फ्रॅंकलिन टेम्पलटनने सेबीची मागितली विनाशर्त माफी

फ्रॅंकलिन टेम्पलटनने सेबीची मागितली विनाशर्त माफी

फ्रॅकलिन टेम्पलटन या देशातील आघाडीच्या अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने सिक्युरिटिज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची (सेबी) विनाशर्त माफी मागितली आहे. फ्रॅंकलिन टेम्पलटनच्या जागतिक प्रेसिडेंट आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेनी जॉनसन यांनी व्यक्त केलेल्या आपल्याला डेट प्रकारातील योजना गुंडाळाव्या लागण्यास कारणीभूत असलेल्या घटकांमध्ये सेबीच्या कडक नियमावलीचाही समावेश आहे, असे मत जॉनसन यांनी व्यक्त केले होते. जॉनसन यांनी तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केलेल्या मताचा माध्यमांतून विपर्यास करण्यास करण्यात आला, असे स्पष्टीकरण फ्रॅंकलिन टेम्पलटनने दिले आहे.

'जॉनसन यांच्या वक्तव्यामुळे सेबीच्या प्रतिमेला धक्का लागला असल्यास आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. सेबीबद्दल आमच्या मनात नेहमीच पूर्ण आदर आहे आणि आम्ही विनाशर्त माफी मागत आहोत', असे फ्रॅंकलिन टेम्पलटन एएमसीचे अध्यक्ष संजय सप्रे यांनी म्हटले आहे.

* आमच्या व्यवसायासाठी आणि ग्राहकांसाठी आम्ही कटिबद्ध, फ्रॅंकलिन टेम्पलटनचे स्पष्टीकरण
* फ्रॅंकलिन टेम्पलटनच्या जागतिक प्रेसिडेंट आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेनी जॉनसन यांनी केली होती सेबीवर टीका
* फ्रॅंकलिन टेम्पलटन एएमसीचे अध्यक्ष संजय सप्रे यांनी व्यक्त केला सेबीबद्दल आदर
*आठवडाभरापूर्वी फ्रॅंकलिन टेम्पलटनने बंद केल्या होत्या सहा डेट योजना

याआधी जॉनसन यांनी सेबीच्या नव्या नियमावलीवर टीका केली होती. दुर्दैवाने सेबीच्या नव्या नियमावलीमुळे आमचा एकतृतियांश निधी अडकला आहे. एखाद्या फंडामधील १० टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा हा बिगरनोंदणीकृत गुंतवणूक संस्थांमध्ये नसला पाहिजे असे सेबीच्या नव्या नियमात म्हटलेले आहे, असे मत जॉनसन यांनी व्यक्त केले होते.

या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या गैरसमजाबद्दल फ्रॅंकलिन टेम्पलटन एएमसीने दिलगिरी व्यक्त केली आहे.

कोविड-१९ महामारीमुळे निर्माण झालेल्या संकटामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी डेट फंडामधून गुंतवणूक काढून घेण्यास सुरूवात झाल्यानंतर चलन तरलतेचा प्रश्न निर्माण झाल्याचे कारण देत फ्रॅंकलिन टेम्पलटनने मागील आठवड्यात सहा डेट प्रकारातील योजना बंद केल्या होत्या.  

फ्रॅंकलिन टेम्पलटनच्या डेट योजनांमधील गुंतवणूक ज्या 'एएए' पेक्षा कमी मूल्यांकन असलेल्या कमर्शियल पेपर किंवा बॉंडमध्ये होती त्यांच्याकडून चलन तरलता उपलब्ध होत नसल्यामुळे अडचणीची परिस्थिती निर्माण झाली होती. 

फ्रॅंकलिन टेम्पलटनच्या डेट प्रकारातील सहा योजना बंद करण्याच्या निर्णयामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतता पसरली होती. त्यानंतर त्यांच्या जागतिक अध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यामुळेही वाद निर्माण झाला होता. जॉनसन यांच्या वक्तव्यांमुळे नाराज झालेल्या सेबीने निवेदन जाहीर करत मागील वर्षी ऑक्टोबरपासून लागू केलेल्या आपल्या नव्या नियमांची पाठराखण केली होती. याशिवाय सेबीने फ्रॅंकलिन टेम्पलटन एएमसीला त्यांच्या सहा डेट योजनांमधील गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास सांगितले होते. 

'सप्टेंबर २०१८ पासून सुरू असलेल्या क्रेडिट घटनांमुळे कॉर्पोरेट बॉंड बाजारासमोरील आव्हाने वाढवली होती. त्यानंतर म्युच्युअल फंडांसंदर्भातील आराखड्याचे पुनरावलोकन करण्याची, गुंतवणूकदारांच्या हिताच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासंदर्भात पावले उचलण्याची आणि गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीसंदर्भात शिस्त आणि सक्षमता निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती', असे मत जॉनसन यांच्या वक्तव्यांसदर्भात बोलताना सेबीने व्यक्त केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नव्या नियमांच्या अंमलबजावणीचा निर्णय १८ सदस्यीय समितीच्या सल्लामसलतीने आणि चर्चेतून घेण्यात आला होता. त्यात सप्रे यांचाही समावेश होता, असेही सेबीने पुढे म्हटले आहे. 

'तर डेट योजना बंद करण्याचा निर्णय अवघड होता परंतु त्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता, असे फ्रॅंकलिन टेम्पलटन एएमसीने म्हटले आहे. हा निर्णय टाळल्यासाठी सर्व शक्य ते प्रयत्न करण्यात आले परंतु सरतेशेवटी गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीच्या हितासाठी हाच सर्वात योग्य पर्याय असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. ट्रस्टींना विश्वासात घेत सर्व गुंतवणूकदारांची गुंतवणूक योग्य पद्धतीने आणि लवकरात लवकर परत करण्यास कंपनी बांधिल आहे', असे  फ्रॅंकलिन टेम्पलटन एएमसीने म्हटले आहे.

'फ्रॅंकलिन टेम्पलटनला भारतातील कामकाजाचा २५ वर्षांचा इतिहास आहे. जगातील आमच्या एकूण मनुष्यबळापैकी एक तृतियांश मनुष्यबळ भारतात आहे आणि भारतातील आमच्या व्यवसायासाठी आणि ग्राहकांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत', असे सप्रे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com