बापरे! येत्या दोन वर्षात सोन्याचे दर गाठणार इतकी उंची

वृत्तसंस्था
Thursday, 2 July 2020

सोन्याचे दर येते काही दिवस चढेच राहणार असल्याचं तज्ज्ञाकडून सांगण्यात येत आहे. येत्या दोन वर्षात सोन्याचे दर 65000 ते 68000 पर्यंत पोहोचतील असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. त्यामुळे काही दिवस सोनं भाव खाणार असल्याचं दिसत आहे.

नवी दिल्ली- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांमधील असुरक्षितता वाढत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे लोकांचा कल सोने खरेदीकडे वाढला आहे. परिणामी सोन्याच्या दराने भारतात नवा विक्रम गाठला आहे. जगभरात सोन्याचे दर वाढत असताना भारतातही ते वाढत आहेत. सध्या भारतात सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 50 हजार 700 रूपयांवर गेले आहेत. आतापर्यंत सोन्याच्या दरात झालेली ही सर्वात मोठी उच्चांकी वाढ आहे. कोरोनामुळे जागतिक बाजारपेठेत मंदी आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही विविध प्रकारचे बदल होत आहेत. परिस्थिती अशीच राहिली तर सोन्याची किंमत येत्या काही दिवसांत गगनाला भीडू शकते. चांदीच्या दरातही मोठी वाढ दिसून येत आहे. चांदीचा भाव 50 हजारांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे एक किलो चांदीसाठी तब्बल 51 हजार 500 रुपये मोजावे लागत आहेत.  

ब्रेकिंग - जेलमधील 10 जणांना कोरोनाची लागण...
कोरोना महामारीमुळे जगभरात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सर्व देशांच्या अर्थव्यवस्था मंदावल्या आहेत. सध्या परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी सर्व काही सुरळीत व्हायला अनेक वर्षे लागणार आहेत. सोन्याचे दरही येते काही दिवस चढेच राहणार असल्याचं तज्ज्ञाकडून सांगण्यात येत आहे. येत्या दोन वर्षात सोन्याचे दर 65000 ते 68000 पर्यंत पोहोचतील असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. त्यामुळे काही दिवस सोनं भाव खाणार असल्याचं दिसत आहे.

अडचणीच्या काळात गुंतवणूक म्हणून भारतीयांनी नेहमीच सोन्याला पसंती दिली आहे. अशात कोरोना महामारीमुळे मंदी सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे  नागरिकांमधील असुरक्षितता वाढली असून त्यांनी सोने खरेदी सुरु केली आहे. टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर सराफ बाजारातील उलाढाल ठप्प झाली होती. परंतु, कमोडिटी मार्केटमध्ये उलाढाल सुरू असल्याने सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर पोहचले होते. 

चिंताजनक ! कोरोनाग्रस्तांची संख्या ६ लाखांच्या वर
दर आणखी भडकण्याची शक्‍यता 

टाळेबंदीत काही अंशी शिथिलता देण्यात आल्यानंतर सराफ बाजार हळूहळू पूर्वपदावर येत आहे. असे असले तरी कमोडिटी मार्केटमध्ये असलेले उच्चांकी भाव आता प्रत्यक्ष बाजार सुरू झाल्यानंतरही कायम आहेत. शिवाय, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची मागणी वाढली. सोन्याचे भाव अजून वाढण्याची शक्‍यता आर. सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशील बाफना यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

खरेदीचाही कल वाढला 

लॉकडाउन सुरू असला तरी लग्नसराई काही प्रमाणात सुरू आहे. यामुळे सोने- चांदी खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. दुसरीकडे सोन्याचे भाव सातत्याने वाढत असल्याने गुंतवणूकदार देखील खरेदीकडे वळले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थव्यवस्थेत असलेली अस्थिरता देखील सोन्याचे भाव वाढण्यास कारणीभूत असल्याचा दावा सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold can surge up to highest in two year