ब्रेकिंग : सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 September 2019

भारतातील वायदे बाजारात (एमसीएक्‍स) सोने दहा ग्रॅममागे एक हजार रुपयांनी (38,600), तर चांदी एका किलोमागे दोन हजार रुपयांनी (49,300) उतरली होती. 

पुणे ः अमेरिकेतील सेवा क्षेत्राची वाढ चांगली झाल्याची आकडेवारी समोर आली असून, त्याचा परिणाम सोने-चांदीच्या भावात घसरण होण्यात झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या दोन्ही धातूंच्या भावात सुमारे 3 टक्के घट झाल्याचे आज रात्री दिसून आले. परिणामी, भारतातील वायदे बाजारात (एमसीएक्‍स) सोने दहा ग्रॅममागे एक हजार रुपयांनी (38,600), तर चांदी एका किलोमागे दोन हजार रुपयांनी (49,300) उतरली होती. 

इन्स्टिट्यूट ऑफ सप्लाय मॅनेजमेंटने (आयएसएम) नॉन-मॅन्युफॅक्‍चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्‍स म्हणजेच सेवा क्षेत्राचा निर्देशांक आज जाहीर केला. जुलैतील 53.7 टक्‍क्‍यांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये तो 56.4 टक्‍क्‍यांवर नोंदला गेल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या निर्देशांकात 2.7 टक्‍क्‍यांनी झालेली वाढ ही बाजारालाही चकीत करून गेली. अशी 50 टक्‍क्‍यांच्या वर आकडेवारी दिसत राहिल्यास ते आर्थिक प्रगतीचे लक्षण मानले जाते.

थोडक्‍यात, अमेरिकेच्या आर्थिक परिस्थितीतील सुधारणेचा तो एक निकष समजला जातो. याचा परिणाम सोने-चांदीच्या भावात घसरण होण्यात झाला. त्याचबरोबर अमेरिका व चीन यांच्यात व्यापारशुल्कावरून सुरू झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी ऑक्‍टोबरच्या पहिल्या टप्प्यात पुन्हा चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे. त्याचाही परिणाम या मौल्यवान धातूंच्या भावातील घसरणीवर झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. 

"सोने-चांदीच्या भावात होणारी प्रत्येक घसरण ही गुंतवणूकदारांना खरेदीची संधीच असेल, कारण जागतिक पातळीवर आर्थिक आघाडीवर फार मोठ्या बदलाची शक्‍यता दिसत नाही. सेवा क्षेत्रातील सुधारणेसारख्या बातमीमुळे भावात घसरण झाल्यास गुंतवणूकदार व ट्रेडरना दोन वर्षांचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून खरेदीची संधीच मिळवून देत आहे.'' - अमित मोडक, कमोडिटीतज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold and silver prices fall sharply