांनंतर त्याला किती अपेक्षित रक्कम मिळू शकते आणि दुसऱ्या व्यक्तीने तेवढीच रक्कम ‘पीपीएफ’मध्ये केली तर किती अपेक्षित रक्कम मिळेल ते आपण पाहू.

म्युच्युअल फंड पीपीएफ

मासिक गुंतवणुकीची रक्कम : २५,०००

गुंतवणुकीचा कालावधी : २० वर्षे

एकूण गुंतवणूक रक्कम : ६०,००,०००

परतावा : १५ टक्के परतावा : ८ टक्के

मूल्यांकन : ३,३१,७६,८३६ मूल्यांकन : १,४३,१६,५०१

सोबतच्या तक्त्यांवरून आपणास हे लक्षात येते, की २० वर्षांनंतर आपण म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक साधारण ५.५ पट वाढेल आणि ‘पीपीएफ’मध्ये केलेली गुंतवणूक २.३९ पटीने वाढेल. म्हणून निवृत्तीनंतरच्या सुखी जीवनासाठी म्युच्युअल फंडातच गुंतवणूक केली पाहिजे म्हणजे निवृत्तीनंतर या गुंतवणुकीतून येणाऱ्या रकमेतून आपले जीवन आर्थिकदृष्ट्या सुखकर होईल. पण हे केव्हा होईल? दरमहा सलग २० वर्षे सातत्याने गुंतवणूक केली आणि अधेमध्ये कोणत्याही कारणासाठी ही गुंतवणूक मोडली नाही तर आणि तरच हे उद्दिष्ट साध्य होऊ शकते. ही गुंतवणूक दीर्घकाळासाठी टिकवायची असेल, तर या गुंतवणुकीसोबत आणखी काही गोष्टी करणे अत्यावश्यक आहे.

आरोग्य विमा (हेल्थ इन्शुरन्स) : हा विमा असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण हा विमा नसेल आणि कोणत्याही आजारपणामुळे घरातील एखादी व्यक्ती दवाखान्यात भरती झाली तर दवाखान्याचे संपूर्ण बिल आपल्याला आपल्या खिशातून भरावे लागते आणि मग अशा अडचणीच्या काळात कदाचित आपल्याला आपली दीर्घकालीन केलेली गुंतवणूक विकण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

अपघाती विमा (ॲक्सिडेंटल प्लॅन) : या विम्याबाबत बऱ्याच लोकांना माहिती नसते. आपल्याला कधी अपघात झाला तर विमा उपयोगी पडतो. अशावेळेस आजारपणासाठी काढलेला विमा वापरू नये. अपघाती विमा वापरावा. याचे अजून अनेक वेगवेगळे फायदे आहेत. तज्ज्ञांकडून अधिक माहिती घेऊन हा विमा अवश्य घ्यावा.

इमर्जन्सी फंड : आर्थिक नियोजन करूनही काही खर्च असे असतात जे आकस्मिक आपल्यासमोर उभे राहतात. अशावेळी आपल्याकडे इमर्जन्सी फंडाची व्यवस्था नसेल तर आपल्याला निवृत्तीसाठी केलेली गुंतवणूक वेळेआधी विकावी लागते. हे होऊ नये म्हणून दीर्घकालीन गुंतवणुकीबरोबर इमर्जन्सी फंडाची गुंतवणूक चालू करावी. ही गुंतवणूक शेअर बाजाराशी निगडित असलेल्या गुंतवणूक प्रकारात करू नये. ही गुंतवणूक दरवर्षी निश्चित परतावा देणाऱ्या गुंतवणूक प्रकारात करावी. इथे आपल्याला परतावा कमी मिळेल; पण याचे उद्दीष्ट परतावा मिळविणे नसून अडीअडचणीच्या वेळेस पैसे उपलब्ध करणे हा आहे.

दीर्घकालीन गुंतवणुकीबरोबर आपण वरील गोष्टी केल्या नाहीत तर दीर्घकालीन गुंतवणूक दीर्घकाळाकरिता टिकणे अवघड आहे. ही गुंतवणूक आपण काही ठरविक काळानंतर सतत विकत राहिलो तर यावर मिळणारा कंपाउंडिंग इफेक्ट बंद होतो आणि निवृत्तीच्या वेळेस अपेक्षा असलेली मोठी रक्कम हे स्वप्नच राहण्याची शक्यता असते. आणि निवृत्तीनंतर पुन्हा आर्थिक विवंचनेतून सुटण्याकरिता तीच कसरत करावी लागेल. विचार करा...

(लेखक ‘किरण जाधव अँड असोसिएट्स’मध्ये म्युच्युअल फंड तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी www.Kiranjadhav.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com