वर्षभरात जागतिक मंदी धडक देणार; मात्र भारतात नाही

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

"मॉर्गन स्टॅन्ले"चा इशारा

 मुंबई: अमेरिका आणि चीन या बलाढ्य महासत्तांमधील दिर्घकाळ सुरू असलेल्या व्यापारी संघर्षाचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेला भोगावे लागणार आहेत. येत्या नऊ महिन्यांमध्ये जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत सापडेल, असा इशारा मॉर्गन स्टॅन्ले या संस्थेने दिला आहे. मात्र भारत अजूनही मंदीपासून दूर असली तरी मंदीसदृश्‍य परिस्थितीने विकासाचा वेग कमी केल्याचे या संस्थेने म्हटले आहे. 

जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीच्या खाईत लोटण्यात व्यापारी संघर्ष कारणीभूत आहे. अनेक घटकांमधून महामंदीचे संकेत मिळत आहेत. ज्यात बॉंड यिल्डची सुमार कामगिरी 2008 च्या महामंदीप्रमाणे सुरू आहे. अमेरिकेकडून व्यापारी संघर्ष आणखी ताणला गेल्यास येत्या तीन तिमाहीमध्ये जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत सापडेल, असे मॉर्गन स्टॅन्लेने म्हटले आहे. सध्या ब्रिटन आणि इतर युरोपीय देशांवर मंदीचे वादळ घोंघावत आहे. ब्रेक्‍झिट आणि राजकीय अस्थिरतेमुळे दुसऱ्या तिमाहीत ब्रिटनचा आर्थिक विकास खुंटला. ज्यातून ब्रिटन मंदीच्या उंबरठ्यावर असल्याचे मॉर्गन स्टॅन्लेने आपल्या अहवालात म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला तूर्त मंदीचा धोका नसला तरी वाहन उद्योगातील तीव्र मंदी अर्थव्यवस्थेवर परिणाम करेल, असे या अहवालात म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Global economy may face recession in 9 months, but not India