Gauri raste writes about Will Registration finance
Gauri raste writes about Will Registration finance sakal

नोंदणीकृत इच्छापत्र

वडिलार्जित संपत्ती आपल्या पश्चात आपल्या वारसांच्या हाती सोपविण्याचा राजमार्ग म्हणजे नोंदणीकृत इच्छापत्र!
Summary

वडिलार्जित संपत्ती आपल्या पश्चात आपल्या वारसांच्या हाती सोपविण्याचा राजमार्ग म्हणजे नोंदणीकृत इच्छापत्र!

कष्टाने मिळवलेली स्थावर आणि जंगम संपत्ती आणि आपल्या वाटणीस आलेली वडिलार्जित संपत्ती आपल्या पश्चात आपल्या वारसांच्या हाती सोपविण्याचा राजमार्ग म्हणजे नोंदणीकृत इच्छापत्र!

मात्र इच्छापत्र करावे, अशी सूचना ज्येष्ठांना केली, की त्यांच्याकडून एक मूलभूत प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे आम्ही इच्छापत्र का करावे? आम्ही काही संपत्ती वर घेऊन जाणार नाही, आमची मुले अगदी समंजस आहेत, आमच्या माघारी आमची मुले बघून घेतील, आमच्या संपत्तीचे काय करावे ते. मग कशाला हवे इच्छापत्र? त्यांच्या प्रश्‍नाचे उत्तर काही उदाहरणांमधून आपोआप समोर येईल.

वारसा सिद्ध करण्याची वेळ

गणेश काका, सुचेता काकू आणि त्यांचा एकुलता एक मुलगा, अजित, असे सुखी कुटुंब! वृद्धापकाळाने काका-काकूंचे निधन झाले. आता प्रश्न आला, आपल्या आई-वडिलांच्या निधनानंतर स्थावर संपत्तीवर नाव लावून घेण्याचा, जंगम संपत्ती मालकीची करून घेण्याचा! काका-काकूंनी इच्छापत्र केले नव्हते.

त्यांची खात्री होती, आपला मुलगा एकुलता एक आहे, इच्छापत्र कशाला करायचे? आपल्यानंतर विनासायास सर्व त्याच्या मालकीचे होईल; पण प्रत्यक्षात मात्र,“ मी मुलगा एकुलता एक आहे,” हे अजितला सर्व ठिकाणी विविध कागदपत्रे देऊन, पुरावे देऊन, पटवून द्यावे लागत होते. वारसापत्र मिळविणे, त्यासाठी लागणारी कागदपत्रे गोळा करताना, त्यासाठी खर्च करताना, विविध कचेऱ्यांमध्ये हेलपाटे घालताना अजितचा जीव अगदी मेटाकुटीस आला.

संपत्ती वाटप सुकर

सुजाता आणि सुरेश काका यांना दोन मुले. मुलगी लग्न होऊन परगावी रहात होती. मुलगा त्यांच्या जवळ रहात होता. सुजाता ताई आणि सुरेश काकांनी अगदी रीतसर नोंदणीकृत इच्छापत्र बनवले. मुलीला कोणती संपत्ती द्यावी, मुलाला कोणती संपत्ती हे सारे रीतसर त्यात लिहिले.

त्यामुळे कोणताही त्रास न होता, विनासायास, सारी कामे वेळेत पूर्ण झाली. आपल्या आई-वडिलांच्या नियोजनाचे दोघा वारसांना खूप कौतुक वाटले. केवळ इच्छापत्र केल्यामुळे, सर्व व्यवहार वेळेत पार पडले.

इच्छा पूर्ण करण्याचा सोपा मार्ग

आपल्या पश्चात आपल्या संपत्तीमधील काही भाग समाजकार्यासाठी दान करावा, आपल्या संपत्ती मधून गरजू मुलांचे शिक्षण व्हावे, अशी शामलाताईंची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी नोंदणीकृत इच्छापत्र केले, त्यामध्ये त्यांची ही इच्छा लिहून ठेवली.

त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांची ही प्रामाणिक इच्छा त्यांच्या वारसांनी पूर्ण केली. इच्छापत्र केले नसते, तर मुलांना आईच्या या इच्छेचा पत्ता लागला नसता आणि शामलाताईंची इच्छा अपूर्णच राहिली असती. निधनानंतरसुद्धा आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा सोपा मार्ग, म्हणजे इच्छापत्र!

अवघड झाले सोपे

अशी किती उदाहरणे आहेत, की नोंदणीकृत इच्छापत्र केल्यामुळे अवघड गोष्टी सोप्या झाल्या आहेत. ज्येष्ठांनी आपल्या दोघांचे आर्थिक व्यवहार एकमेकांना पूर्ण माहिती करून दिलेच पाहिजेत. इच्छापत्रात सुरुवातीला ते करणारी व्यक्ती, त्यांचे वारस, वारसांची पूर्ण नावे, जन्मतारीख, इत्यादी तपशील लिहिलेला असतो,

त्यामुळे वारसांना संपत्ती नावावर करून घेणे सोपे होते. वेळेवर इच्छापत्र न करण्यामागे केवळ आडमुठेपणा, हट्टीपणा, वेळकाढूपणा हे फार मोठे अडथळे आहेत. आपल्या पश्चात आपल्या वारसांना आपली कष्टाची कमाई कोणताही वेगळा कर न भरता, विविध कचेऱ्यामध्ये जास्त हेलपाटे न घालता, सुपूर्द करता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com