सोन्या-चांदीला आली झळाळी; आजवरच्या उच्चांकी दराची झाली नोंद!

वृत्तसंस्था
Friday, 7 August 2020

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International Market) सोन्याचा भाव २०६१ डॉलर प्रति औंस तर चांदीचा दर २८.३६ डॉलर प्रति औंस एवढा आहे.

नवी दिल्ली : दिल्ली सराफ बाजारात शुक्रवारी (ता.७) सोन्याच्या दराने (Gold Rate) आजवरची उच्चांकी (all-time high) नोंद केली आहे. सलग १६ व्या सत्रात वाढीसह सोन्याने उच्चांकी पातळी गाठली आहे. सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी ५७,००८ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. मात्र, शुक्रवारी फक्त ६ रुपयांची वाढ झाली आहे. गुरुवारी दिल्ली सराफ बाजारात (Gold price in Delhi) १० ग्रॅम सोन्याचा भाव ५७,००२ रुपये एवढा होता. 

Breaking : आरबीआयचं पतधोरण जाहीर; कर्जाच्या व्याज दरांवर परिणाम नाही

दुसरीकडे चांदीनेही आपली चमक कायम राखली आहे. शुक्रवारी चांदीच्या किंमतीत (Silver Price) ५७६ रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे दिल्ली सराफ बाजारात चांदीचा दर प्रति किलो ७७,८४० रुपये या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. बाजाराच्या गेल्या सत्रात एक किलो चांदीचा दर ७७,२६४ रुपये नोंदविला गेला होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International Market) सोन्याचा भाव २०६१ डॉलर प्रति औंस तर चांदीचा दर २८.३६ डॉलर प्रति औंस एवढा आहे.   

सोन्यावर 90 टक्क्यांपर्यंत कर्ज, रिझर्व्ह बँकेचा निर्णय​

वायदा बाजारातही तेजी
मोठ्या प्रमाणात होत असलेल्या मागणीमुळे सट्टेबाजांनीही नवी सौदे खरेदी केली आहे. त्यामुळे फ्युचर्स मार्केटमध्येही शुक्रवारी ७५ रुपयांनी वाढ होऊन सोन्याचा दर ५५,९२० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये ऑक्टोबर महिन्यात डिलिव्हरी करण्यात येणाऱ्या सोन्याच्या कराराचे दर ७५ रुपये म्हणजे ०.१३ टक्क्यांनी वाढून ५५,९२० रुपये प्रति दहा ग्रॅम इतके झाले होते. १६४६८ लॉटसाठी हा व्यापार झाला.

सोने-चांदी बाजार विश्लेषकांनी सांगितले की, व्यापाऱ्यांनी नवीन सौदे खरेदी केल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ नोंदविली गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत न्यूयॉर्कमध्ये (New York) सोन्याचा दर प्रति औंस ०.१४ टक्क्यांनी वाढून २०७२.२० डॉलर इतका नोंदविला गेला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold and Silver price climbs life time high for 15th successive day