सोन्याची वाटचाल 33 हजारांकडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जून 2019

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या किमतीत होणाऱ्या बदलाचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत.

जळगांव : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या किमतीत होणाऱ्या बदलाचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आठवडाभरात सोन्याचे दर वाढून 32 हजार 900 रुपयांवर आले; तर चांदीचे दर काही दिवसांपासून 38 हजारांवर स्थिरावलेले आहेत. 

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर वधारल्याने महिनाभरापासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. जळगावमधील सराफ बाजारात पंधरा दिवसांपूर्वी सोन्याचा भाव दहा ग्रॅमला 32 हजार 800 रुपये होता. हीच स्थिती आठवडाभरापासून असून, सराफ बाजारात आठवड्यापासून सोन्याच्या दरात दररोज 100-200 रुपयांची वध-घट होत आहे. लग्नसराईमुळे सोने, चांदी खरेदी वाढल्याने दरातली चढ-उतार वाढली असून, त्याला डॉलरच्या किमतीतील बदल मुख्य कारण आहे. 

आठवड्यात चारशे रुपयांनी वाढ 
सुवर्णनगरी समजल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर गेल्या आठवड्यात अस्थिर राहिले आहेत. या अस्थिरतेमुळे 32 हजार 200 रुपयांवर गेलेल्या सोन्याच्या दरात सातशे रुपयांची वाढ झाली आहे. आज (ता. 4) सराफ बाजारात दहा ग्रॅमला सोन्याचे दर 32 हजार 900 रुपयांवर पोचले आहेत. तर चांदीचे दर मात्र, आठवडाभरापासून 38 हजारांवर स्थिरावलेले आहेत. 

गुरुवारी गुरुपुष्यामृत योग 

सोने-चांदीचे दागिने खरेदीसाठी तसा मुहूर्त पाहिला जात नाही. अनेकजण गुंतवणूक म्हणून खरेदी करतात. मात्र, साडेतीन मुहूर्तांवर सराफ बाजारात गर्दी अधिक प्रमाणात होते. याशिवाय गुरुपुष्यामृताचा योग असला म्हणजे या दिवशी सोने खरेदीला अधिक महत्त्व दिले जाते. हा योग साधण्यासाठी एक ग्रॅम का होईना सोने खरेदी केली जाते. यंदाचा पहिला गुरुपुष्यामृत योग उद्या (ता. 6) आहे. यामुळे गुरुवारी मुहूर्त साधण्यासाठी सराफ बाजारात खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्‍यता आहे. 

सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी अनेकजण शुभ मुहूर्त साधतात. यात गुरुपुष्यामृत योगाला अधिक महत्त्व असून, कोणत्याही शुभमुहूर्तासाठी सुवर्णपेढी सज्ज असते. मुहूर्ताच्या पार्श्‍वभूमीवर दर कमी अधिक होतील असे नसून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार याचे दर ठरत असतात. यामुळे गेल्या पाच-सहा दिवसांत सोन्याच्या दरात तीनशे रुपयांची वाढ झाली आहे. 
- मनोहर पाटील, व्यवस्थापक, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold is moving towards 33 thousand rupees