तुमच्या एलआयसी पॉलिसीची सद्य:स्थिती काय आहे? आता जाणून घ्या घरबसल्या एका क्‍लिकवर 

श्रीनिवास दुध्याल 
Friday, 12 February 2021

जीवनात येणाऱ्या अप्रिय घटनांना सामोरे जाण्यासाठी आज प्रत्येकजण विमा भरतो. मात्र त्याचा हप्ता भरणे, विम्याची सद्य:स्थिती, जमा रक्कम, अंतिम मुदत व आपल्या विम्यासंबंधी इतर अनेक बाबी जाणून घेण्यासाठी विमा ऑफिसच्या चकरा मारून वेळ घालविणे हे प्रत्येक विमाधारकास शक्‍य नसते. त्यामुळे विमाधारकांना आपल्या विम्याची सद्य:स्थिती समजून घेता येत नाही. 

सोलापूर : जीवनात येणाऱ्या अप्रिय घटनांना सामोरे जाण्यासाठी आज प्रत्येकजण विमा भरतो. मात्र त्याचा हप्ता भरणे, विम्याची सद्य:स्थिती, जमा रक्कम, अंतिम मुदत व आपल्या विम्यासंबंधी इतर अनेक बाबी जाणून घेण्यासाठी विमा ऑफिसच्या चकरा मारून वेळ घालविणे हे प्रत्येक विमाधारकास शक्‍य नसते. त्यामुळे विमाधारकांना आपल्या विम्याची सद्य:स्थिती समजून घेता येत नाही. मात्र, आता एलआयसीने (लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन) आपल्याला घरबसल्या आपल्या विम्यासंबंधी विविध बाबी जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

आता ग्राहक त्यांच्या एलआयसी पॉलिसीची सगळी माहिती ऑनलाइन घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना एलआयसी ऑफिसमध्ये जाण्याची आवश्‍यकताच नाही. घरातील कर्त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर त्याच्यामागे त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक तरतूद करण्याचा एक सुरक्षित पर्याय म्हणून एलआयसी पॉलिसी घेतली जाते. आज देशात अनेक विमा कंपन्या आल्या असल्या तरी एलआयसी ही देशातील सर्वांत मोठी आयुर्विमा कंपनी असून, तिची विश्वासार्हता गेल्या 65 वर्षांपासून अबाधित आहे. 

बदलत्या काळानुसार एलआयसीनेही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ग्राहकांना सर्व आधुनिक सेवा सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे एलआयसीच्या ग्राहकालाही आता घरबसल्या सर्व माहिती मिळू शकते. पॉलिसीचा हप्ताही घरबसल्या भरता येतो. तसेच रजिस्ट्रेशन केलेले असल्यास पुढचा हप्ता कधी भरायचा आहे, याची पूर्वसूचनाही आता मोबाईलवर एसएमएसद्वारे दिली जाते. घरबसल्या काम होत असल्याने ग्राहकांचा वेळ आणि ऊर्जाही वाचते. 

ऑनलाइनद्वारे अशी घ्या आपल्या एलआयसी पॉलिसीची माहिती 
एलआयसी पॉलिसीची ऑनलाइन माहिती मिळवण्यासाठी सर्वांत आधी एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर https://www.licindia.in रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन नि:शुल्क आहे. यासाठी तुमचे नाव, जन्म तारीख, पॉलिसी क्रमांक नोंदवावा लागेल. एकदा तुमचे नाव रजिस्टर झाले की तुम्ही केव्हाही तुमच्या पॉलिसीची अद्ययावत माहिती घेऊ शकता. 

अशी घ्या आपल्या एलआयसी पॉलिसीची एसएमएसद्वारे माहिती 
एलआयसी पॉलिसीची एसएमएसद्वारे माहिती मिळवण्यासाठी 56677 या क्रमांकावर तुमच्या मोबाईलवरून एसएमएस पाठवावा लागेल. पॉलिसीचा हप्ता किती आहे हे जाणून घेण्यासाठी ASKLIC PREMIUM असा मेसेज 56677 क्रमांकावर पाठवावा. पॉलिसी लॅप्स झाली असेल तर ASKLIC REVIVAL असा मेसेज 56677 क्रमांकावर पाठवावा लागेल. 

अशी घ्या आपल्या एलआयसी पॉलिसीची कॉलवर माहिती 
तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही 022-68276827 या क्रमांकावर फोन करू शकता किंवा 9222492224 या क्रमांकावर LICHELP आणि पॉलिसी नंबर पाठवून माहिती मिळवू शकता. मेसेज पाठवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Find out the current status of your LIC policy online at home