सोन्यातील गुंतवणूक, एक सोनेरी पर्याय

विजय तावडे
Monday, 8 June 2020

कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्यासारख्या सुरक्षित पारंपारिक गुंतवणूक प्रकाराला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच मागील वर्षभरात सोन्याच्या गुंतवणूकीत मोठी वाढ होताना दिसते आहे. जगभरातच सोने हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय समजला जातो. त्यामुळेच मागील काही दिवसात सोन्याच्या भावांनी उच्चांकी पातळी गाठली होती. गुंतवणूकीचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण असावा हे लक्षात ठेवून आपल्या पोर्टफोलिओतील काही हिस्सा सोन्यासाठी असावा.

सोन्यातील गुंतवणूक हा भारतीय समाजातील लोकप्रिय पर्याय आहे. शक्य असले तेव्हा प्रत्येक कुटुंबाकडून सोन्यात गुंतवणूक केली जाते. अलीकडच्या काही वर्षात मात्र सोन्यातील गुंतवणूक काहीशी मागे पडल्यासारखी झाली होती. इक्विटी आणि इतर नव्या गुंतवणूक पर्यायांकडे गुंतवणूकदार जास्त आकृष्ट होताना दिसत होते. मात्र मागील वर्षभरापासून सोन्याला सोन्याचे दिवस आले आहेत.

आर्थिक नियोजन करताना 'हे' लक्षात घ्या​

त्यातही कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्यासारख्या सुरक्षित पारंपारिक गुंतवणूक प्रकाराला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच मागील वर्षभरात सोन्याच्या गुंतवणूकीत मोठी वाढ होताना दिसते आहे. जगभरातच सोने हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय समजला जातो. त्यामुळेच मागील काही दिवसात सोन्याच्या भावांनी उच्चांकी पातळी गाठली होती. गुंतवणूकीचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण असावा हे लक्षात ठेवून आपल्या पोर्टफोलिओतील काही हिस्सा सोन्यासाठी असावा. सोन्यात तेजी दिसते आहे म्हणून सर्वच गुंतवणूक सोन्यामध्ये करणे चुकीचे ठरेल.

भारतातदेखील सोने हा पारंपारिक गुंतवणूक प्रकार आहे. मात्र प्रत्येक कुटुंबात सोन्यातील गुंतवणूक ही वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. अर्थात यातील बहुतांश सोने खरेदी ही दागिन्यांच्या रुपात होत असते. मात्र दागिन्यांच्या रुपात केलेल्या गुंतवणूकीतून अपेक्षित परतावा मिळत नाही, कारण दागिन्यांना घट लागते. सोन्यात गुंतवणूक करताना पारंपारिक पद्धतीप्रमाणेच काही आधुनिक चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत. गुंतवणूकदारांनी या पर्यायांचा नक्की वापर केला पाहिजे. सोन्यात कोणकोणत्या पद्धतीने गुंतवणूक करता येते हे पाहूया,

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

1. पारंपारिक पद्धतीने प्रत्यक्ष सराफाकडून सोन्याची खरेदी करता येते. या पद्धतीने सोने खरेदी करताना किंवा सोन्यात गुंतवणूक करताना दागिन्यांऐवजी (अर्थात इथे हौसमौज भागवण्याकरता घेतलेले सोने वगळता त्यापुढील सोन्यातील गुंतवणूक अपेक्षित आहे) सोन्याची नाणी, बिस्किटे किंवा वेढणी या प्रकारांना प्राधान्य दिले पाहिजे. कारण या पद्धतीने गुंतवणूक केल्यास त्यात घट लागत नाही आणि भविष्यातील परताव्यातून घटीपोटी कापली जाणारी रक्कम वाचते.

2. सोव्हेरन गोल्ड बॉन्ड हा देखील अत्यंत चांगला पर्याय आहे. केंद्र सरकार ठराविक कालावधीने सोव्हेरन गोल्ड बॉन्ड बाजारात आणत असते. यात काही वर्षांच्या कालावधीसाठी सोन्यात गुंतवणूक करता येते. गुंतवणूकीसाठी लॉकइन कालावधीसुद्धा असतो. गुंतवणुकीचा कालावधी संपल्यानंतर त्यावेळच्या बाजारभावाप्रमाणे आपली गुंतवणुकीची रक्कम परत मिळते. याशिवाय जवळपास 2.5 टक्के वार्षिक व्याज सरकार या बॉन्डवर देते. अर्थात दीर्घकालावधीसाठी सोन्यात गुंतवणूक करावयाची असल्यास हा पर्याय चांगला आहे.

 म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना टाळा 'ह्या' चूका

3. गोल्ड ईटीएफ, हा देखील एक चांगला पर्याय आहे. याला डिजिटल स्वरुपातील सोन्यातील गुंतवणूक असे म्हणतात. गोल्ड ईटीएफमध्ये किमान गुंतवणूक रक्कम ठरलेली असते त्याप्रमाणे गुंतवणूक केल्यास प्रत्यक्ष सोने न मिळता गुंतवणुकीच्या रकमेएवढे सोने आपल्या खात्यात जमा होते. आपण जेव्हा गुंतवणूक काढून घेतो त्यावेळेस बाजारभावाप्रमाणे सोन्याचे मूल्य आपल्याला मिळते. अल्प कालावधी आणि दीर्घकालावधी दोन्ही प्रकारे हा सोन्यातील गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय आहे.

4. गोल्ड फंड हा देखील असाच डिजिटल पर्याय आहे. बाजारात विविध गोल्ड फंड उपलब्ध आहेत. त्यामध्ये म्युच्युअल फंडातील एसआयपीद्वारेदेखील गुंतवणूक करता येते. किंवा एकरकमी देखील गुंतवणूक करता येते. यातही प्रत्यक्ष सोने न मिळता गुंतवणूकीएवढे सोन्याच्या युनिट्स आपल्याला खात्यात जमा होतात. यातदेखील हवी तेव्हा गुंतवणूक काढून घेण्याचे स्वातंत्र्य असते. 

नव्या डिजिटल पद्धतीने उपलब्ध झालेल्या सोन्यातील गुंतवणूक प्रकारांमुळे प्रत्यक्ष सोने बाळगण्याची चिंता यातून गुंतवणूकदाराची सुटका होते. अर्थात प्रत्यक्ष सोने खरेदी किंवा डिजिटल सोन्यातील गुंतवणूक हा निर्णय गुंतवणूकदाराने घ्यावयाचा आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराच्या गरजा आणि योजनेप्रमाणे हा निर्णय घेतला पाहिजे. मात्र आगामी काळात सोन्याला सुगीचे दिवस येण्याची चिन्हे सध्याच्या आर्थिक अस्थिरतेमुळे निर्माण झाली आहेत. त्यामुळे जर तुम्ही सोन्याचा समावेश आपल्या पोर्टफोलिओत केला नसेल तर तो करायला हरकत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold, a good investment option