जग मंदीच्या उंबरठ्यावर, तरी परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावर विश्वास; कारण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

investment

जग मंदीच्या उंबरठ्यावर, तरी परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावर विश्वास; कारण...

भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑक्टोबरमध्ये सर्वात जास्त विक्री करणाऱ्या विदेशी गुंतवणूकदारांचा (एफपीआय) विश्वास पुन्हा भारतीय बाजारात परतला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेत 15,280 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात शेअर बाजारातही तेजी येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : भारतीय महिलांचा सुरक्षित गुंतवणुकीकडेच का असतो ओढा?

अमेरिकेतील फेड रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर वाढवण्याच्या भीतीने विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात पैसे गुंतवले आहेत. कोटक सिक्युरिटीजचे इक्विटी रिसर्चचे प्रमुख श्रीकांत चौहान यांच्या मते, भू-राजकीय तणाव आणि कठोर आर्थिक धोरणामुळे परदेशी गुंतवणूकदारांना बाजारातील अनिश्चिततेची भीती वाटते. यूएसमध्ये, महागाई 40 वर्षांच्या उंचीवर आहे, तर रोजगाराची स्थिती देखील कमकुवत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना भारतीय बाजारपेठेत पैसे गुंतवणे अधिक सुरक्षित वाटते.

पाच दिवसांत १५ हजार कोटींची गुंतवणूक

NSE कडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरच्या पहिल्या पाच दिवसांत 1 ते 4 नोव्हेंबरपर्यंत बाजारात 15,280 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याआधीच्या महिन्याबद्दल बोलायचे झाल्यास, ऑक्टोबरमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून 8 कोटी रुपये काढून घेतले होते, तर सप्टेंबरमध्ये 7,624 कोटी रुपये काढले होते. तरीही ही रक्कम काढण्यापूर्वी, ऑगस्टमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी निव्वळ गुंतवणूक करून एकूण 51,200 कोटी रुपये बाजारात ठेवले होते. यापूर्वी जुलैमध्येही 5 हजार कोटींची गुंतवणूक झाली होती.

हेही वाचा: Nirmala Sitharaman : पंतप्रधान मोदींमुळे राज्यांना मिळतो ४२ टक्के कर

2021 च्या अखेरीपासून ते 2022 च्या मध्यापर्यंत सलग नऊ महिने परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून भांडवल काढून घेतले होते. हे चक्र ऑक्टोबर 2021 मध्ये सुरू झाले आणि या नऊ महिन्यांत एकूण 1.53 लाख कोटी रुपयांचे भांडवल बाजारातून काढून घेण्यात आले. ऑक्टोबरमध्येही एफपीआयने (Foreign portfolio investment) विक्री सुरू केली, जी नंतर मंदावली आणि महिन्याच्या अखेरीस बाजारातून केवळ 8 कोटी रुपये भांडवल काढून घेण्यात आले.

भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा विश्वास

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणशास्त्रज्ञ व्ही.के.विजयकुमार यांनी सांगितले की, यूएस बॉण्डचे वाढते उत्पन्न आणि मजबूत डॉलर असूनही, परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करणे अधिक महत्त्वाचे आहे. याचा अर्थ विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरचा विश्वास वाढत आहे. याचे कारण असे की, यावेळी जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचा धोका आहे, तर भारतावर त्याचा परिणाम कमी होण्याची अपेक्षा आहे.